संपादकीय: आपत्तीच्या दशकाची डायरी

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 18, 2026 06:42 IST2026-05-18T06:41:29+5:302026-05-18T06:42:26+5:30

PM Modi Foreign Visit: कोरोना, रशिया-युक्रेन युद्ध आणि इराण संकट या पार्श्वभूमीवर पीएम मोदींचा युरोप दौरा. UAE कडून ५ अब्ज डॉलर्सची गुंतवणूक. वाचा सविस्तर.

Editorial: Diary of a decade of disaster by PM Modi | संपादकीय: आपत्तीच्या दशकाची डायरी

संपादकीय: आपत्तीच्या दशकाची डायरी

‘माझ्या कारकिर्दीचे मूल्यमापन करताना माध्यमे आणि विरोधकांपेक्षा इतिहास दयाळू असेल,’ असा विश्वास दिवंगत पंतप्रधान डाॅ. मनमोहन सिंग यांनी त्यांच्या कार्यकाळाच्या शेवटी व्यक्त केला होता. त्या महान अर्थतज्ज्ञ नेत्याविषयी कनवाळूपणाने विचार करण्याची पात्रता आपण सांभाळली आहे का, हा प्रश्न आहेच आणि त्यावर चर्चाही व्हायला हवी. मुद्दा हा की, जगाच्या तसेच भारताच्याही इतिहासात पंतप्रधानपदाची डाॅ. सिंग यांची दहा वर्षे अधिक अस्थिर, आव्हानात्मक व आपत्तीजनक होती, की त्यानंतर नरेंद्र मोदी पंतप्रधान असतानाची दहा-बारा वर्षे? स्वत: मोदी यांना त्यांचे दशक अधिक आव्हानात्मक व आपत्तींचे वाटते. विदेशी चलनाची गंगाजळी, इंधनटंचाई, खतटंचाई अशा संकटांचे काहूर माजले असताना पाच देशांच्या दाैऱ्यावर गेलेल्या मोदींनी शनिवारी नेदरलँडमध्ये अनिवासी भारतीयांसमोर या आपत्तीच्या दशकाची डायरी वाचून दाखवली. ते म्हणाले, ‘आधी कोरोना महामारी, नंतर रशिया-युक्रेन युद्ध आणि आता इस्रायल व अमेरिकेचा इराणवरील हल्ल्यानंतर जागतिक तणाव यामुळे एकविसाव्या शतकातील हे दुसरे दशक संकटांच्या विळख्यात आहे. या संकटांचा सामना करण्यासाठी प्रत्येकाला बदलावे लागेल.’

पंतप्रधान म्हणतात त्याप्रमाणे सध्या जगभर अस्वस्थता आहे हे नक्की. या संकटांचा विळखा किती घट्ट आहे किंवा आधीच्या एक-दोन दशकांच्या तुलनेत आताची संकटे किती गंभीर आहेत, या तपशिलात जाण्याची गरज नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा विदेश दाैरा, तिथून त्यांनी व्यक्त केलेली चिंता, सध्याच्या संकटांवर मात करण्यासाठी उपाय म्हणून केलेले करार-मदार हे वर्तमान भूतकाळापेक्षा अधिक महत्त्वाचे आहे. इंधन जपून वापरा, शक्य तितके घरून काम करा, सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा वापर करा, सोने खरेदी करू नका, असे देशवासीयांना आवाहन करून पंतप्रधान परदेशात रवाना झाले. संयुक्त अरब अमिरात हे या दाैऱ्याचे पहिले पाऊल होते. देश सध्या इंधनटंचाईच्या, दरवाढीच्या झळा सोसत असल्याने अमिरातीमधील काही तासांच्या मुक्कामात पंतप्रधानांनी इंधन पुरवठा साखळीवर मार्ग काढण्याचा प्रयत्न केला. इंडियन स्ट्रॅटेजिक पेट्रोलियम रिझर्व्हज लिमिटेड कंपनीने अबूधाबी नॅशनल ऑइल कंपनीसाेबत सामंजस्य करार केला. त्यानुसार भारतातील राखीव क्रूड ऑइल साठ्यात तीस लाख बॅरल्सने वाढ होईल. एलपीजी पुरवठा वाढेल. त्याशिवाय गुजरातमध्ये जहाज दुरुस्ती संकुल व इतर उद्योगांमध्ये संयुक्त अरब अमिरात पाच अब्ज डाॅलर्सची गुंतवणूक करणार आहे. देशाला परकीय चलन हवे आहे. गुंतवणूक वाढायला हवी. या दृष्टीने पंतप्रधानांचा युरोप दाैरा, विशेषत: नेदरलँड तसेच उत्तर ध्रुवालगतच्या नाॅर्वे, स्वीडन, डेन्मार्क, फिनलँड, आइसलँड या देशांच्या नाॅर्डिक समूहाशी चर्चा महत्त्वाची आहे.

सोमवारी स्वीडनमधील गोथेनबर्ग येथे तिसरी इंडिया-नाॅर्डिक समिट होत आहे. तिचाही हेतू गुंतवणूकदारांना भारताकडे आकर्षित करणे हाच आहे. याचवर्षी जानेवारीत भारत व युरोपीय युनियन यांच्यात मुक्त व्यापार करार झाला. त्याच्या अंमलबजावणीच्या दृष्टीने सध्या युरोपीय पार्लमेंट तसेच संघाच्या सदस्य राष्ट्रांकडून मंजुरीची प्रक्रिया सुरू आहे. मोदींच्या दाैऱ्यामुळे ती प्रक्रिया गतिमान होईल. तसेच टेक्स्टाइल, ज्वेलरी, फार्मा, इंजिनिअरिंग, कृषिमालाच्या निर्यातीला पोषक वातावरण तयार होईल. त्यादृष्टीने नेदरलँडचे पंतप्रधान राॅब जेटन यांच्यासोबत नरेंद्र मोदी यांनी सेमीकंडक्टर, ग्रीन हायड्रोजन, अवकाश तंत्रज्ञान, सागरीवाहतूक व संरक्षणविषयक सहयोगाची चर्चा केली. हेग येथे डच कंपन्यांच्या सीईओंना भारतात गुंतवणुकीचे निमंत्रण दिले. तमिळनाडूमधील चोल राजाच्या काळातील, अकराव्या शतकातील ताम्रपट भारताला परत देऊन नेदरलँडने दोन्ही देशांमधील साैहार्द जपले. भूतकाळातील असे क्षण भविष्याविषयी आश्वस्त करतात.

भविष्याचा विचार करता आणखी एक घटना लक्ष्यवेधी आहे. पंतप्रधान मोदींनी रविवारी नेदरलँडमधील जगप्रसिद्ध ऑफस्लोट्डेक धरणाची पाहणी केली. समुद्रकाठी ३२ किलोमीटर लांब धरणात गोड्या पाण्याचा साठा, त्याद्वारे तहान भागवितानाच पूरनियंत्रण हा अभियांत्रिकी चमत्कार आहे. असाच चमत्कार मोदींना भारतात घडवायचा आहे. आखातामधील प्रस्तावित कल्पसर प्रकल्प मोदींचे स्वप्न आहे आणि कल्पसर हे ऑफस्लोट्डेक धरणाची प्रतिकृती असेल. ३० ते ३४ किमी लांबीचे धरण, त्यावर दहापदरी महामार्ग व रेल्वे, सागरी लाटांवर वीजनिर्मिती, नर्मदा-साबरमती-माही नद्यांचे समुद्राला मिळणारे तब्बल दहा अब्ज घनमीटर पाणी अडवून बावीसशे चाैरस किलोमीटरचा जलाशय, शेजारी धोलेरा या जागतिक व्यापार केंद्राचा विकास, हे त्या स्वप्नांचे तपशील आहेत. डचांच्या भूमीवर ते स्वप्न अंकुरले असेल.

Web Title : संपादकीय: आपदाओं के दशक की डायरी

Web Summary : पीएम मोदी ने यूरोप दौरे में वैश्विक संकटों पर प्रकाश डाला, तेल भंडार और निवेश के लिए समझौते किए। उन्होंने संसाधन संरक्षण का आग्रह किया और व्यापार और विकास के लिए नॉर्डिक देशों के साथ अंतर्राष्ट्रीय सहयोग की मांग की, जो डच जल प्रबंधन से प्रेरित है।

Web Title : Editorial: A Diary of a Decade of Disasters

Web Summary : PM Modi highlighted global crises during his Europe tour, securing deals for oil reserves and investments. He urged resource conservation while seeking international cooperation, particularly with Nordic countries, for trade and development, inspired by Dutch water management.