आजचा अग्रलेख: दादामाणूस! कर्तबगार असामान्य नेता महाराष्ट्राने गमावला....

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 29, 2026 10:14 IST2026-01-29T09:08:24+5:302026-01-29T10:14:04+5:30

Ajit Pawar Death News: अजित पवारांचा दिवस लवकर सुरू होत असे. भल्या सकाळी ते अचानक कुठे भेट देतील, कशाची पाहणी करतील, याचा अंदाज बांधता येत नसे. अशाच एका सकाळी राजभवनात शपथ घेऊन त्यांनी महाराष्ट्राला धक्का दिला होता. मात्र, बुधवारी सकाळी त्यांनी जो धक्का दिला, त्यातून महाराष्ट्र सावरलेला नाही. संपूर्ण महाराष्ट्र शोकव्याकुळ झालेला आहे.

Today's Editorial: Dadamanus! Ajit Pawar Death News | आजचा अग्रलेख: दादामाणूस! कर्तबगार असामान्य नेता महाराष्ट्राने गमावला....

आजचा अग्रलेख: दादामाणूस! कर्तबगार असामान्य नेता महाराष्ट्राने गमावला....

अजित पवारांचा दिवस लवकर सुरू होत असे. भल्या सकाळी ते अचानक कुठे भेट देतील, कशाची पाहणी करतील, याचा अंदाज बांधता येत नसे. अशाच एका सकाळी राजभवनात शपथ घेऊन त्यांनी महाराष्ट्राला धक्का दिला होता. मात्र, बुधवारी सकाळी त्यांनी जो धक्का दिला, त्यातून महाराष्ट्र सावरलेला नाही. संपूर्ण महाराष्ट्र शोकव्याकुळ झालेला आहे. एका तडफदार नेत्याला आपण गमावले आहे. ज्या अपघातामुळे महाराष्ट्राने असा कर्तबगार नेता गमावला, त्या विमान अपघाताची सखोल चौकशी होणे आवश्यक आहे. असा एखादा नेता घडण्यासाठी कित्येक वर्षे जातात. राजकारणाच्या आखाड्यात सुमारे पाच दशके असूनही, आपल्या शब्दाचा महिमा अजित पवारांनी कायम ठेवला होता. दादा जे बोलतात, तेच करतात, ही त्यांची ख्याती होती. जे अशक्य आहे, ते स्पष्ट शब्दात सांगणार. मात्र, एकदा शब्द दिला की ते काम तडीस नेणार, ही खात्री होती. त्यामुळेच ‘कामाचा माणूस’ ही त्यांची ओळख होती. काम करताना कोण कुठल्या पक्षाचा, हेही ते कधी बघत नसत. अगदी सामान्यातल्या सामान्य माणसालाही ते आपले वाटत.

दादा हे रसायनच वेगळे होते. ‘मैने हमेशा मेरे दिल की सुनी है...’, असे ते एका मुलाखतीत म्हणाले होते. याच स्वभावामुळे त्यांनी पारंपरिक राजकारणाचे निकष बदलून टाकले. आपल्या मनात काय आहे, याचा इतरांना पत्ता लागता कामा नये, हे अनेक राजकीय नेत्यांचे स्वभाववैशिष्ट्य. दादा मात्र कोणाचाही मुलाहिजा न ठेवता थेटपणे बोलणारे. जे पोटात आहे, तेच ओठात आणणारे. त्याची काय किंमत चुकवावी लागेल, याचा जराही विचार न करणारे. ते महाविकास आघाडीत असोत की महायुतीत, आपली थेट भूमिका त्यांनी कधी लपवून ठेवली नाही. जात वा धर्माचे राजकारण त्यांनी कधी केले नाही. त्यांना संसदीय राजकारणाची शिस्त माहीत होती. सामान्य माणूस हा लोकशाहीत मालक आहे, याबद्दल दुमत नव्हते. त्यामुळे एखाद्या कर्तबगार स्टेट्समनप्रमाणे ‘नो नॉनसेन्स’ अशा पद्धतीने ते काम करत राहिले. ते कार्यकर्त्यांचे लाडके ‘दादा’ झाले, त्याचे कारण हेच. दिलेला शब्द पाळणे, कार्यकर्त्यांना प्रेमाने जपणे आणि काम करेल त्याला संधी देणे या स्वभावामुळे अजित पवारांना असा जनाधार मिळू शकला.

महाराष्ट्राच्या राजकारणात उपमुख्यमंत्रिपद पहिल्यांदा आले ते १९७८ मध्ये. बॅ. नासिकराव तिरपुडे हे पहिले उपमुख्यमंत्री. त्यानंतर अलीकडच्या इतिहासात हे पद अजित पवारांसाठीच तयार केले आहे असे वाटावे, इतक्या वेळा त्यांनी ते मिळवले. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण असोत की देवेंद्र फडणवीस, उद्धव ठाकरे असोत की एकनाथ शिंदे, अजित पवारांनी उपमुख्यमंत्री म्हणून काम करताना आपला ठसा उमटवला. अजित पवारांचे राजकारण आकाराला आले ते बारामती तालुक्यात. त्यामुळे ते ग्रामीण भागातील नेते. आपला हा ग्रामीण बाज त्यांनी कधी लपवला नाही. उलटपक्षी अभिमानाने मिरवला. त्यांच्या वक्तृत्वाचे अनेक चाहते होते. भाषण असो की पत्रकार परिषद, आपल्या खास रांगड्या आणि खेळकर शैलीत अजित पवार बोलत. या महानगरपालिका निवडणुकीत त्यांनी थेट भाजपलाच अंगावर घेतले. पुणे आणि पिंपरी-चिंचवड महानगरपालिका निवडणुकीत अजित पवारांनी मोठे आव्हान उभे केले. ही निवडणूक त्यांनी विकासाच्या मुद्द्यावर आणली. अर्थात, त्यांना अपेक्षित यश मिळाले नाही. मात्र, लगेच ते जिल्हा परिषद निवडणुकीच्या तयारीला लागले. अलीकडची घटना. पुणे ग्रॅण्ड सायकल टुरचा समारोप होता. अजित पवार प्रमुख पाहुणे होते. त्यावेळी ते म्हणाले, ‘पुणेकरांनी या सायकल स्पर्धेला जोरदार प्रतिसाद दिला. अर्थात, महापालिका निवडणुकीत तसा प्रतिसाद आम्हाला दिला नाही, ही गोष्ट वेगळी’... त्यांची विनोदबुद्धी अतिशय तल्लख.  राजकारणात विखार वाढत असताना आणि शह-काटशह म्हणजे राजकारण असा समज झालेला असताना, अजित पवारांचा हा दिलखुलास मोकळेपणा त्यांच्या विरोधकांनाही आवडत असे.

अजित पवारांचे हे असे व्यक्तिमत्त्व घडले, ते त्यांच्या प्रवासामुळे. ते राजकारणात तसे १९८२मध्ये आले. अगदी गावापासून सुरुवात केल्याने त्यांना जमिनीवरचे वास्तव माहीत होते. तो काळही वेगळा होता. वसंतदादा पाटील, शंकरराव चव्हाण, शरद पवार, बॅ. ए. आर. अंतुले अशा नेत्यांचे राजकारण अजित पवार बघत होते. एन. डी. पाटील, गणपतराव देशमुख, भाई वैद्य, ग. प्र. प्रधान असे तगडे विरोधक होते. इंदिरा गांधींना आव्हान देणारे शरद पवारही सत्ता गेल्यानंतर विरोधामध्ये उभे होते. यशवंतरावांचा तो अखेरचा काळ होता, मात्र त्यांची प्रभावळ महाराष्ट्राच्या राजकारणात अक्षय होती. खिलाडूपणे राजकारणात कुस्ती करायची. जिंकण्यासाठी डाव टाकायचे. मात्र, विजय असो की पराभव, दोन्ही मान्य करून दोघांनीही लोकांसाठी काम करायचे, असा तो काळ होता. स्वातंत्र्यलढ्यातून प्रेरणा घेऊन उदयाला आलेले राजकारणही अजित पवारांनी पाहिले आणि एकविसाव्या शतकासोबत व्यावसायिक झालेल्या राजकारणातही ते टिकून राहिले. जुन्या प्रेरणा घेऊन नव्या काळाला सामोरे जाताना, लोक हा केंद्रबिंदू  कधी सुटला नाही. त्यांचा दरारा होता; पण अर्ध्या रात्री धावून येणारा हाच दादा आहे, हा आधार होता.

१९९१मध्ये अजित पवार सर्वप्रथम खासदार झाले. मात्र, शरद पवारांना केंद्रात जायचे असल्याने, त्यांच्यासाठी अजित पवारांनी लोकसभा सोडली आणि ते विधानसभेत आले. हा कालखंड जागतिकीकरणाचा होता. सगळे बदल होत होते. राजकारणही बदलत होते. महाराष्ट्रात प्रथमच शिवसेना-भाजपचे सरकार आले. केंद्रातही एकपक्षीय वर्चस्वाचे दिवस संपले होते. पुणे-मुंबई एक्स्प्रेसवेमुळे पुणे आणि पिंपरी-चिंचवड ही शहरे वेगाने विकसित होऊ लागली होती. या शहरांना योग्य दिशेने नेण्यासाठी अजित पवार उभे राहिले. आजचे पिंपरी-चिंचवड शहर हा अजित पवारांच्या द्रष्टेपणाचा आणि कर्तबगारीचा पुरावा आहे, हे त्यांचे विरोधकही मान्य करतील. अजित पवार राजकारणात आले ते शरद पवारांचे बोट पकडून. तेव्हा शरद पवारांचे नाव दुमदुमत होते. वयाच्या अवघ्या अडतिसाव्या वर्षी मुख्यमंत्री झालेल्या या तरुण नेत्याने देशाचे लक्ष वेधून घेतले होते. त्या काळात तरुण अजित पवार राजकारणाची बाराखडी गावच्याच मातीत गिरवत होते. आधी पुणे जिल्हा सहकारी बॅंक, मग दूध संघ असे करत ते लोकसभेत पोहोचले. लोकसभेतून विधानसभेत आले. लगेच मंत्रीही झाले.

१९९९मध्ये शरद पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष स्थापन केला. त्यावेळी त्यांच्यासोबत तरुण नेत्यांची जी फळी होती, त्यात अजित पवार अतिशय प्रभावी होते. अल्पावधीतच त्यांनी पक्षावर मांड ठोकली. प्रशासनावर पकड मिळवली. महाराष्ट्रातील महत्त्वाचे नेते म्हणून ते उदयास आले. २००४ मध्ये काँग्रेसपेक्षाही राष्ट्रवादी काँग्रेसने अधिक जागा मिळवल्या. या विजयात अजित पवारांचा मोठा वाटा होता. शरद पवारांसारखा वटवृक्ष असतानाही, अजित पवारांनी त्या सावलीत न वाढता आपली स्वतंत्र ओळख तयार केली. स्वतःचे व्यक्तिमत्त्व विकसित केले.  त्यांचे महाराष्ट्राचे आकलन विलक्षण होते. फायलींच्या गाठी उकलून कामे कशी पूर्ण करायची, याचा आवाका थक्क करणारा होता. जलसंपदा, ग्रामविकास, कृषी, पाणीपुरवठा, ऊर्जा, पाटबंधारे आणि अर्थ अशा विविध विभागांचे मंत्री म्हणून काम करताना त्यांनी आपला ठसा उमटवला, तो त्यामुळेच. त्यांची कार्यक्षमता अफाट होती.

‘लोकमत’च्या एका प्रकट मुलाखतीत त्यांना विचारले गेले होते, ‘तुम्ही सत्तरीकडे जात आहात, असे वाटत नाही. काय रहस्य आहे?’ तेव्हा ते म्हणाले होते, ‘पहाटे उठतो. थोडा व्यायाम आणि मोजका आहार. दिवसभर काम आणि शांत झोप.’ पुढे ते म्हणाले, ‘माझ्या मनात कोणाचाही द्वेष कधी नसतो. लोकांसाठी आपल्या हातून काम घडते. त्यामुळे मी आनंदी असतो. हेच माझे अध्यात्म आहे.’ त्यावर त्यांना ‘लोकमत’च्या वतीने सदिच्छा देताना म्हटले गेले होते, ‘तुम्ही शतायुषी व्हाल, महाराष्ट्राचे मुख्यमंत्रीही व्हाल.’ आणि, बुधवारी सकाळीच ही धक्कादायक बातमी येऊन धडकली. अजित पवार दहा मिनिटे ‘नॉट रिचेबल’ झाले, तरी बातमी व्हायची. तेच अजितदादा आता कायमचे ‘नॉट रिचेबल’ झाले आहेत ! कर्तबगार अशा असामान्य लोकनेत्याला आपण गमावले आहे. ‘लोकमत’ परिवाराच्या वतीने अजितदादांना भावपूर्ण श्रद्धांजली..!

Web Title : अजित पवार को श्रद्धांजलि: जन नेता!

Web Summary : महाराष्ट्र अजित पवार के निधन पर शोक मना रहा है, जो अपनी प्रतिबद्धता और स्पष्टवादिता के लिए जाने जाते थे। ग्रामीण जड़ों से लेकर उप मुख्यमंत्री तक, उन्होंने महाराष्ट्र के विकास पर अपनी छाप छोड़ी, और वे अपनी कार्य नीति, ईमानदारी और आम आदमी तक पहुंच के लिए प्रशंसित थे। उनकी कमी बहुत महसूस होगी।

Web Title : A Tribute to Ajit Pawar: The People's Leader

Web Summary : Maharashtra mourns Ajit Pawar, a dynamic leader known for his commitment and directness. From rural roots to deputy chief minister, he left his mark on Maharashtra's development, admired for his work ethic, integrity and accessibility to the common man. His loss is deeply felt.