शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! खासदार सुप्रिया सुळे यांच्या कारला अपघात, मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवरील घटना
2
शपथविधी सुवेंदू अधिकारींचा, पण PM मोदी-DCM शिंदे भेटीची चर्चा; काय बोलले? सगळा तपशील समोर
3
सुवेंदू अधिकारी ते हिमंता बिस्व सरमा, भाजपने दुसऱ्या पक्षातून आलेल्या कोण कोणत्या नेत्यांना बनवलं थेट मुख्यमंत्री? बघा संपूर्ण यादी
4
खामेनेईंबद्दल अमेरिकन गुप्तचर यंत्रणेचा मोठा रिपोर्ट; ट्रम्प यांचे टेन्शन वाढले, सगळे दावे फोल!
5
“पुढील २० वर्षे भाजपा पंजाबमध्ये पाय रोवू शकणार नाही”; अरविंद केजरीवाल यांची PM मोदींवर टीका
6
होर्मुझ सामुद्रधुनीत युद्धाचा भडका! नाकेबंदी फोडण्याचा प्रयत्न फसला; अमेरिकेचा इराणच्या दोन तेलवाहू जहाजांवर हल्ला
7
Rohit Sharma: रोहितसोबत सेल्फी घेताना महिलेचा फोन झाला बंद; मग हिटमॅन म्हणाला असं काही, सगळेच हसले!
8
PAK vs BAN : गडबड घोटाळा! पाकिस्तानच्या संघात भारतीयांचा भरणा; रोहित शर्माचं नाव कॅप्टनच्या रुपात झळकलं
9
जालन्यात मनसे आक्रमक! ॲड. गुणरत्न सदावर्तेंच्या गाडीवर ओतली शाई, सुपाऱ्या फेकल्या
10
IPL 2026: सूर्यकुमार खेळणार की नाही? हार्दिकच्या फिटनेसचं काय? MIचा कॅप्टन कोण? पाहा अपडेट
11
“RG कर प्रकरणातील पीडितेला न्याय मिळेल”; सुवेंदू अधिकारी यांच्या आईने व्यक्त केली अपेक्षा
12
IPL 2026 : MI प्रमाणेच CSK चीही डाळ शिजणार नाही! दिग्गजाची प्लेऑफ्सबाबत मोठी भविष्यवाणी
13
कुस्तीपटू विनेश फोगाटला मोठा धक्का! तब्बल १८ महिन्यांनी करणार होती कुस्तीत पुनरागमन, पण...
14
"आरोप म्हणजे शिक्षा नव्हे!" निदा खान प्रकरणात असदुद्दीन ओवेसींची एंट्री, विरोधकांना सुनावले
15
Thalapathy Vijay: 'थलपती विजय'साठी मैदान मोकळं? 'व्हीसीके'कडून 'टीव्हीके'ला बिनशर्त पाठिंब्याची घोषणा!
16
'महाभारत' मालिकेत रूपा गांगुली यांनी नेसली होती २५० मीटर लांबीची साडी, या कंपनीनं केली होती तयार; किती होती किंमत? 
17
सुवेंदू अधिकारी यांच्या शपथविधीनंतर अभिषेक बॅनर्जी यांची प्रदीर्घ पोस्ट; लोकशाहीचा दाखला दिला
18
२ शत्रू ग्रहांचा शुभ राजयोग २०२६: ९ राशींना अकल्पनीय लाभ, पदोन्नती-उत्पन्न वाढ; करारात नफा!
19
आधी कथित गर्लफ्रेंडची हमाली, मग रात्री उशिरा डिनर पार्टी; अर्शदीप-समरीन जोडीचा नवा VIDEO व्हायरल
20
आपच्या पंजाबमधील मंत्र्याला ईडीकडून अटक, घरावर टाकलेल्या धाडीनंतर केली कारवाई   
Daily Top 2Weekly Top 5

राणे वांछिल ते त्यां लाहो

By admin | Updated: May 2, 2017 06:11 IST

प्रथम शिवसेनेचे नगरसेवक व मुंबईच्या बेस्ट या वाहतूक व्यवस्थेचे दीर्घकाळ अध्यक्ष राहिलेले, नंतर काँग्रेसमध्ये येऊन आता

प्रथम शिवसेनेचे नगरसेवक व मुंबईच्या बेस्ट या वाहतूक व्यवस्थेचे दीर्घकाळ अध्यक्ष राहिलेले, नंतर काँग्रेसमध्ये येऊन आता भाजपामध्ये जाऊ पाहणारे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री नारायण राणे हे सध्या अफाट लोकचर्चेत आहेत. पक्षासाठी सर्वस्वाचा त्याग करणारे, कठीण परिस्थितीतही त्याला चिकटून राहणारे आणि पक्षवाढीसाठी जिवाचे रान करणारे प्रामाणिक व निष्ठावंत कार्यकर्ते कधी लोकचर्चेचा विषय होत नाहीत. ते कायम गृहीत धरले जातात. चर्चा होते ती नेहमी उडत्या पक्ष्यांची आणि रंग बदलणाऱ्या प्राण्यांची. शिवसेनेत असताना बाळासाहेब ठाकरे राणेंविषयी म्हणायचे, ‘तो बैलासारखे काम ओढतो’ आणि राणे त्या काळात त्यांना आपल्या कातड्याचे बूट करून देण्याची भाषा बोलायचे. बाळासाहेबांनी राणेंच्या तेव्हाच्या निष्ठेचे पारितोषिकही त्यांना लगेच दिले. मनोहर जोशींना तेवढ्यासाठी मुख्यमंत्री पदावरून काढून त्यावर त्यांनी राणेंची स्थापना केली. नंतरच्या निवडणुकीत सेना पराभूत होऊन राणे पायउतार झाले. तेव्हा त्यांचे रिकामपण त्यांना स्वस्थ बसू देत नव्हते. त्याचमुळे त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. काँग्रेसमध्ये गेल्यानंतर ‘हेच आता आपले अखेरचे निधान’ असे राणे म्हणू लागले आणि काँग्रेसमधील एक वर्गही त्यांच्याकडे त्याच आशेने पाहू लागला. आता स्थिती बदलली आहे. सेनेतून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेलेल्या व सत्तेवर स्वार झालेल्या छगन भुजबळांची सध्याच्या सरकारने केलेली अवस्था भुजबळांसारखे वागणाऱ्या साऱ्यांना भेडसावणारी आहे. त्यातून राणे परवाची निवडणूक हरले. सत्ता आणि खुर्ची जाणे व पराभव पदरी येणे याचे दु:ख राजकरणात सत्तेवर राहिलेल्या माणसांनाच कळणारे आहे. त्यातून राणे यांची राजकीय महत्त्वाकांक्षा त्यांच्यापुरतीच मर्यादित नाही, तर ती आता त्यांच्याकडून त्यांच्या वारसांपर्यंत झिरपली आहे. राणे काँग्रेसमध्ये असताना त्या पक्षाने अशोक चव्हाणांना मुख्यमंत्रिपद दिले. त्यांच्या पश्चात ते पृथ्वीराज चव्हाणांना दिले. राणे आपले जेथले तेथेच राहिले. त्यांच्यासारख्या महत्त्वाकांक्षी माणसाला तो पक्षाने केलेला अपमान वाटला नसेल तरच ते नवल म्हणायचे. मात्र आता त्यांच्याजवळ मार्ग आहे आणि दिशाही आहे. सेना नसली आणि काँग्रेसही नको असली तरी पद व सत्ता द्यायला, नपेक्षा भुजबळांना न मिळालेली सुरक्षा घ्यायला आता भाजपा देशात आहे. तो पक्ष केंद्रात आहे आणि राज्यातही सत्तेवर आहे. शिवाय जो कोणी पक्षात येत असेल तो कसाही असला तरी त्याचे स्वागत करायला तो पक्ष तयार आहे. ‘आमच्यात येणारा प्रत्येकच वाल्या हा वाल्मीकी होतो’ असे नितीन गडकरी यांनी नुकतेच देशाला सांगितलेही आहे. त्यांचे आवाहन लक्षात घेणाऱ्या अनेक वाल्यांना आता वाल्मीकी होऊन रामायण लिहिण्याची महत्त्वाकांक्षा खुणावू लागली असेल तर त्याचेही आश्चर्य करण्याचे कारण नाही. काही पुढाऱ्यांना जनतेची सेवा करण्याचा एवढा सोस असतो की ती केल्याखेरीज त्यांना स्वस्थ होता येत नाही आणि लोकांची सेवा सत्तेवर किंवा सत्तेसोबत राहिल्याखेरीज करता येत नाही. राणे यांना भाजपाचा पूर्वेतिहास ठाऊक नसावा. १९५२ पासून तो पक्ष तेव्हाच्या जनसंघाच्या रूपात निवडणुका लढवीत आला. त्याच्या उमेदवाराला विधानसभेच्या निवडणुकीत शे-दीडशे आणि लोकसभेत शे-पाचशे मते पडत. वाजपेयी आणि अडवाणीही निवडून येत नसत. संसदेत त्याचे चार-दोन सभासद कसेबसे निवडून जात. पण त्या पक्षातील माणसे कधी पक्ष सोडून दुसऱ्या पक्षात जाताना दिसली नाहीत. दीर्घकाळ पराभव अनुभवल्यानंतर सत्तेवर आलेला तो पक्ष आहे आणि पराभवाचे मोल त्याला चांगले ठाऊक आहे. कम्युनिस्ट या आणखीही एका पक्षाने देशात तसा आदर्श घडविला आहे. पक्षांतर करणे आणि त्याचा जराही संकोच वाटू न देणे हा प्रकार काँग्रेस व इतर पक्षांनीच या देशात आणला व रुजविला. तो एवढा की पक्षांतर करणारे लोकच येथे नेते झाले, ते खासदार झाले, मंत्री झाले आणि स्वत:ला राष्ट्रवादी म्हणून मिरवूही लागले. पक्षांतर ही पाश्चात्त्य देशात राजकारणाला कमीपणा आणणारी आणि संबंधिताच्या राजकारणावर बेभरवशाचा शिक्का मारणारी बाब ठरते. नेतृत्वाशी मतभेद झाले तरी पक्षांतराचा विचार तिकडे कोणी करीत नाही. सन्मानपूर्वक पक्षांतर करणे इंग्लंडच्या अनेक शतकांच्या इतिहासात एकट्या चर्चिलना जमले. भारतात अशा सन्माननीयांची जात मोठी आहे. त्यातले अनेकजण सत्तेवर आहेत आणि त्यांना पक्षात घेणारे त्यांना मनातून हसत सांभाळून घेत आहेत. आपल्या महत्त्वाकांक्षी असण्याचा प्रचंड डांगोरा पिटणाऱ्या माणसांचा स्वाभिमान नेमक्या अशा वेळी कुठे काय खायला जातो हाच सामान्य माणसांना पडणारा प्रश्न आहे. आश्चर्य म्हणजे आपली माध्यमे अशा मान्यवरांवर फार लिहितात. आता ते काय करतील, त्यांचा प्रवास कसा असेल असे फालतू ठरणारे प्रश्न ते फार चवीने चघळतात. असो. राणे कुठेही असले तरी त्यांना हवे ते लाभावे. सेनेला जे देणे जमले नाही आणि काँग्रेसने त्यांना जे नाकारले ते त्यांना त्यांच्या नव्या घरकुलात मिळो. शिवाय त्यांना सेवेची आणि केवळ सेवेसाठी सत्तेवर जाण्याची संधी पुन्हा मिळो, ही शुभेच्छा ! न जाणो, फडणवीसांना जे जमले नाही ते कदाचित उद्या महाराष्ट्रात राणेंना जमविणे शक्य होईल. तसेही त्यांचे इरादे त्यांना एकट्यालाच ठाऊक असतात.