या आत्महत्या नाहीत; पालकांनी, शिक्षकांनी केलेले मुलांचे खूनच!

By ऑनलाइन लोकमत | Published: August 10, 2023 08:34 AM2023-08-10T08:34:52+5:302023-08-10T08:35:24+5:30

घाण्याच्या बैलासारखे फक्त अभ्यासाच्या चाकाभोवती फिरायचे; चरख्यात पिळून घेऊन चिपाड होऊन बाहेर पडायचे ! - आपण आपल्या मुलांशी असे का वागतो?

These are not suicides; The murder of children by parents and teachers! | या आत्महत्या नाहीत; पालकांनी, शिक्षकांनी केलेले मुलांचे खूनच!

या आत्महत्या नाहीत; पालकांनी, शिक्षकांनी केलेले मुलांचे खूनच!

googlenewsNext

- डॉ. विजय पांढरीपांडे, माजी कुलगुरू, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ

शेतकऱ्यांच्या आत्महत्या विषय मध्ये काही काळ गाजला. त्याचे सामाजिक भान लक्षात घेऊन तो विषय सरकारी पातळीवर चर्चेचा मुद्दा ठरला. आता आयआयटीसारख्या संस्थांमधील मुलामुलींच्या आत्महत्यांच्या बातम्या येऊ लागल्या आहेत. तरुण मुले जेव्हा जीवन संपविण्याचे पाऊल उचलतात तेव्हा त्याकडे गांभीर्याने पाहिले जात नाही. यातील अनेक मृत्यू हे परीक्षेच्या अवाजवी तणावामुळे घडले आहेत. राजस्थानमधील कोटा हे शहर  शिकवणी क्लासची फॅक्टरी म्हणून प्रसिद्ध आहे. तिथे भावी इंजिनीअर्स, डॉक्टर्स तयार होण्यासाठी पूर्वतयारी करवून घेतात. अतिशय कठीण अन् तणावाचा काळ असतो हा मुलांसाठी. पालक चक्क कर्ज काढून, पोटाला चिमटा लावून लाखो रुपयांचा खर्च करतात. पहाटे उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत अभ्यास! वरून होमवर्क आणि सतत होणाऱ्या टेस्ट; प्रसंगी इथले शिक्षक अतिशय कठोर होतात. कारण त्यांच्या क्लासेसचे व्यावसायिक यश मुलांच्या चांगल्या स्कोअरवर अवलंबून असते. इथे कुणी कुणाचा मित्र नसतो. सगळे एकमेकांचे स्पर्धक. त्यामुळे या काळात लळा, जिव्हाळा, प्रेम, सहानुभूती, काळजी हे शब्दच मुलांच्या वाट्याला येत नाहीत. फक्त ताण!! शिवाय पालकांचे प्रेशर वेगळेच..

कोटा हे एक उदाहरण झाले. अशा ‘कारखान्यात’ भरडायला घातलेल्या मुलामुलींच्या आत्महत्यांची संख्या अलीकडे वाढते आहे. चमत्कारिक वाटेल.. पण या आत्महत्या नाहीत, मुलांच्या पालकांनी, शिक्षकांनी केलेले हे खून आहेत!
मुलांनी इंजिनिअर, डॉक्टर, आयएएस ऑफिसरच झाले पाहिजे, हा आग्रह टोकाला गेला आहे. खरे तर कला, विज्ञान, वाणिज्य, व्यवस्थापन, लिबरल आर्ट्स, कायदा, समाजशास्त्र अशा सर्वच क्षेत्रात करिअरला तितकाच प्रचंड वाव आहे. आता तर भविष्यातील गरजा, नोकऱ्या, कामाचे स्वरूप हे सातत्याने, प्रचंड वेगाने बदलणार आहे. तिथे तुम्ही काय शिकला, किती शिकला, श्रेणी काय याला फारसे महत्त्व राहणारच नाही. तुमची स्वतःची क्षमता काय, सातत्याने नवे, नव्या दमाने, तत्परतेने शिकण्याचे, जुने विसरून नवे आत्मसात करण्याचे कौशल्य तुमच्यात कितपत आहे; हेच तपासले जाणार. अधिक वेगाने, अधिक अचूकपणे तुमची सगळी बौद्धिक कामे कौशल्याने करणारे तंत्र म्हणजे एआय, कृत्रिम बुद्धिमत्ता वेगाने विकसित होते आहे. त्यामुळे भविष्यातील कामाचे, नोकरीचे स्वरूप आरपार बदलणार. तिथे तुमची पदवी आयआयटीची की एनआयटीची, हे कुणी विचारणार नाही. 

गेल्याच आठवड्यात एका सातवीच्या मुलीने आत्महत्या केल्याचे वृत्त आले. या कोवळ्या मुलीचे वेळापत्रक बघा.. सकाळी सात ते तीन शाळा, दुपारी चार ते रात्री आठ शिकवणी, नंतर झोपेपर्यंत होमवर्क! कोवळ्या वयात किती अत्याचार? अवांतर वाचन नाही, खेळ नाही, गप्पा नाही, हसणेखेळणे-मनोरंजन नाही.. फक्त चरख्यात ऊस पिळतात तसे पिळून घेऊन चिपाड होऊन बाहेर पडायचे. घाण्याच्या बैलासारखे अभ्यासाच्या चाकाभोवती फिरत राहायचे.. ही मुले अशाने आपले बालपण, तारुण्य हरवून बसतात. त्यातील निवडक काही ताण सहन करीत, स्वसामर्थ्याने यशस्वी होतात. इंजिनिअर, डॉक्टर होतात. पण चांगला माणूस म्हणून, जबाबदार सुसंस्कृत नागरिक म्हणून किती घडतात, हा संशोधनाचा विषय!

नव्या धोरणाने ताण विरहित शिक्षण आले, तरी ते प्रत्यक्षात येईल की नाही, शंकाच आहे. कारण पालकांचेच हट्ट विचित्र आहेत. खूप अभ्यास, खूप होमवर्क, खूप मार्क्स यातच जास्त इंटरेस्ट असतो. संपूर्ण व्यक्तिमत्त्व विकासाचे कोणी पाहिले? कोवळ्या वयात आपण मुलांच्या डोक्यावर नको तितके, नको ते ओझे टाकतो! त्यामुळे मुलांचे मानसिक संतुलन ढळले नाही तरच नवल! अशी परिस्थिती हाताळण्यासाठी आवश्यक असलेली समुपदेशनाची पुरेशी सोय आणि सवयही आपल्याकडे नाही. मुलांबरोबरच पालकांचेही समुपदेशन हवे. तज्ज्ञ मानसिक समुपदेशकांच्या वेळीच घेतलेल्या सल्ल्याने बरेच प्रश्न सुटू शकतील. शिक्षकांची भूमिकादेखील तितकीच महत्त्वाची ठरते.
सगळे काही उद्ध्वस्त झाल्यावर पश्चात्ताप करण्यात अर्थ नसतो. वेळीच, खरे तर तशी वेळ येण्याआधीच सावध झालेले बरे! कारण गेलेला जीव परत येत नाही.
vijaympande@yahoo.com

Web Title: These are not suicides; The murder of children by parents and teachers!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Schoolशाळा