काका-पुतण्या एकत्र येणार? दिल्ली ठरवणार! युतीत घेताना BJP सुपरकमांडने अजितदादांना काय बजावले?

By यदू जोशी | Updated: May 16, 2025 07:00 IST2025-05-16T06:58:37+5:302025-05-16T07:00:29+5:30

अजित पवार भाजपसोबत गेले, तेव्हाच ‘पुन्हा एकत्र येऊ नका’, असे त्यांना सांगितले गेल्याचे कळते. त्यामुळे काका-पुतणे एकत्र येणे ‘दिल्ली’च्या हाती आहे.

will uncle sharad pawar and nephew ajit pawar ncp come together that delhi will decide | काका-पुतण्या एकत्र येणार? दिल्ली ठरवणार! युतीत घेताना BJP सुपरकमांडने अजितदादांना काय बजावले?

काका-पुतण्या एकत्र येणार? दिल्ली ठरवणार! युतीत घेताना BJP सुपरकमांडने अजितदादांना काय बजावले?

यदु जोशी, सहयोगी संपादक, लोकमत

‘उद्धव ठाकरे-राज ठाकरे एकत्र येणार’ या बातम्यांनी काही दिवस महाराष्ट्राचे राजकीय मनोरंजन झाले. त्यातली हवा निघत नाही तोच ‘शरद पवार-अजित पवार एकत्र येणार’ या चर्चेला अचानक वेग आला. शेवटी अजित पवार यांनी जाहीर केले की ‘तसे काहीही नाही, आम्ही एकत्र वगैरे येणार नाही.’ त्यामुळे तूर्तास पवार एकत्रीकरणाची चर्चा थांबायला हरकत नाही. 

राज्याचे सध्याचे राजकारण, भविष्यातील घडामोडी, फाटाफूट, जोडतोड याचे बव्हंशी निर्णय हे दिल्लीत होतील. भाजपची अख्खी हायकमांड दिल्लीत आहे. एकनाथ शिंदे, अजित पवार हे त्यांच्या-त्यांच्या पक्षाचे हायकमांड असल्याचे दिसते; पण बरेचदा दिसते तसे नसते. हे दोघे हायकमांड आहेत असे मानले तरी दिल्लीची सुपरकमांड त्यांच्यावर आहेच. माहिती अशी आहे की, अजित पवार भाजपसोबत गेले तेव्हाच, ‘पुढे मागे तुम्ही दोघे (अजित पवार - शरद पवार) एकत्र याल आणि वेगळेच राजकारण दिसेल, असे काही होऊ देऊ नका’, असे अजितदादांना भाजपच्या दिल्लीतील श्रेष्ठींनी सहा महिन्यांपूर्वीच बजावले होते. त्यानंतर विधानसभेची निवडणूक झाली. हे लक्षात घेता पवार-पवार एकत्र येणे दोघांच्याही हाती नाही, तर ते प्रत्यक्षात दिल्लीच्या हाती आहे. 

स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका वगैरे विषय दिल्लीसाठी तेवढे महत्त्वाचे नसतात. लोकसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून दिल्लीत समीकरणांची जुळवाजुळव होत असते. या निवडणुकीला आणखी चार वर्षे बाकी आहेत, त्यामुळे सध्या दिल्लीला कसली घाई नाही. इतक्या सहजासहजी पवार एकत्रीकरणाला दिल्ली मान्यता देणार नाही. शरद पवार यांना सर्वार्थाने थकविले जाईल. पवारांनी अनेकांना थकविले, आता त्याबाबत त्यांची परीक्षा आहे. सोबतची माणसे टिकविण्याचे मोठे आव्हान त्यांच्यासमोर आहे. एक थिअरी सुरुवातीपासून फिरत होती की ‘दोघांचे वेगळे होणे हेच मुळात एक नाटक आहे, सोयीनुसार वेगळे व्हायचे आणि सोयीनुसार एकत्र यायचे हे आधीच ठरलेले आहे.’ 

आज दोन पवार एकत्र आले, तर या थिअरीवर शिक्कामोर्तब होईल. भाजपला हे नकोच आहे.  पवारांची एकत्रित ताकद भाजप का वाढू देईल? अजित पवारांनी जे स्पष्टीकरण दिले ते भाजपच्याच सांगण्यावरून असाही एक अंदाज आहे. अजित पवारांकडे आज ताकद आहे, शरद पवारांकडे डावपेचांचे कौशल्य तर आहेच; अशावेळी पुतण्याची ताकद आणि काकांचे डावपेच कौशल्य एकत्र येणे भाजपला कसे आवडेल? 

वादग्रस्त कर्मचारी मुख्यमंत्र्यांच्या स्वागताला 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अलीकडेच छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याच्या अनावरणासाठी सिंधुदुर्गला गेले होते. तेथे अव्वल कारकून एस. पी. हांगे आणि तलाठी व्ही. व्ही. कंठाळे या दोन वादग्रस्त कर्मचाऱ्यांनी फडणवीस यांचे  विमानतळावर स्वागत कसे केले, याची चौकशी सुरू झाली आहे.  लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात अडकल्यानंतर या दोघांना निलंबित करण्यात आले; नंतर त्यांना पुन्हा सेवेत घेतले गेले. हे दोघे मुख्यमंत्र्यांच्या स्वागतासाठी विमानतळावर गेलेच कसे? सुरक्षा यंत्रणा काय करत होती?- असे प्रश्न आता निर्माण झाले आहेत. प्रोटोकॉलमध्ये बसत नसताना असा आगंतुकपणा केल्याबद्दल या दोन कर्मचाऱ्यांना आता निलंबित करण्यात आले आहे. भारत-पाक तणावाच्या स्थितीत मुख्यालयी राहण्याचे आदेश असूनही हे दोघे मुख्यालय सोडून का गेले असा ठपकाही ठेवला आहे, पण सुरक्षा यंत्रणेत एवढी मोठी चूक झाली कशी?- हा प्रश्न उरतोच.  सिंधुदुर्गचे जिल्हा पोलिस अधीक्षक, सिंधुदुर्गचे अतिरिक्त जिल्हाधिकारी रवि पाटील, कणकवलीचे उपविभागीय अधिकारी जगदीश कातकर यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. मंत्री नितेश राणे तिकडे त्यावेळी हजर होते, त्यांना हे दोन महाभाग येणार याची कल्पना कोणी दिली नव्हती का? 

त्या दिवशी काय घडले? 

गेल्या आठवड्यातील घटना. स्थळ मंत्रालयाजवळील भाजपचे प्रदेश कार्यालय. वरच्या माळ्यावरील सभागृहात एक बैठक सुरू होती. बैठकीला राष्ट्रीय सहसंघटनमंत्री शिवप्रकाश, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, कार्याध्यक्ष रवींद्र चव्हाण, माजी केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे आदी उपस्थित होते. भाजपच्या मराठवाड्यातील जिल्हाध्यक्षांच्या निवडीचा विषय सुरू होता. अचानक काय झाले कोणास ठावूक! बैठकीला हजर असलेले मंत्री अतुल सावे ‘माझा यापूर्वी असा अपमान कधीही कोणीही केलेला नव्हता’ असे म्हणत रागारागात खाली आले. त्यांच्या डोळ्यांत अश्रू होते. त्यांना समजविण्यासाठी बावनकुळे, चव्हाण तत्काळ त्यांच्या मागेमागे आले अन् त्यांची समजूत काढू लागले. छत्रपती संभाजीनगरमध्ये कोणाला भाजपचे अध्यक्षपद द्यायचे यावरून बैठकीत तणातणी झाली म्हणतात. तेथे शिरीष बोराळकर यांनाच पक्षाचे अध्यक्षपद द्या यासाठी सावे अडून बसले होते, असे कळते. ५८ जिल्हाध्यक्ष जाहीर झाले; पण बोराळकरांचा निर्णय काही झाला नाही अजून. आणखी काही तपशील आहे; भाजप कव्हर करणाऱ्यांनी तो शोधावा. 
    yadu.joshi@lokmat.com

 

Web Title: will uncle sharad pawar and nephew ajit pawar ncp come together that delhi will decide

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.