निर्माल्याच्या पुनर्वापरातून जीवनशैली पर्यावरणपूरक करूया

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 22, 2020 04:18 AM2020-05-22T04:18:44+5:302020-05-22T04:21:05+5:30

देवपूजेनंतर दुसऱ्या दिवशीच्या पूजेआधी प्रथम देवताना वाहिलेले निर्माल्य काढून टोपलीत वेगळे ठेवले जायचे. मग ते साधारण आठवड्याने गावातील नदी किंवा ओढा अशा वाहते पाणी असलेल्या पाणवठ्यात विसर्जित केले जायचे.

Let's make the lifestyle environmentally friendly through Nirmalya's recycling | निर्माल्याच्या पुनर्वापरातून जीवनशैली पर्यावरणपूरक करूया

निर्माल्याच्या पुनर्वापरातून जीवनशैली पर्यावरणपूरक करूया

googlenewsNext

- प्रिया फुलंब्रीकर (संस्थापक सदस्य, जीवित नदी संघ)

भारतीय हिंदू संस्कृतीत देवपूजेला अनन्यसधारण महत्त्व दिले आहे. अनेक कुटुंबीयांमध्ये रोज पहाटे सूर्योदयानंतर स्नानसंध्यादी कर्मे उरकल्यावर देवघरातील मूर्तींना शुद्ध पाणी व दुधाने स्नान घालून, ताजी फुले अर्पण करून, उदबत्ती, धूप व तुपाच्या निरांजनाने ओवाळून आणि नैवेद्य दाखवून भक्तिभावपूर्वक पूजा करण्याचा प्रघात कित्येक पिढ्यांपासून चालत आला आहे. देवपूजेनंतर दुसऱ्या दिवशीच्या पूजेआधी प्रथम देवताना वाहिलेले निर्माल्य काढून टोपलीत वेगळे ठेवले जायचे. मग ते साधारण आठवड्याने गावातील नदी किंवा ओढा अशा वाहते पाणी असलेल्या पाणवठ्यात विसर्जित केले जायचे.

पूर्वी लोकसंख्या कमी होती; शिवाय हवा-पाणी-जमीन यांचे प्रदूषण नव्हते, त्यामुळे वाहत्या पाण्यात निर्माल्य विसर्जित करणे यात काहीही वावगे नव्हते; पण काळानुसार पर्यावरणात आमूलाग्र बदल घडत गेले. लोकसंख्या इतकी वाढत गेली की, त्याचा महापूर ओसंडून वाहू लागला व जगात चीनच्या खालोखाल भारताने अधिकतम लोकसंख्येचा उच्चांक कधीच गाठला. त्याचा दुष्परिणाम पर्यावरणावर होऊन प्रदूषणाने धोक्याची पातळी ओलांडली. हा प्रदूषणाचा भस्मासूर हवा, पाणी व जमीन यांवर थैमान घालू लागला. गावांचे शहरीकरण झपाट्याने होऊ लागले. रोज नव-नव्या सिमेंटच्या इमारती, कारखाने उभे राहू लागले. खेड्यांमधून माणसांचे जत्थेच्या जत्थे नोकऱ्यांच्या शोधार्थ शहरांकडे येऊ लागले. तेथील बकाल वस्त्या वाढू लागल्या. शहरातील पाणवठ्यांची वाट लागली.

रसायनमिश्रित सांडपाणी, कारखान्यांमधून बाहेर पडणारे प्रक्रिया न केलेले विषारी पाणी आदी मिसळले गेल्यामुळे शहरांतील पाणवठे दूषित झाले. नद्या कोरड्या पडू लागल्या किंवा त्यातील पाणी विषारी झाल्यामुळे प्रवाहीपणा, जीवितपणा हरवून बसले. खरंतर नदीसारख्या नैसर्गिक जलस्रोतांमध्ये स्वत:चे शुद्धिकरण करण्याची जात्याच क्षमता असते. परंतु मानवनिर्मित प्रदूषणात झपाट्याने इतकी भरमसाठ वाढ झाली की नदीची स्वत:ची शुद्धिकरण करण्याची क्षमताच आपण तिच्यापासून हिरावून घेतली. नद्यांमधील प्राणवायू (ऊ्र२२ङ्म’५ी िड७८ॅील्ल) कमी होत शून्यावर जाऊ लागला व नद्यांमधील जलचर, पाणवनस्पती नष्ट होऊ लागल्या. जीवनदायिनी नद्या मृतवत झाल्यामुळे त्यांचे पाणी प्रवाही म्हणजेच जिवंतपणे वाहते राहिले नाही. त्यामुळे अशा प्रदूषणयुक्त नद्या, ओढे, समुद्रामध्ये गणेशोत्सवातील हरितालिका, गणेशमूर्ती, गौरीचे मुखवटे तसेच अन्य फुले वगैरे, नवरात्रातील अविघटनशील वस्तू वापरून सजावट केलेले घट तसेच दररोजच्या देवपूजेतील निर्माल्य विसर्जन करणे, या चालीरिती जलप्रदूषणास पूरक व पर्यावरणाच्या आणि प्रत्येक सजीवाच्या आरोग्यास घातक ठरू लागल्या.

सध्या जलप्रदूषणाची पातळी इतकी वाढली आहे की, त्याच्यावर सरकार दरवेळी कोट्यवधी रुपये खर्च करत असले तरी प्रदूषणाची पातळी ‘जैसे थे’च राहत आहे. त्यामुळे फक्त सरकारला दोषी ठरवून नावे ठेवत बसण्यापेक्षा प्रत्येकाने विवेकशीलतेने स्वत:कडे डोळसपणे पाहत घातक रसायनांच्या आहारी गेलेली जीवनशैली तपासून बघावी. आत्मपरीक्षणानंतर स्वत:च्या दैनंदिन जीवनशैलीत योग्य ते बदल करत आपली जीवनशैली अधिकाधिक पर्यावरणपूरक करावी. याचाच एक भाग म्हणजे निर्माल्य हे नदी अगर तत्सम वाहत्या पाण्यात विसर्जित न करता पर्यावरणास अपायकारक न ठरेल असा त्याचा पुनर्वापर करावा. हीच खरी काळाची गरज ओळखून परिस्थिती आणखी हाताबाहेर जाण्यापूर्वी पर्यावरण रक्षणाकरिता योग्य पावले उचलूया. दररोजच्या निर्माल्याचे काय करायचे, ह्या प्रश्नाच्या उत्तरादाखल काही पुनर्वापराचे पर्याय इथे मी सुचविले आहेत. आपल्याला यातील कोणता पर्याय योग्य वाटतो ते पाहा. त्यानुसार लवकर अंमलबजावणी सुरू करूया.

१) निर्माल्यातील फुले वेगळी करून ती गरम पाण्यात घालून त्यापासून कपडे रंगवण्यासाठी, होळी व रंगपंचमीसाठी नैसर्गिक रंग तयार करू शकतो.
२) झेंडू, शेवंती, गुलाब पाकळ्या या घरी साबण तयार करताना साबणात घालून वेगवेगळ्या प्रकारचे साबण बनवू शकतो. फुले व पत्री यांचा कंपोस्ट व गांडूळ खत तयार करण्यासाठी उपयोग करू शकतो.
३) झेंडूची फुले वेगळी काढून त्यातील प्रत्येक पाकळीच्या तळाशी असलेल्या बीजांपासून रोप तयार करू शकतो. गोकर्णसारख्या फुलांपासून आरोग्यदायी व सुंदर रंगाचा चहा होऊ शकतो.
४) पक्व झालेल्या तुळशीच्या मंजिष्ठा मातीत पेरल्यास त्यामधून यथावकाश रोपे उगवू शकतात.
५) देशी गुलाबाच्या पाकळ्यांपासून गुलकंद तयार करू शकतो. परंतु त्यासाठी प्रखर सूर्यप्रकाश आवश्यक आहे. पाकळ्यांपासून गुलाबपाणीसुद्धा बनवू शकतो. मोगरा, गुलाब, निशिगंध अशी आवडीची कोणत्याही प्रकारची सुवासिक फुले पाण्यात उकळून त्याचा अर्क तेलामध्ये घालून सुगंधी तेले, अत्तरे बनवू शकतो.
नदी व इतर पाणवठ्यांचे रक्षण करण्यात आपलेही भलेच आहे, हे लक्षात घेत आजपासून आपली नैतिक जबाबदारी समजून पर्यावरण रक्षणाची सुरुवात स्वत:च्या घरापासून करूया.

Web Title: Let's make the lifestyle environmentally friendly through Nirmalya's recycling

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.