शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक! ३० वर्षीय अभिनेत्री घरात बेशुद्ध पडली अन् घेतला अखेरचा श्वास, कुटुंबाला मोठा धक्का
2
'या' लोकांना दर महिन्याला ₹१०,००० पेन्शन देण्याचा विचार करतेय सरकार; कोणती आहे योजना, जाणून घ्या
3
इराण युद्धाची भारताने चुकवली किंमत, २५ लाख टन युरियाची दुप्पट दरात केली खरेदी; बाजारपेठेत खळबळ
4
ब्रेक फेल, नियंत्रण सुटले, भरधाव ट्रकची बोलेरोसह दोन वाहनांना धडक, ११ जण जिवंत जळाले   
5
IRS अधिकाऱ्याच्या मुलीवर अत्याचार आणि हत्या; हाय-टेक सुरक्षा भेदून घरात कसा घुसला आरोपी?
6
Success Story: ₹८००० ची नोकरी ते ₹२३,००० कोटींच्या साम्राज्यापर्यंत, स्कूल ड्रॉपआउट निखिल कामथ कसे बनले अब्जाधीश?
7
विशेष लेख: नॉनस्टॉप ७० तास गेमिंग! खाणं, झोपणं तिथेच!
8
आजचे राशीभविष्य - २३ एप्रिल २०२६, व्यापार - व्यवसायात लाभ होतील, नोकरीत वरिष्ठ खुश होतील
9
लेख: काँक्रीटच्या जंगलात चतकोर तरी मोकळी जागा ठेवाल का?
10
लेख: डोनाल्ड ट्रम्प यांना झुकवणाऱ्या होर्मुझ सामुद्रधुनीचे रहस्य!
11
आजचा अग्रलेख: शस्त्रे म्यान, गळचेपी सुरूच !
12
महापालिका अधिकारी कैलास गायकवाड यांच्या घरात रात्रभर झाडाझडती, पोलिसांना सापडलं मोठं घबाड
13
'...तर कॉन्सर्टला परवानगी नाहीच' पोलीस आयुक्तांची भूमिका; कठोर कारवाईचे आदेश
14
१ मे पासून ऑनलाइन गेमिंग्सबाबत नवे नियम; सरकारचा मोठा निर्णय, 'या' गेम्सवर बंदी तर इतरांना सूट
15
Bombay High Court: ‘त्या’ दोन महिलांना गर्भधारणेसाठी वैद्यकीय चाचण्यांना मुभा- मुंबई उच्च न्यायालय
16
Anil Deshmukh: अनिल देशमुख यांची उच्च न्यायालयात धाव, आरोप निश्चितीला स्थगितीची मागणी
17
Mumbai-Pune Expressway: मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवर आज आणि उद्या 'ब्लॉक; कारण काय? पर्यायी मार्ग कोणते? A टू Z माहिती
18
Ashwini Paul: ड्रग्ज सप्लायर अश्विनीचे आंतरराष्ट्रीय कनेक्शन; एअर कार्गोतून तस्करी?
19
राज्यात १८ प्रकल्पांत २.५६ लाख कोटींची गुंतवणूक; कोणत्या जिल्ह्यात किती रोजगार उपलब्ध होणार? 
20
ट्रम्प यांनी युद्धविराम वाढवला, पण इराणला नाही विश्वास, अमेरिकेसमोर ठेवली 'अशी' अट!
Daily Top 2Weekly Top 5

साक्षेपी समीक्षक

By admin | Updated: January 28, 2016 03:29 IST

डॉ. द. भि. कुलकर्णी... मराठी साहित्यातील प्रवृत्ती-प्रवाहांवर सम्यक दृष्टीने लिहिणारे... त्याचवेळी काव्य व ललितलेखनातून संवेदनशीलतेने अभिव्यक्त होणारे असे बहुआयामी व्यासंगी व्यक्तिमत्त्व

- विजय बाविस्करडॉ. द. भि. कुलकर्णी... मराठी साहित्यातील प्रवृत्ती-प्रवाहांवर सम्यक दृष्टीने लिहिणारे... त्याचवेळी काव्य व ललितलेखनातून संवेदनशीलतेने अभिव्यक्त होणारे असे बहुआयामी व्यासंगी व्यक्तिमत्त्व आज आपल्यातून हरपले आहे.विद्वत्तेला जेव्हा विनम्रतेची, शुचितेची, व्यापकतेची किनार लाभते तेव्हा ते व्यक्तिमत्त्व सर्वत्र स्पृहणीय होते... डॉ. द. भि. कुलकर्णी यांची लौकिकार्थाने समीक्षक म्हणून ओळख असली तरीही त्यांनी प्रतिभेला अहंकाराचा स्पर्श होऊ दिला नाही. मतांचा दुराग्रह न ठेवता ते कायम स्वीकारशील राहिले. मर्मग्राही समीक्षक तर ते होतेच त्याचवेळी साहित्याचा मनसोक्त व निखळ रसास्वाद घेणारे चोखंदळ रसिकपणही त्यांनी संवेदनशीलतेने जपले. त्यांच्या निधनाने एक विद्वान समीक्षक तर हरपला आहेच परंतु उत्तम साहित्यरसिकाला व बहुआयामी व्यक्तिमत्त्वाला आपण मुकलो आहोत. मृदू स्वभाव, सव्यसाची दृष्टी आणि मनाचा मोकळेपणा हा दभिंच्या जगण्याचा अविभाज्य भाग होता. दभि हे मुळचे विदर्भातील. शैक्षणिक कारकीर्दीतही त्यांनी 'सुवर्णपदका'वर आपले नाव कोरले होते. 'महाकाव्य' या विषयावर त्यांनी पीएचडी पदवी संपादन केली. विदर्भ साहित्य संघाची 'साहित्य वाचस्पती' ही डीलीट समकक्ष पदवी संपादन केली. त्यांना रशियन भाषाही अवगत होती. अध्यात्मशास्त्र, सौंदर्यशास्त्र, शरीरशास्त्र व कुणालाही ऐकून आश्चर्य वाटावे पण ज्योतिषशास्त्राचा त्यांचा गाढा अभ्यास होता. शिक्षकाचा पिंड असलेल्या दभि सरांनी अध्यापन क्षेत्रात भरीव योगदान दिले. अनेक विद्यार्थीही घडवले. त्यांच्या जडणघडणीचा आलेख जीवनप्रवासात सतत उंचावत राहिला. 'रेक्वियम' हा त्यांचा पहिला कथासंग्रह. मेघ, मोर, मैथिली हे ललित लेखसंग्रह त्यांनी लिहिले. दुसरी परंपरा, महाकाव्य : स्वरुप आणि समीक्षा, ज्ञानेश्वरांचे श्रोतृसंवाद, पहिली परंपरा, तिसऱ्यांदा रणांगण, पार्थिवतेचे उदयास्त, नाट्यवेध, मर्ढेकरांचे सौंदर्यशास्त्र, प्रतितीविश्रांती, युगास्त्र, अपार्थिवाचे चांदणे, मर्ढेकरांची अनन्यता हे समीक्षापर लेखन केले. त्यांच्या समीक्षेवर त्यांच्या अध्यापकीय अनुभवाचा ठसा होता. म्हणूनच ती सकस व समृद्ध होती. त्यांची पृथक्करणाची शैली अतुलनीय व विलक्षण होती. काटेकोर, शुद्ध वाङ्मयीन, कलाकृतीनिष्ठ व तरीही सुगम व लालित्यपूर्ण अशा त्यांच्या समीक्षेची दखल साहित्यविश्वाने अल्पावधीतच घेतली. प्राचीन व अर्वाचीन वाङ्मयातील अनेक प्रवृत्ती-प्रवाहांवर त्यांनी व्यासंगपूर्ण पद्धतीने लेखन केले. दभि हे उत्तम कवी होते. दिग्गज मराठी साहित्यिकांनी त्यांच्या मनाची भूमी नांगरलेली होती. नव मराठी साहित्यामध्ये त्यांना गुणात्मक उणेपण जाणवू लागले. तेव्हा त्याची परखड चिकित्सा त्यांच्या साहित्यिक मनाला आवश्यक वाटली. त्यातून त्यांच्यातील समीक्षक बहरत गेला. समीक्षकाची जडणघडण होताना त्यांनी त्यांच्यातील लेखकाला मात्र संपू दिले नाही. काव्य, ललित, कथा, निबंध यातून साहित्यनिर्मिती करीतच राहिले. लेखक, प्राध्यापक आणि समीक्षक या तिहेरी भूमिकेमुळे त्यांचे लेखन टोकाचे व एकांगी झाले नाही. नवनिर्मितीचे बीज म्हणून त्यांनी या समीक्षेकडे पाहिले म्हणूनच त्यांच्यातून साकारला तो उत्तम साक्षेपी समीक्षक. अभिजात रसिकता, सौंदर्यनिष्ठ चिकित्सा, व्यासंगी वृत्ती, नवतेचा स्वीकार अशी गुणवैशिष्ट्यांचे किनार व खोली त्यांच्या लेखनाला लाभली होती. अनेक मानसन्मान व पुरस्कारांनीही त्यांना गौरवण्यात आले. त्यांच्या वाङ्मयीन कर्तृत्वाचा उत्तुंग आलेख मराठी साहित्य विश्वाने अनुभवला आहे. वयाची ८० वर्षे पार केल्यावर दभि शरीराने थकले तरी मनाने त्याच उत्साहात असायचे. पुण्यातील ८३ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद त्यांनी भूषविले. नुकत्याच पिंपरी चिंचवड येथे झालेल्या अखिल भारतीय मराठी साहित्यसंमेलनातही ते सहभागी झाले होते. लहान, थोर, विचारवंत साऱ्यांशी ते उत्साहाने, आनंदाने बोलायचे. साहित्याशी संबंधित महत्त्वाच्या सर्व कार्यक्रमांना आवर्जून उपस्थित राहायचे. हातचं राखून देणं हा प्रकार त्यांच्या स्वभावात नव्हताच मुळी. त्यांचा संवाद नेहमीच मुक्त होता. कवितेची गेयताही होती. असा हा बहुआयामी प्रतिभावंत आपल्यातून जाण्याची हळहळ व हुरहुर कधीही न संपणारी आहे.