मुंबई - राज्यभरात चौथी आणि सातवीसाठीची शिष्यवृत्ती परीक्षा सुरळीत पार पडली. तब्बल साडेअकरा लाख विद्यार्थ्यांनी ७,७९३ केंद्रांवर परीक्षा दिली. यात पुणे जिल्ह्यातील परीक्षार्थींची संख्या मोठी होती. विदर्भात विद्यार्थ्यांना कडक उन्हात परीक्षा केंद्र गाठावे लागले. त्यांना उन्हाचा प्रचंड त्रास जाणवला. तर मुंबईतून शिष्यवृत्ती देणाऱ्या विद्यार्थ्यांच्या संख्येत लक्षणीय घट झाल्याचे दिसले.
३६ जिल्ह्यांत ११ लाख ५५ हजार ६९५ विद्यार्थी परीक्षेला बसले. चौथीसाठी ६ लाख ९४ हजार ८, तर सातवीसाठी ४ लाख ६१ हजार ६८७ विद्यार्थी होते. परीक्षा दोन सत्रांत शांततेत पार पडली. जिल्हानिहाय संख्येत पुणे १ लाख १६ हजार ३४६ विद्यार्थ्यांसह प्रथम आहे. त्यानंतर अहिल्यानगर, नाशिक, छत्रपती संभाजीनगर आणि सोलापूरचा क्रम लागतो. पश्चिम महाराष्ट्राचा सहभाग ३४ टक्के आहे. चौथीच्या तुलनेत सातवीची संख्या २ लाख ३२ हजार ३२१ ने कमी दिसली. दक्षिण विभागातही परीक्षा उत्तम रित्या पार पडल्याचे शिक्षण निरीक्षक डॉ. वैशाली वीर यांनी सांगितले.
आम्ही परीक्षेच्या वेळापत्रकाबाबत प्रचंड उन्हाळ्याच्या काळात परीक्षा ठेवू नका असे सांगितले होते. परंतु परीक्षा परिषदेने परीक्षा घेतली. मात्र वर्गात विद्यार्थ्यांना प्रचंड उकाड्याचा त्रास झाला, बाकी परीक्षा सुरळीत झाली. - विजय कोंबे, कार्याध्यक्ष, प्राथमिक शिक्षक समिती
मुंबईत १५ हजार परीक्षार्थीशिष्यवृत्ती परीक्षेसाठी मुंबईत यंदा १५,८२७ विद्यार्थी परीक्षेला बसले. पालिका शाळांमधून खासगी शाळांकडे स्थलांतराचे चित्र यावरून स्पष्ट होत असल्याचे निरीक्षण शिक्षकांनी नोंदवले. विदर्भात तापमान ४५ ते ४६ अंश सेल्सिअसपर्यंत गेल्याने विद्यार्थ्यांना उकाड्याचा त्रास झाला.
राज्यामध्ये साडेअकरा लाख विद्यार्थ्यांनी सुरळीतपणे परीक्षा दिली. वेळेमध्ये बदल करण्यासंदर्भात कोणतीही मागणी परीक्षा परिषदेने मान्य केली नाही. - नंदकुमार बेडसे, अध्यक्ष, राज्य परीक्षा परिषद
Web Summary : Over 1.1 million students appeared for scholarship exams across Maharashtra. Pune had the highest participation. Vidarbha students faced extreme heat. Mumbai saw a significant decrease in student numbers. Concerns were raised about scheduling exams during peak summer.
Web Summary : महाराष्ट्र में 11 लाख से अधिक छात्रों ने छात्रवृत्ति परीक्षा दी। पुणे में सबसे अधिक भागीदारी रही। विदर्भ के छात्रों को भीषण गर्मी का सामना करना पड़ा। मुंबई में छात्रों की संख्या में भारी गिरावट आई। गर्मी में परीक्षा कराने पर चिंता जताई गई।