'गुरुजन' इतके क्रूर होऊच कसे शकतात? आपण फार मोठी जोखीम स्वीकारतो आहोत
By संदीप प्रधान | Updated: December 1, 2025 12:04 IST2025-12-01T12:02:30+5:302025-12-01T12:04:05+5:30
शिक्षकांनी क्रूर शिक्षा केल्या किंवा लैंगिक शोषण केले तर तोच संस्कार घेऊन ते मोठे होतात. त्यामुळे एक विकृत शिक्षक शेकडो विकृत व्यक्तींना भविष्यात निर्माण करतो.

'गुरुजन' इतके क्रूर होऊच कसे शकतात? आपण फार मोठी जोखीम स्वीकारतो आहोत
- संदीप प्रधान, सहयोगी संपादक
हामुंबईत काही दिवसांत शिक्षकांनी चिमुकल्यांना बेदम मारहाण केल्याच्या घटना घडल्या. नर्सरीतील मुलास अंगावर वळ उठेपर्यंत मारायचे किंवा एखाद्या मुलीस शेकडो उठाबशा काढायला लावायच्या ही विकृती शिक्षकी पेशाला शोभणारी नाही. शिक्षक व विद्यार्थी यांचे नाते अत्यंत महत्त्वाचे आहे. संस्कारक्षम वयात मुलांसोबत जे घडते त्याचा परिणाम त्यांच्या मनावर खोलवर होतो.
शिक्षकांनी क्रूर शिक्षा केल्या किंवा लैंगिक शोषण केले तर तोच संस्कार घेऊन ते मोठे होतात. त्यामुळे एक विकृत शिक्षक शेकडो विकृत व्यक्तींना भविष्यात निर्माण करतो. ही या नाण्याची एक बाजू आहे. दुसरी बाजू अशी की, घरातील एकुलत्या एका मुला-मुलीचे पालक कोडकौतुक करतात. अंगाला बोट लावणे दूरच, अवाक्षरही बोलत नाहीत. त्यामुळे हट्टी, दुराग्रही व 'मी म्हणेन तीच पूर्व दिशा' अशी भावना असलेली पिढी निपजली आहे. शिक्षकाने अशा मुलांना चापट मारली तरी काही वेळा अवडंबर माजवले जाते. व्हिडीओ व्हायरल केले जातात. अशी मुले मग मोबाइल दिला नाही किंवा कुणी रागावले म्हणून आत्महत्येचे टोकाचे पाऊल उचलतात.
एकेकाळी कुटुंबात चार-पाच मुले असायची. मोठ्या मुलाचे कपडे, पुस्तके धाकट्याला वापरावी लागायची. यातून एकमेकांना समजून घेण्याची, तडजोड करण्याची भावना वाढीस लागायची. घरात वडील, आजोबा, काका यांचा दरारा असायचा. काका अथवा मामालाही आपल्या पुतण्या, भाच्याचा कान पिळायचा अधिकार होता. वडिलांचा मार खाल्ला नाही अशी तर त्या पिढीत मुले नव्हतीच. त्यामुळे घरी वडील व शाळेत शिक्षक यांनी मुलास बुकलून काढले तरी घरचे तक्रार करायला जात नव्हते. शिक्षक शिक्षा करायचे त्याचबरोबर प्रेमही करायचे. त्यामुळे शिक्षकांबद्दल आदरयुक्त दरारा असायचा.
आता समजा एखाद्या विद्यार्थ्याला शिक्षा झाली तर इतर मुले किंवा इतर मुलांचे पालक त्याचे शूटिंग करून फेसबुक, इन्स्टाग्रामवर व्हायरल करतात. चोवीस तास बातम्यांची भूक कशी भागवायची या विवंचनेत असलेल्या वाहिन्या लागलीच त्या पोस्ट वापरून 'शिक्षक की हैवान' वगैरे हेडलाइनपासून सायंकाळच्या चर्चा घडवण्यापर्यंत त्याचा पुरेपूर वापर करतात.
मोबाइलमध्ये अनेक हिंसक, अश्लील माहिती दडलेली असल्याने १२ ते १३ वर्षांची मुले-मुली वाह्यात चाळे करताना कचरत नाहीत. या मुलांचे वय लहान असले तरी त्यांच्या जाणिवा प्रौढ झालेल्या असतात. अशा विद्यार्थ्यांना कठोर शिक्षा केली तर ती पालकांना आवडत नाही; परंतु वेळीच अर्धवट वयात त्यांना रोखले नाही तर त्यांच्याकडून गंभीर स्वरूपाचे कृत्य होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
कंत्राटी शिक्षक नियुक्ती केल्याने सरकारी तिजोरीवरील भार कमी झाला असेल. खासगी शाळांत तर शिक्षकांची सही घेतली जाणारी रक्कम व प्रत्यक्ष दिली जाणारी रक्कम यांत बरीच तफावत असते. अत्यल्प मानधनात जर तुम्ही भावी पिढीचे भवितव्य घडवणाऱ्या शिक्षकांना राबवणार असाल तर फार मोठी जोखीम आपण स्वीकारतो आहोत. अल्पस्वल्प वेतन घेणाऱ्या शिक्षकाला घरखर्चाची भ्रांत असेल तर तो ना विद्यार्थ्यांच्या अभ्यासावर लक्ष देईल, ना विद्यार्थ्यांबद्दल ममत्व दाखवील.