शिक्षण घेऊन दोन वेळचा घास मिळवता यावा, म्हणून...

By ऑनलाइन लोकमत | Published: August 19, 2022 12:44 PM2022-08-19T12:44:36+5:302022-08-19T12:45:37+5:30

सध्या देशात हरयाणा, दिल्ली, गुजरात व राजस्थान अशी चार काैशल्य विद्यापीठे आहेत. महाराष्ट्रातले काैशल्य विद्यापीठ राज्यात पहिले तर देशातील पाचवे आहे. या विद्यापीठाचे मुख्यालय मुुंबई असून, कार्यकक्षा संपूर्ण राज्य आहे.

Education should earn two meals a day, so... | शिक्षण घेऊन दोन वेळचा घास मिळवता यावा, म्हणून...

शिक्षण घेऊन दोन वेळचा घास मिळवता यावा, म्हणून...

Next

- डाॅ. अपूर्वा पालकर

आपल्याकडे सध्या पदवीधर झालेले मनुष्यबळ विपुल आहे; पण उदयाेगांना हव्या असलेल्या काैशल्यपूर्ण मनुष्यबळाची मात्र नक्कीच कमतरता आहे. या शिक्षित मनुष्यबळालाच नवी काैशल्ये देऊन त्यांना राेजगारक्षम बनवणे व उद्याेगातील मनुष्यबळाची चणचण आणि बेराेजगारी यामधील दरी दूर करण्याचे उद्दिष्ट नव्यानेच स्थापन झालेल्या महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठाचे आहे. राेजगारक्षमता वाढली की उद्याेजकताही आपसुकच वाढेल! 

सध्या देशात हरयाणा, दिल्ली, गुजरात व राजस्थान अशी चार काैशल्य विद्यापीठे आहेत. महाराष्ट्रातले काैशल्य विद्यापीठ राज्यात पहिले तर देशातील पाचवे आहे. या विद्यापीठाचे मुख्यालय मुुंबई असून, कार्यकक्षा संपूर्ण राज्य आहे. राज्यभरात टप्प्याटप्प्याने या विद्यापीठाची केंद्रे तयार होतील. पारंपरिक विद्यापीठांना पूरक शिक्षण म्हणून हे विद्यापीठ कार्यरत राहील.

विद्यार्थ्यांना काैशल्याचे उत्तम धडे देण्यासाठी हे विद्यापीठ उद्योगांसाेबत मिळून संयुक्त अभ्यासक्रम सुरू करेल. असे अभ्यासक्रम सुरू करण्यासाठी उद्याेगांना संयुक्त भागीदारी करण्याची संधीही उपलब्ध करून देईल. एखाद्याला जीवनाच्या काेणत्याही टप्प्यावर आपले काैशल्य अधिक अद्ययावत करण्याची संधी उपलब्ध होईल. विद्यापीठाचा उद्देश हा स्किलिंग (काैशल्यपूर्ण बनवणे), अपस्किलिंग (वृध्दिंगत करणे) व फ्यूचर स्किल्स (भविष्यात लागणारे काैशल्य अभ्यासक्रम तयार करणे) हा आहे.

विद्यार्थ्यांना आंतरराष्ट्रीय दर्जाच्या प्रमाणपत्रासाठी जगभरातील नामांकित विद्यापीठांसाेबत करार करण्याचा प्रयत्न राहील. त्याद्वारे ट्विनिंग प्राेग्राम व इतर अभ्यासक्रम सुरू करता येतील. ‘नॅशनल एज्युकेशन पाॅलिसी’च्या मार्गदर्शक तत्त्वानुसार कार्यरत राहण्याचा या विद्यापीठाचा प्रयत्न  असून, त्यामध्ये काैशल्य हा केंद्रबिंदू ठेवून विद्यार्थ्यांना बहुविद्याशाखीय शिक्षणाची संधी उपलब्ध करून देण्यात देईल. विद्यापीठाचे अभ्यासक्रम तयार करण्याचे कामकाज सध्या सुरू आहे. येथे विद्यापीठ अनुदान आयाेगाच्या निर्देशानुसार अंडर ग्रॅज्युएट, ग्रॅज्युएट, डिप्लाेमा व सर्टिफिकेट काेर्सेस टप्प्याटप्प्याने सुरू करण्यात येतील. प्रामुख्याने टेक्निकल, सायन्स, इंजिनिअरिंग, आयटीआय, कृत्रिम बुध्दिमत्ता, क्लाउड काॅम्युटिंग, हेल्थकेअर, तांत्रिक, ॲनिमेशन, काॅमर्स या क्षेत्रातील अभ्यासक्रम असतील. अभ्यासक्रमाचे स्वरूप हे काैशल्य विद्यापीठ कायद्यात दिलेल्या ६० टक्के काैशल्याधारित तर ४० टक्के हे सैध्दांतिक प्रकारचे असेल.

काैशल्य विद्यापीठाचे मुख्य काम हे विद्यार्थ्यांपासून कंपनीत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांपर्यंत अपस्किलिंग (काैशल्यवृध्दी) करणे हे आहे. यामध्ये काेणत्याही शाखेचा विद्यार्थी त्याला हवे ते काैशल्य शिक्षण घेऊ शकताेच, त्याचबराेबर  टर्नर, फिटर या कामगारांनादेखील प्रगती करण्याची व पुढील हुद्द्यावर जाण्याची आस असते. हे विद्यापीठ त्यांना त्यांच्या क्षेत्रात किंवा इतर क्षेत्रात आणखी काैशल्य आत्मसात करण्याची संधी देईल. 

विद्यापीठ अजून सुरुवातीच्या टप्प्यात आहे. त्यामुळे विद्यापीठाच्या नवीन नियाेजनाचा आराखडा विविध विद्याशाखेतील शिक्षक, औद्याेगिक क्षेत्रातील तज्ज्ञ यांच्यासह संबंधित घटकांशी चर्चा करून ठरवण्यात येईल. त्यामध्ये किती विद्यार्थ्यांना प्रवेश देता येईल, काेणते अभ्यासक्रम सुरू करण्यात येतील तसेच ते ऑफलाइन असतील की ऑनलाइन याबाबत लवकरच निर्णय घेण्यात येईल.
याआधी चार वर्षांपूर्वी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या इनोव्हेशन सेलच्या संचालकपदी मला काम करण्याची संधी मिळाली. या कार्यकाळात विद्यापीठ ‘अटल इनोव्हेशन’मधील राष्ट्रीय क्रमवारीमध्ये देशात आठवे स्थान मिळवू शकले, याचे समाधान आहे. त्याचाच फायदा आता ही नवी जबाबदारी पेलताना हाेणार आहे. महाराष्ट्र राज्य काैशल्य विद्यापीठ हे नव्या शिक्षण पध्दतीत मैलाचा दगड ठरेल, यात शंका नाही.

(मुलाखत व शब्दांकन - ज्ञानेश्वर भोंडे, लोकमत, पुणे)

Web Title: Education should earn two meals a day, so...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.