Join us
Daily Top 2Weekly Top 5

कोकणवासींना गुड न्यूज! १ मेपासून विशेष ट्रेन, वीकेंडला स्पेशल ३६ सेवा; कधीपर्यंत सुरू असेल?

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 28, 2026 16:13 IST

Konkan Railway Diva Chiplun Memu: हा विशेष ट्रेनचा कोकणवासींना चांगला लाभ होऊ शकतो, असे म्हटले जात आहे.

Konkan Railway Diva Chiplun Memu: उन्हाळी सुट्ट्यांमध्ये कोकणात जाणाऱ्या प्रवाशांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढते. कोकणात गावी जाणाऱ्या, तसेच कोकणात पर्यटनाला जाणाऱ्यांची संख्याही या काळात मोठी असते. वाढत्या प्रवाशांची गर्दी लक्षात घेता कोकण रेल्वे मार्गावर अनेक स्पेशल ट्रेन सुरू करण्यात आल्या आहेत. यातच वीकेंला प्रवाशांची संख्या जास्त असते, या कारणाने महिनाभर एक विशेष ट्रेन चालवली जात आहे. 

कोकण रेल्वे मार्गावर अतिरिक्त मेमू ट्रेन चालवण्याचा निर्णय घेतला आहे. १ मे ते ७ जून या कालावधीत ही विशेष सेवा उपलब्ध असेल. प्रामुख्याने शनिवार-रविवारच्या सुट्ट्यांमध्ये होणारी प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी ही अनारक्षित रेल्वे गाडी सुरू होत आहे, ज्यामुळे कोकणवासींना फायदा होणार आहे. ट्रेन क्रमांक ०११५९ दिवा ते चिपळूण मार्गावर विशेष मेमू ट्रेन चालवली जाणार आहे. चिपळूण-दिवा हॉलिडे स्पेशल अनारक्षित मेमू ट्रेन दररोज धावणार नसून, आठवड्यातून तीन दिवसच चालवण्यात येणार आहेत. प्रत्येक वीकेंडला  शुक्रवार, शनिवार आणि रविवार असे तीन दिवस ही मेमू ट्रेन धावणार आहे.

दिवा - चिपळूण मेमू ट्रेनचे थांबे आणि वेळा काय असणार?

मिळालेल्या माहितीनुसार, चिपळूण ते दिवा (गाडी क्रमांक ०११६०) ही रेल्वे दुपारी ३.३० वाजता सुटेल आणि रात्री ११.१० वाजता दिवा जंक्शनला पोहोचेल. परतीच्या प्रवासात दिवा ते चिपळूण (गाडी क्रमांक ०११५९) ही रेल्वे रात्री ११.२५ वाजता सुटून दुसऱ्या दिवशी सकाळी ६.३० वाजता चिपळूणला पोहोचेल. महिनाभराच्या कालावधीत दोन्ही बाजूंकडून एकूण ३६ फेऱ्यांचे नियोजन करण्यात आले आहे. चिपळूण-दिवा विशेष मेमू ट्रेन अंजनी, खेड, कळंबणी बुद्रूक, दिवाणखवटी, विन्हेरे, करंजाडी, सापे वामणे, वीर, गोरेगाव रोड, माणगाव, इंदापूर, कोलाड, रोहा, नागोठणे, कासू, पेण, जिते, आप्टा, सोमटणे, पनवेल, कळंबोली, तळोजा पांचनंद आणि निळजे या रेल्वे स्थानकांवर थांबणार आहे.

दरम्यान, आठ डब्यांची ही मेमू लोकल सर्व स्थानकांवर थांबणार आहे. कोकणात जाणाऱ्या नियमित गाड्यांना असणारी प्रचंड प्रतीक्षा यादी पाहता, ही अनारक्षित मेमू सेवा प्रवाशांसाठी एक उत्तम पर्याय ठरेल, असे म्हटले जात आहे. 

 

English
हिंदी सारांश
Web Title : Konkan Railway to Run Special Memu Train for Weekends

Web Summary : Konkan Railway will run a special Memu train between Diva and Chiplun from May 1st to June 7th. This weekend special will make 36 trips, benefiting Konkan travelers by offering convenient, unreserved travel options.
टॅग्स :कोकण रेल्वेकोकणमध्य रेल्वेभारतीय रेल्वेरेल्वेप्रवासीरेल्वे प्रवासी