गुड टच, बॅड टच आणि आता ‘व्हर्च्युअल’ टच!

By ऑनलाइन लोकमत | Published: May 23, 2024 10:44 AM2024-05-23T10:44:58+5:302024-05-23T10:45:52+5:30

पालक आपल्या मुलांना चांगल्या आणि वाईट स्पर्शाची जशी ओळख करून देतात, तशीच त्यांना आता विकृत आभासी स्पर्शाचीही ओळख करून दिली पाहिजे.

Good touch, bad touch and now 'virtual' touch! | गुड टच, बॅड टच आणि आता ‘व्हर्च्युअल’ टच!

गुड टच, बॅड टच आणि आता ‘व्हर्च्युअल’ टच!


डॉ वैशाली देशमुख, बालरोगतज्ज्ञ व किशोरवयीन मुलांच्या प्रश्नांच्या अभ्यासक -

दिल्ली हायकोर्टाने नुकत्याच दिलेल्या एक निकालात आभासी स्पर्श (व्हर्च्युअल टच) या संकल्पनेचा उल्लेख आला. अल्पवयीन व्यक्तीवर केल्या गेलेल्या अत्याचाराच्या संदर्भात हा निकाल होता. आरोपीची आणि पीडित व्यक्तीची ओळख ऑनलाइन झाली होती. पालक मुलांना जशी चांगल्या-वाईट स्पर्शाची ओळख करून देतात, तशीच त्यांनी अशा विकृत आभासी स्पर्शाचीही ओळख करून दिली पाहिजे, म्हणजे असे प्रसंग कमी घडतील असं या निकालात म्हटलं होतं.

किशोरवयात मुलं स्वत:ची ओळख, स्वत:चं स्थान शोधत असतात. त्यांच्या अंगात रग असते, धोके घेण्याची प्रवृत्ती असते, नवनवीन प्रयोग करून बघण्याची आस असते. कृतीवर त्यांचा ताबा नसला तरी मुलांना या धोक्यांची जाणीव नसते असं नाही, उलट आभासी जगाच्या संदर्भात त्यांना पालकांपेक्षा काकणभर जास्तच माहिती असते. त्यामुळे इथे प्रशिक्षक म्हणून पालक कमी पडू शकतील असं त्यांना वाटतं. शिवाय याबाबत कायदे करायचे तर हे वय इतकं परिवर्तनशील असतं, प्रत्येक मुलात इतकं वैविध्य असतं की सर्वांना लागू होतील अशा वयाच्या ठोक मर्यादा तयार करणं फार अवघड आहे. मग करायचं काय? मुलांना या धोक्यांपासून बचावायचं कसं?..

प्रौढांना जो प्रत्यक्ष किंवा आभासी स्पर्श वाईट वाटतो तो त्यांना शृंगारिक, हवाहवासाही वाटू शकेल. पण त्याचबरोबर त्यांच्या मेंदूच्या विकासाच्या मर्यादा पाहता निर्णय घेण्यात, कृतींचे परिणाम समजण्यात त्यांना अडचणी येणार हेही सत्य आहे. याउलट प्रत्यक्ष तंत्रज्ञानाच्या क्षेत्रातली तांत्रिक माहिती कमी असली तरी सारासार विचार, परिणामांची रास्त जाणीव आणि मुलांचं भलं व्हावं अशी तीव्र आंतरिक इच्छा ही पालकांची ताकद आहे. 
आभासी जगाच्या अपरिहार्यतेचा आपल्याला स्वीकार करावा लागणार आहे, त्याचबरोबर त्याला ताब्यात जरी ठेवता आलं नाही तरी निदान अनिर्बंध राज्य तरी करू देता येणार नाही असं बघायला हवं. आभासी धोक्यांबद्दल ‘हे असं झालं तर असं वाग, तसं झालं तर याचा उपयोग होईल’ अशी ठाम मार्गदर्शक तत्त्वं घालून देता येणं अशक्य आहे. पण मिळालेल्या कोणत्याही ज्ञानाला सुरक्षितपणे हाताळायचं कसं याचे सर्वसाधारण नियम असतातच की! कुठलीही समस्या आली की योग्य निर्णय कसा घ्यायचा, त्यातून बाहेर कसं पडायचं हे तरी निश्चित सांगता येईल. 

न्यायालयानं उल्लेख केलेली आभासी स्पर्शाची संकल्पना खूप महत्त्वाची आहे. पण, आभासी स्पर्श म्हणजे नक्की काय? जी आभासी वर्तणूक आपल्या आयुष्याला, लैंगिकतेला नकारात्मकरीत्या स्पर्श करते, उद्दिपीत करते, त्या गोष्टींचा यात समावेश करता येईल का? काही उदाहरणं सांगायची झाली तर अश्लील व्हिडीओ, फोटो किंवा मेसेजेसची देवाणघेवाण, अनोळखी व्यक्तींशी व्यक्तिगत माहिती शेअर करणे, तुटपुंज्या माहितीच्या आधारे अशा व्यक्तींना प्रत्यक्ष भेटायला जाणे, त्यांना पासवर्ड सांगणे,.. ही यादी अर्थातच न संपणारी आणि सतत बदलत राहणारी आहे. पण साधारणपणे अशा प्रकारची परिस्थिती आली किंवा त्याबद्दल नकोशी भावना मनात आली तर निदान निर्णय घेण्याआधी थोडा वेळ द्यावा, जपून पावलं टाकावीत, ती तीव्र उर्मी काही वेळासाठी तरी ताब्यात ठेवावी आणि जरूर पडल्यास मदत घ्यावी याविषयीचं प्रशिक्षण पालकांना मुलांना देता येईल. 

फक्त ‘आम्हाला सगळं समजतं’ अशा आवेशात नको, तशी ती ऐकणार नाहीत, किशोरवयात तर नाहीच. कदाचित गटांमध्ये ते प्रात्यक्षिकासहित, मुलांना सहभागी करून घेत जास्त उपयुक्तपणे पोहोचवता येईल. वाढत्या वयाच्या मुलांना त्यांच्याविषयी निर्णय घेताना त्या प्रक्रियेत सामील करून घेतलं जाण्याची अपेक्षा असते, तरच नियम आणि कायदे पाळले जातात. किशोरवयात असणाऱ्या दोस्तांच्या प्रभावाचा विचार करता यात मित्र-प्रशिक्षक (peer educators) या संकल्पनेचा वापर उपयुक्त ठरेल. आभासी स्पर्शाच्या या संकल्पनेवर अजून प्रवाही विचार करत राहू या. कदाचित अजून खूप काही गवसेल यातून.
    vrdesh06@gmail.com

Web Title: Good touch, bad touch and now 'virtual' touch!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.