- यदु जोशी (राजकीय संपादक, लोकमत)देवेंद्र फडणवीस सरकारचा शपथविधी गेल्यावर्षी ५ डिसेंबरला मुंबईत हजारो लोकांच्या उपस्थितीत झाला होता. उद्धव ठाकरे यांचा शपथविधी २०१९ मध्ये शिवाजी पार्कवर झाला तेव्हा फडणवीस, चंद्रकांत पाटील तेथे गेले होते, गर्दीतून काही अपमानजनक कमेंटही आल्या. त्यानंतर २०२२ मध्ये शिवसेना फुटली, फडणवीस मुख्यमंत्री होणार असे सगळे मानत असतानाच एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले. नंतर वर्षभराने अजित पवार महायुतीत गेले. फडणवीसांचे अर्धे उपमुख्यमंत्रिपद गेले. गेल्यावर्षी मुख्यमंत्री झाल्यावर त्यांचे एक वर्तुळ पूर्ण झाले. मान-अपमान आणि पुन्हा मान असे चढउतार फडणवीस यांच्या आयुष्यात येत राहिले आहेत. अपमानाने ते खचले नाहीत आणि मानामुळे मातले नाहीत. गेल्यावर्षी मुख्यमंत्री म्हणून पहिली मोठी मुलाखत त्यांनी ‘लोकमत’ला दिली होती. ‘महाराष्ट्राच्या घसरलेल्या परिस्थितीत आपण काही बदल करणार का?’ असा प्रश्न केला तेव्हा ते म्हणाले होते, ‘मी बदलाचे राजकारण करणार, बदल्याचे नाही.’ आता गेल्या वर्षभरात बदल्यापेक्षा बदलावर त्यांनी भर दिला आहे का? -या प्रश्नाची काही सकारात्मक उत्तरे जरूर मिळतात. सहकारी मंत्री आणि प्रशासन यांना त्यांनी आधी १०० दिवसांचा आणि नंतर १५० दिवसांचा कार्यक्रम देऊन लक्ष्याधारित व्यवस्था निर्माण केली. त्यामुळे प्रत्येक विभागात उत्तरदायित्वाची भावना रुजली.
सरकारच्या पहिल्याच वर्षात पूर्ण पाच वर्षांची दिशा निश्चित झाली. २०२९ पर्यंत कोणत्या दिशेने जायचे आहे याचा रोड मॅप ठरला. २०४७ पर्यंतचे व्हिजन डॉक्युमेंटही फडणवीसांनी बनविले. ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पदचिन्हांवर चालतात. भारताची अर्थव्यवस्था पाच ट्रिलियन डॉलरची करण्याचा निर्धार मोदी यांनी केला आहे. महाराष्ट्राचा त्यातील वाटा एक ट्रिलियन डॉलरचा राहील या दृष्टीने फडणवीसांनी उपाययोजना सुरू केल्या आहेत. परकीय गुंतवणुकीत महाराष्ट्र देशात अव्वल आहे. पुढच्या महिन्यात फडणवीस दाओसला जातील तेव्हा मोठमोठ्या गुंतवणुकी राज्यात खेचून आणतील. गडचिरोलीचा चेहरामोहरा ते बदलत आहेत, ती त्यांच्या कारकिर्दीतील सर्वात मोठ्या उपलब्धींपैकी एक असेल.
फडणवीस भावनिक झाले, त्यांनी अश्रूंना वाट मोकळी करून दिली असे कधी होत नाही... त्यांची संवेदनशीलता कृतीतून व्यक्त होते. त्यांचे वडील गंगाधरराव फडणवीस कर्करोगाने गेले. आजवरचे सर्व मुख्यमंत्री मिळून जेवढी मदत मुख्यमंत्री सहायता आणि आरोग्य कक्षातून झाली नाही तेवढी एकट्या फडणवीसांनी मुख्यमंत्री म्हणून केली.
सरकार काय काय करते? इतकेच महत्त्वाचे असते ते हे की सरकारचा ते करण्यामागचा हेतू कसा आहे? या पातळीवर पहिल्याच वर्षात सरकारने आणलेली स्पष्टता महत्त्वाची आहे. एक गोष्ट छोटी, पण डोंगराएवढी... मंत्र्यांकडे दहा दहा वर्षे पीए, पीएस, ओएसडी राहून जे टगे झाले होते त्यांच्यापैकी ९० टक्क्यांना घरी पाठविले गेले. मंत्र्यांच्या कलाने घोटाळे करणारे किंवा मंत्र्यांना बिघडवणारे लोक घरी गेले, त्यातून एक महत्त्वाचा मेसेज गेला की गडबड चालणार नाही.
गुप्तचर यंत्रणांसह विविध माध्यमांतून खात्री करून घेत नवे पीए, पीएस, ओएसडी नेमले गेले; त्यातील काही गडबडी करत आहेत, त्यांना कधी दणका बसेल हे त्यांनाच कळणार नाही. २०१५ मध्ये त्यांच्या पहिल्या मुख्यमंत्रिपदाला एक वर्ष पूर्ण झाले तेव्हा ‘प्रशासन माझे ऐकत नाही’ असे फडणवीस म्हणाले होते. इतक्या वर्षांनंतर या वाक्यात खूप मोठ्ठा बदल झाला, तो हा की आज प्रशासन फडणवीसांशिवाय कोणाचेच ऐकत नाही. पारदर्शकतेसाठी ते दुसऱ्या वर्षात अधिक कठोर होतील हे नक्की.
उपमुख्यमंत्री अजित पवारांचे पुत्र पार्थ यांचा जमीन घोटाळा यासह काही मंत्र्यांच्या कथित घोटाळ्यांची प्रकरणे वर्षभरात चर्चेत आली. त्यात एकाचे मंत्रिपद गेले, वादग्रस्त विधानांमुळे दुसऱ्याची पदावनती झाली. एका मंत्र्याच्या हॉटेल खरेदी प्रकरणाची चौकशी लागली. नाशिक आणि रायगडचे पालकमंत्री नेमता आले नाहीत. गृह राज्यमंत्र्यांच्या आईच्या नावाने मद्य परवाना असल्याचे प्रकरण समोर आले. नगरपरिषद निवडणुकीच्या निमित्ताने भाजप-शिंदेसेनेत कटुता आली. वर्षपूर्तीवर नजर टाकताना हे खटकणारेच आहे.
तीन चाकाचे सरकार चालविताना मित्रपक्षांची मर्जी राखावी लागते. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे लवकर रुसतात, दोघांमध्ये अंतर पडल्याच्या बातम्या वरचेवर येत असतात. अजित पवारांबाबत फडणवीसांना ती अडचण नाही. ते भरपूर सहकार्य करतात म्हणून की काय त्यांना कधी कधी गृहीतही धरले जात असावे. शिंदेंची नाराजी दूर करत सन्मानाच्या पातळीवर दोघांनाही समान ठेवण्याचे आव्हान आहेच. रुसव्या-फुगव्यांमध्ये ‘वरून’ होणारा हस्तक्षेप टळला तरी खूप काही सुरळीत होईल. शेतापर्यंत जाणाऱ्या पाणंद रस्त्यांपासून राज्यभरात रस्त्यांचे मोठे जाळे फडणवीस विणत आहेत. त्यांच्या कारभाराला एक वर्ष पूर्ण होत असताना दिल्लीला जाण्याचा त्यांचा मार्ग तूर्त बांधला जाण्याची शक्यता नाहीच.yadu.joshi@lokmat.com
Web Summary : Fadnavis focused on changing governance, not just transferring officials. He set targets, fostered accountability, and aimed for economic growth. Despite some controversies and coalition challenges, he prioritizes infrastructure and transparency, with strong influence in administration.
Web Summary : फडणवीस ने तबादलों पर नहीं, शासन बदलने पर ध्यान केंद्रित किया। उन्होंने लक्ष्य निर्धारित किए, जवाबदेही को बढ़ावा दिया और आर्थिक विकास का लक्ष्य रखा। कुछ विवादों और गठबंधन की चुनौतियों के बावजूद, वे बुनियादी ढांचे और पारदर्शिता को प्राथमिकता देते हैं, प्रशासन में मजबूत प्रभाव के साथ।