बेचिराख गाझा उभारायला लागतील २५ वर्षे!
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 13, 2025 10:49 IST2025-10-13T10:48:20+5:302025-10-13T10:49:51+5:30
आजच्या घडीलाच गाझा पट्टीत इतका विध्वंस झाला आहे की, गाझापुढे आणखी काय वाढून ठेवलं आहे, याची भीती वाटावी.

बेचिराख गाझा उभारायला लागतील २५ वर्षे!
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या गाझा शांतता प्रस्तावाच्या पहिल्या टप्प्याला इस्त्रायल आणि हमासनं मान्यता दिली असली, तरी ही शांतता तिथे किती काळ टिकेल, याबद्दल आजही अनिश्चितता आहे. पण, तूर्त तरी गाझा पट्टीतील लोकांना किमान काही काळ मोकळा श्वास तरी घेता येईल. आजच्या घडीलाच गाझा पट्टीत इतका विध्वंस झाला आहे की, गाझापुढे आणखी काय वाढून ठेवलं आहे, याची भीती वाटावी.
गेली दोन वर्षे गाझा पट्टीत सुरू असलेल्या युद्धामुळे तो परिसर अक्षरश: बेचिराख झाला आहे. गाझा पट्टी पुन्हा उभारण्यासाठी किमान पुढची २५ वर्षे लागतील, असा अंदाज आहे. त्यात पुन्हा जर युद्ध पेटलं, तर या स्मशानभूमीत फक्त मृतदेहच उरतील, याविषयी अनेकांना काहीच शंका नाही.
सततच्या बॉम्बवर्षावांमुळे आजच गाझातील सुमारे ९८ टक्के शेतजमीन नापीक झालेली आहे. जिथे थोडीफार शेती करता येऊ शकेल, अशी किती जमीन आता तिथे शिल्लक असावी?, केवळ २३२ हेक्टर! युद्धामुळे गाझातील २३ लाख लोकांपैकी सुमारे ९० टक्के लोक बेघर झाले आहेत. जिथे लोक सध्या राहताहेत तिथे ना पाणी, ना वीज, ना डॉक्टर, ना औषधं! अर्ध्याहून जास्त लोक भूकेशी झुंज देत आहेत. गाझाच्या ८० परिसरात नजरेस पडतं ते फक्त सैन्य! केवळ वीस टक्के भागात नागरिकांची हालचाल जाणवते. संयुक्त राष्ट्रसंघाच्या अहवालानुसार, गाझात जमा झालेले सुमारे ५१० लाख टन मातीचे ढिगारे उपसायलाच किमान दहा वर्षे लागतील आणि त्यासाठीचा अंदाजे खर्च आहे १.२ ट्रिलियन डॉलर्स! गाझातल्या ८० टक्के इमारती जमीनदोस्त झाल्या आहेत. हे नुकसान पैशांत मोजले, तर त्याची किंमत होते अंदाजे ४.५ ट्रिलियन डॉलर्स!
गाझात पाच लाखांहून जास्त लोक भूकेशी झुंज देताहेत. आतापर्यंत ६६ हजारांहून जास्त पॅलेस्टिनी मारले गेले आहेत. त्यात १८,४३० (३१ टक्के) मुलं आहेत. गाझात सुमारे ४०,००० मुलं अशी आहेत, ज्यांचे आई किंवा वडील यापैकी एक पालक मारला गेला आहे. १७,००० पॅलेस्टिनी मुलांनी, तर आपले दोन्ही पालक गमावले आहेत.
जीवावर उदार होऊन ज्या संस्था तिथे मदतकार्य करताहेत, त्यांच्या मते गाझा हे आता शहर नाही, जिवंतपणीच मेलेल्यांची एक मृत्यूछावणी आहे, युनिसेफच्या अहवालानुसार गाझात पाच वर्षांखालील सुमारे पन्नास हजार मुलं कुपोषित आहेत. गाझातील ९० टक्के शाळा आणि ९४ टक्के रुग्णालये उद्ध्वस्त झाली आहेत. गाझापट्टीत हल्ले सुरू होण्यापूर्वी तिथे ८५० शाळा होत्या. त्यातल्या बहुतांश शाळा नष्ट झाल्या आहेत. गाझातील १० विद्यापीठांच्या ५१ इमारतींपैकी एकही इमारत चालू स्थितीत नाही. शिक्षणाचं सुमारे ३० हजार कोटींचं पायाभूत नुकसान झालं आहे.
गाझात दोन वर्षांपूर्वी ३६ रुग्णालयांमध्ये ३४१२ बेड होते. तिथेही आता रुग्णालयांच्या सांगाड्यांशिवाय काहीही उरलेलं नाही. फक्त १९ रुग्णालयांत थोडेफार उपचार सुरू आहेत. ८३ टक्के विहिरी नष्ट, तर बाकीच्या विषारी झाल्या आहेत. शाळांची जागा आता तंबूंनी घेतली आहे आणि रुग्णालयांची जागा गूढ शांततेनं व्यापलेली आहे. मुलांकडे पुस्तकं नाहीत आणि रुग्णांसाठी डॉक्टर नाहीत.