शहरं
Join us  
Trending Stories
1
हात पकडून जवळ खेचले, मग Kiss केले आणि शारीरीक संबंध बनवले; TCS प्रकरणातील पीडितेचा थरारक अनुभव
2
CBSE 10th Result 2026: CBSE चा दहावीचा निकाल जाहीर; कुठे आणि कसा पाहायचा? वाचा...
3
'आमची मोहीम अजून संपलेली नाही'; इराणला मोसादचा थेट इशारा, इस्रायली गुप्तचर संस्थेच्या विधानाने खळबळ
4
Mamata Banerjee : दीदी संतापल्या! "हिंमत असेल तर रोज माझी कार तपासा"; ममता बॅनर्जींचं निवडणूक आयोगाला चॅलेंज
5
सोन्याच्या बाजारात मोठी खळबळ: रशिया, तुर्कीसह बड्या देशांकडून सोन्याची धडाधड विक्री; नेमकं कारण काय?
6
"तुम्ही ममतांचा हिशोब करा, आम्ही गुंडांना उलटे टांगून सरळ करू!"; पश्चिम बंगालमध्ये अमित शाह कडाडले
7
Latest Marathi News LIVE Updates: US-इराण यांच्यातील युद्धविराम आणखी २ आठवडे वाढण्याची शक्यता, पुन्हा होणार चर्चा?
8
छुप्या युतीचा पर्दाफाश? इराणचे सॅटेलाइटच्या मदतीनं अमेरिकन ठिकाणांवर हल्ले! या देशानं केला मोठा खेला?
9
एअर इंडियाला २२,००० कोटींचा ऐतिहासिक तोटा; टाटा समूह आणि सिंगापूर एअरलाईन्सकडे आपत्कालीन निधीची मागणी
10
Travel : नकाशावर छोट्या थेंबासारखा दिसतो 'हा' देश, पण आत दडलंय अथांग सौंदर्य! रामायणाशी आहे कनेक्शन
11
IPL 2026 : निक्कीचा 'निकम्मा' शो! LSG च्या २१ कोटींच्या फलंदाजाच्या खात्यात फक्त ४१ धावा
12
रोज खेळायची, मोबाईल पाहायची... १०वीच्या टॉपरने सांगितले कसे मिळाले ५०० पैकी ४९९ गुण?
13
चीनचा टँकर होर्मुझमधून बाहेर पडण्यासाठी निघाला, अमेरिकेच्या युद्धनौका पाहताच माघारी फिरला...
14
Ashok Mittal: राघव चड्डांना हटवून ज्यांना बनवले राज्यसभा उपनेता, त्याच नेत्याच्या मालमत्तांवर ईडीच्या धाडी
15
Mental Health: तुला OCD आहे का?' – असं कोणालाही गमतीने म्हणण्यापूर्वी हा लेख नक्की वाचा!
16
Share Market Update: ₹९ लाख कोटींची लॉटरी! ट्रम्प यांच्या वक्तव्यानंतर शेअर बाजारात तेजी; Sensex १२६४ अंकांनी वधारला
17
कोण आहे 'ही' महिला पत्रकार जिला खुद्द अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी कॉल केला? म्हणाले.. 
18
आभासी दुनियेतील गर्लफ्रेंडनं दिला धोका; AI च्या प्रेमात युवकानं उचललं टोकाचं पाऊल, काय घडलं?
19
याला म्हणतात नशीब! ९ नेते दुसऱ्या पक्षांमधून भाजपात आले; काही मुख्यमंत्री, काही उपमुख्यमंत्री बनले
20
५९१ कोटींचा तोटा; ३१ पैकी ८ विभाग नफ्यात, STचा तोटा कमी करण्यासाठी उपाययोजना करायचे निर्देश
Daily Top 2Weekly Top 5

तारीख पे तारीख... उशिराचा न्याय हादेखील अन्यायच होय!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 15, 2025 07:41 IST

गंभीर बाब म्हणजे महाराष्ट्रातील जलदगती न्यायालयांची संख्याही घटली आहे. कमीअधिक फरकाने संपूर्ण देशात हेच चित्र आहे.

भारतीय न्याय व्यवस्थेला न्यायाप्रतीच्या कटिबद्धतेची प्रदीर्घ परंपरा आहे; परंतु दुर्दैवाने न्याय व्यवस्थाच प्रलंबित खटल्यांच्या चक्रव्यूहात अडकून पडली आहे. तो तोडण्यासाठी जलदगती (फास्ट ट्रॅक) न्यायालयांची संकल्पना पुढे आली; पण त्यांचाच अभिमन्यू झाला आहे. विधि आणि न्याय मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, देशभरात कार्यरत ८६० जलदगती न्यायालयांमध्ये तब्बल १४ लाख ७५ हजार ६८५ खटले तुंबले आहेत. त्यापैकी १०.८२ लाख एकट्या उत्तर प्रदेशातील आहेत, तर त्या खालोखाल सुमारे १.७५ लाख महाराष्ट्रातील आहेत. 

गंभीर बाब म्हणजे महाराष्ट्रातील जलदगती न्यायालयांची संख्याही घटली आहे. कमीअधिक फरकाने संपूर्ण देशात हेच चित्र आहे. गंभीर गुन्हे, महिला व बालकांविरुद्धचे अत्याचार आणि सामाजिकदृष्ट्या दुर्बल घटकांच्या नागरी प्रकरणांचा जलद निपटारा करण्यासाठी जलदगती न्यायालयांची स्थापना झाली होती. प्रत्यक्षात मात्र जलदगती न्यायालयांमध्येच खटले तुंबणे सुरू झाले आणि बघता बघता या समस्येने गंभीर स्वरूप धारण केले. 

जलदगती न्यायालय संकल्पनेच्या या दुर्दशेसाठी कारणीभूत आहे नियमित निधी आणि आवश्यक यंत्रणांचा अभाव! केंद्र सरकारने विशेष जलदगती न्यायालयांसाठी ‘निर्भया फंड’ अंतर्गत निधी दिला असला, तरी जलदगती न्यायालयांसाठी मात्र केंद्राकडून थेट आर्थिक मदत दिली जात नाही. न्याय हा राज्यांचा विषय असल्याचे सांगत, केंद्र सरकार राज्यांवर जबाबदारी ढकलते आणि राज्यांच्या प्राथमिकता वेगळ्या असल्याने ‘न्याय’ हा विषय मागे पडतो. 

चौदाव्या वित्त आयोगाने १,८०० जलदगती न्यायालयांची निर्मिती करण्याची शिफारस केली होती; परंतु सद्य:स्थितीत केवळ ८६० न्यायालयेच कार्यरत असल्याची वस्तुस्थिती स्पष्ट दाखवते, की दृष्टी असूनही इच्छाशक्ती कमी पडली! ही केवळ जलदगती न्यायालय संकल्पनेची दुर्दशा नाही, तर हजारो पीडितांची वेदना आहे. 

लैंगिक अत्याचारग्रस्त महिला, बाल पीडित, संपत्तीच्या वादात अडकलेले कुटुंबीय यांना न्यायासाठी वर्षानुवर्षे वाट पाहावी लागते. यामुळे केवळ न्यायालयांवरील विश्वासच कमी होत नाही, तर कायद्याचा वचक कमी होण्याचीही भीती असते. त्याशिवाय, पीडित व त्यांच्या कुटुंबीयांचे मानसिक व आर्थिक खच्चीकरण, निर्दोष व्यक्तींची बदनामी व कोठडीतील शारीरिक-मानसिक छळ, व्यवस्थेवरील विश्वास कमी झाल्याने गुंड, दलालांसारख्या घटकांना मिळणारे अनावश्यक महत्त्व, गुन्हेगारी प्रवृत्तीत वाढ, असे बरेच अदृश्य, पण गंभीर दुष्परिणाम आहेत. खटले तुंबू नयेत, न्याय लवकर मिळावा, या हेतूने अस्तित्वात आलेल्या जलदगती न्यायालयांची जर ही अवस्था असेल, तर नियमित न्यायालयांमध्ये काय परिस्थिती असेल, याची कल्पनाच केलेली बरी! 

न्यायालयांपेक्षाही गंभीर अवस्था अर्ध-न्यायिक संस्थांची आहे. एकट्या महाराष्ट्र प्रशासन न्यायाधिकरण म्हणजेच ‘मॅट’मध्ये हजारो प्रकरणे वर्षानुवर्षांपासून प्रलंबित आहेत. त्यामध्ये प्रामुख्याने सेवानिवृत्ती वेतनाशी संबंधित प्रकरणे असतात. त्यामुळे आयुष्यभराची घामाची कमाई उतरत्या वयात गरज असताना हाती येत नाही, अशी अनेक वयोवृद्धांची अवस्था झाली आहे. 

अशा अर्ध न्यायिक संस्थांमध्ये सेवानिवृत्त न्यायाधीशांची वर्णी लावली जाते. त्यांना सेवानिवृत्तीनंतरही घसघशीत आर्थिक प्राप्ती होत असते; पण गरजू सेवानिवृत्त मंडळींसाठी मात्र आवश्यक ती संवेदनशीलता दाखवली जात नाही. सर्वसामान्य जनतेचा न्याय व्यवस्थेवरील विश्वास टिकवून ठेवायचा असल्यास, ही परिस्थिती बदलण्याची आत्यंतिक निकड आहे. 

न्याय ही राष्ट्रीय प्राथमिकता असल्याचे लक्षात घेऊन केंद्राने स्वतंत्र निधी तयार करून त्यातून राज्यांना मदत दिली पाहिजे. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून न्याय व्यवस्थेला गती देण्याचा विचार व्हायला हवा. न्याय व्यवस्थेत पदे रिक्त राहणार नाहीत, याची काळजी घ्यायला हवी. सोबतच न्यायालयांची संख्या वाढवली पाहिजे. न्यायालये दोन पाळीत चालविण्याच्या काही राज्यांच्या प्रयोगाची आवश्यक त्या सुधारणांसह देशभर अंमलबजावणी करण्याचा विचार व्हायला हवा. 

जलदगती न्यायालयांची बिकट अवस्था हा भारतीय न्याय व्यवस्थेसाठी एक मोठा इशारा आहे. वेळेत न्याय ही लोकशाहीची मूलभूत गरज आहे. योग्य धोरणे, निधी आणि इच्छाशक्तीच्या अभावामुळे आज जलद न्याय ही संकल्पना फक्त नावापुरती उरली आहे. आता तरी राज्यकर्ते आणि न्याय व्यवस्थेने या प्रश्नाकडे गांभीर्याने पाहिले पाहिजे; कारण ‘तारीख पे तारीख’च्या वाटेने हाती पडणारा उशिराचा न्याय हादेखील अन्यायच होय!

टॅग्स :Supreme Courtसर्वोच्च न्यायालयCourtन्यायालयCentral Governmentकेंद्र सरकारState Governmentराज्य सरकार