फेसबुक, किशोरवयीन मुलं, मद्य आणि डेटिंग

By ऑनलाइन लोकमत | Published: May 10, 2021 01:45 AM2021-05-10T01:45:32+5:302021-05-10T01:48:47+5:30

सोशल मीडिया आज आपला जीव की प्राण झालेला आहे. त्याशिवाय अगदी एक मिनिटही आपलं पान हलत नाही. तरुणांचं तर जणू आयुष्यच त्यावर अवलंबून आहे. गप्पा, दोस्ती, प्रेम, ब्रेकअप.. सारं काही सोशल मीडियाच्या माध्यमातून. 

Facebook, teens, alcohol and dating | फेसबुक, किशोरवयीन मुलं, मद्य आणि डेटिंग

फेसबुक, किशोरवयीन मुलं, मद्य आणि डेटिंग

Next

सोशल मीडिया आज आपला जीव की प्राण झालेला आहे. त्याशिवाय अगदी एक मिनिटही आपलं पान हलत नाही. तरुणांचं तर जणू आयुष्यच त्यावर अवलंबून आहे. गप्पा, दोस्ती, प्रेम, ब्रेकअप.. सारं काही सोशल मीडियाच्या माध्यमातून. 

पण आपण इंटरनेटवर जे काही करत असतो, जे काही पाहतो, लिहितो, ऐकतो, बोलतो... त्या प्रत्येक गोष्टीच्या पाऊलखुणा तिथे उमटत असतात. नेटवर, गुगलवर आपण काय सर्च करतो, फेसबुकवर कोणाला लाइक करतो, आपण काय फॉलो करतो, आपला कल कुणीकडे आहे, आपण कोणत्या गोष्टी सोशल मीडियावर पाहतो, खरेदीसाठी कोणत्या गोष्टी आपण नेटवर शोधतो, कुठली वेबसाइट किती वेळ पाहतो, या प्रत्येक गोष्टीची अगदी बारीकसारीक नोंद होत असते. पुढच्या वेळी त्या आणि तशाच प्रकारच्या जाहिराती आपल्यासमोर झळकतात, त्यांचा आपल्यापुढे आपोआप मारा व्हायला लागतो... नेट, सोशल मीडिया चालू असताना एखाद्या वस्तूबद्दल आपण बोललो, तर त्याच वस्तूच्या जाहिराती आपल्याला लगेच नेटवर दिसायला लागतात, हा अनुभवही अनेकांनी घेतला असेल. 

फेसबुकच्या संदर्भात आजवर अनेक गोष्टींची जगभरात चर्चा झाली. त्यांच्या बाजारुपणावर टीका झाली. पण फेसबुक आता पुन्हा नव्यानं चर्चेत आलं आहे, ते त्यावर दाखवल्या जाणाऱ्या जाहिरातींवरून. ऑस्ट्रेलियात त्यावरून रणकंदन माजलं आहे. फेसबुकपासून सर्वच सोशल मीडियावाले आम्ही लोकांचा, यूझर्सचा कोणताच डेटा शेअर करीत नाही, वापरत नाही असं कितीही म्हणत असले तरी हा डेटा लीक झाल्याची आणि त्याचा गैरवापर झाल्याची असंख्य उदाहरणं आहेत. अमेरिकेत पहिल्या वेळी ट्रम्प निवडून आले, तेव्हा त्यात सोशल मीडियाचा किती हातभार होता, लोकांचं जनमानस कसं बदलण्यात आलं होतं, हे आता जगजाहीर झालं आहे.  

‘ग्लोबल सायन्स रिसर्च’ या संस्थेनं अवैध मार्गानं जवळपास पावणेसहा लाख भारतीय फेसबुक यूझर्सचा डेटा हस्तगत करून तो ‘केंब्रिज ॲनालिटिक’ला विकला होता, या डेटाचा वापर निवडणुकीत भारतीय मतदारांना प्रभावित करण्यासाठी करण्यात आला, असा आरोप आहे. त्यानंतरही ५४ कोटी यूझर्सचा डेटा लीक झाला होता, त्यात ६१ लाख भारतीय होते. फेसबुक, टि्वटर, इन्स्टाग्राम, यू-ट्यूब, यासारखी सोशल मीडिया ॲप कशी चालतात? त्यासाठी बहुतांश यूझर्सकडून ते एक पैसाही घेत नाहीत, मग त्यांचा एवढा प्रचंड कारभार चालतो तरी कसा? या कंपन्यांचा आर्थिक व्यवहार जगातल्या अनेक देशांच्या अर्थव्यवस्थांपेक्षाही मोठा आहे. तो चालतो, मुख्यत: दोन घटकांवर. एक म्हणजे हा डेटा ‘चोरीछुपे’ विकणे आणि सोशल मीडियावर केलेल्या जाहिराती.

जाहिराती हा सोशल मीडियाच्या उत्पन्नाचा खूप मोठा स्त्रोत आहे. जगामध्ये भारतात सर्वाधिक फेसबुक यूजर्स आहेत. फेसबुकची जाहिरात नीती काहीही सांगत असली तरी यावेळी ऑस्ट्रेलियात त्यांच्या निशाण्यावर आहेत, ती १३ ते १७ वर्षीय किशोरवयीन मुलं. केवळ तीन डॉलरच्या (सुमारे २२५ रुपये) मोबदल्यात  त्यांनी दारू, धूम्रपान, त्वरित वजन घटवणे, ऑनलाइन डेटिंग यासारख्या जाहिराती किशोरवयीन मुलांनाही दाखवण्यासाठी मंजुरी दिली आहे. अर्थात, ही गोष्टही उघडपणे नाही, तर चोरीछुपे. ऑस्ट्रेलियाच्या ‘ग्रुप रिसेट’ने आपल्या अहवालात नुकताच यासंदर्भात खुलासा केला आहे. फेसबुक यासंदर्भात सरळ, थेटपणे जाहिरात देत नाही; पण मुलांपर्यंत या जाहिराती कशा पोहोचतील याची व्यवस्था मात्र फेसबुक करतं. दारू, सिगारेट, ऑनलाइन डेटिंग यासंदर्भातल्या बऱ्याच कंपन्यांनी आता किशोरवयीन मुलांना टार्गेट करणं सुरू केलं आहे. त्यांना रसद पुरवण्याचं काम फेसबुक करीत आहे. ‘ग्रुप रिसेट’ने  ‘ओजी न्यूज नेटवर्क’ या नावानं फेसबुक पेज तयार करून त्याद्वारे ही पडताळणी केली. त्यावेळी हे सत्य समोर आलं. फेसबुक आपली जाहीरात नीती कितीही साफ असल्याचा दावा करीत असलं तरी त्यांची लबाडी उघडकीस आल्यानं जगभरातून त्यांच्यावर टीका होत आहे.
  
एवढंच नाही, १३ ते १७ वर्षे वयाच्या साडेसात लाख किशोरवयीन मुलांपर्यंत या जाहिराती पोहोचविण्याचा आणि त्याद्वारे गल्ला वसूल करण्याचा प्रस्तावही फेसबुकने या कंपन्यांना दिल्याचं समोर आलं आहे. फेसबुक इथेच थांबलेलं नाही. ज्या जाहिराती केवळ १८ वर्षे आणि त्यापुढील वयाच्या व्यक्तींनाच दिसल्या पाहिजेत अशा ‘ॲडल्ट’ जाहिरातीही फेसबुकच्या माध्यमातून अगदी सहजपणे किशोरवयीन मुलांपर्यंत पोहोचत आहेत. फेसबुक  अशी मनमानी करू शकतं, याचं कारण त्यांच्याकडे असलेला प्रचंड पैसा.  जगातल्या १५० देशांपेक्षा ही एकटी कंपनी अधिक श्रीमंत आहे. 

फेसबुकचा मनमानीपणा!
फेसबुकच्या या जाहीरात नीतीविरुद्ध ऑस्ट्रेलियन सरकारनंही कडक पावलं उचलली आहेत, शिवाय अलीकडेच त्यांनी एक नवा कायदाही केला आहे. ज्या बातम्या  फेसबुकनं आपल्या साइटवर दाखवल्या, त्याचा मोबदला मुद्रित माध्यमांना देण्यासाठी त्यांनी फेसबुकला बाध्य केलं. त्यामुळे चिडलेल्या फेसबुकनं कोरोना लस घेण्याबाबत लोेकांना आवाहन करणारी सरकारी जाहिरातही आपल्या वेबसाइटवर दाखवली नाही.
 

Web Title: Facebook, teens, alcohol and dating

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app