Draupadi murmu: मोदींची धोबीपछाड; विरोधक चारीमुंड्या चीत !

By विजय दर्डा | Published: July 25, 2022 01:09 PM2022-07-25T13:09:10+5:302022-07-25T13:09:26+5:30

आदिवासी समाजातील द्रौपदी मुर्मू राष्ट्रपतिपदी पोहोचल्या. हे अनोखे ‘सोशल इंजिनिअरिंग’ साधून पंतप्रधान मोदींनी विरोधी पक्षांना मूर्च्छित केले आहे.

Draupadi murmu: Modi's washing; Opponents all over the place in president election, won drupadi murmu | Draupadi murmu: मोदींची धोबीपछाड; विरोधक चारीमुंड्या चीत !

Draupadi murmu: मोदींची धोबीपछाड; विरोधक चारीमुंड्या चीत !

googlenewsNext

विजय दर्डा

ओडिशामधल्या एका मागास जिल्ह्यातल्या, अतिशय मागास अशा आदिवासी संथाल समाजातील द्रौपदी मुर्मू आज देशाच्या राष्ट्रपतिपदावर विराजमान होत आहेत. मुर्मू यांचे राष्ट्रपती पदापर्यंत पोहोचणे आपल्या भारतीय लोकशाहीची ताकद दाखवते. इथे चहा विकणाऱ्या एका गरिबाचा मुलगा पंतप्रधानांच्या खुर्चीपर्यंत पोहोचू शकतो; तर समाजाच्या अगदी शेवटच्या स्तरातून वर आलेली एक आदिवासी महिला राष्ट्रपतिपदाच्या खुर्चीपर्यंत पोहोचते. मागच्या वेळी जेव्हा रामनाथ कोविंद यांचे नाव राष्ट्रपतिपदासाठी आले तेव्हाही “हे नाव कसे आले?”- या प्रश्नाने देशातील अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला होता. यावेळीही तसेच झाले. एका संथाल महिलेला भारतीय जनता पक्ष राष्ट्रपतिपदासाठी एनडीएचा उमेदवार करील असा विचारदेखील कोणाच्या डोक्यातही आला नव्हता.  मला मात्र काहीही आश्चर्य वाटले नाही. कारण मुर्मूजी यांचा जीवनसंघर्ष, ज्येष्ठ आमदार म्हणून त्यांनी केलेले काम, तसेच झारखंडच्या राज्यपाल म्हणून झालेली त्यांची कारकीर्द मला माहीत होती. 

मी मोदींची कार्यशैली समजून घेण्याचा प्रयत्न नेहमीच करत आल्याने त्यांनी द्रौपदी मुर्मू यांची निवड केली याचेही मला आश्चर्य वाटले नाही. दुसऱ्यांच्या डोक्यात जे अजिबात येत नाही ते नरेंद्र मोदी प्रत्यक्षात साकार करतात. मुर्मू यांना मैदानात उतरवणे याच दूरदर्शीपणातून आले. एक महिला, तीही आदिवासी. विरोधी पक्षांकडे त्यांना कोणताही पर्याय नव्हता. मी नेहमी हे म्हणत आलो की लोकशाही बळकट करावयाची असेल तर विरोधी पक्ष शक्तिशाली असणे अत्यंत जरुरीचे आहे. यात काँग्रेस पक्षाची भूमिका सर्वात महत्त्वाची. परंतु दिसते, ते असे की नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्या वेढ्यातून  स्वतःला बाहेर काढण्यात सर्वच विरोधी पक्षीयांना सातत्याने अपयश येते आहे.कसोटीचा निर्णय आला की प्रत्येक वेळी विरोधी पक्ष अत्यंत वाईट पद्धतीने मार खातो. याचे कारण काय? - तर  विरोधी पक्षांकडे काही विचार नाही, नियोजन नाही, दृष्टीचा अभाव आहे. 

द्रौपदी मुर्मू यांना मैदानात उतरवून मोदी यांनी विरोधी पक्षांना निवडणुकीच्या आधीच धराशायी केले होते. आदिवासी, दलित, मुस्लीम, ओबीसी हे समाजगट परंपरेने काँग्रेसचे   मतदार राहिले आहेत. यातले सगळेच हळूहळू  त्या पक्षाला सोडून जाताना दिसतात.  विरोधी पक्ष सैरभैर होत चालला आहे. दुसरीकडे मोदीजी यांचा भारतीय जनता पक्ष सगळ्यांना जोडून घेत आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने स्वतःला वनवासीजनांमध्ये स्थापित केले आहे; तर काँग्रेसचे लोक आदिवासींपासून दूर जात आहेत. राष्ट्रपतिपदासाठी टक्कर देऊ शकेल असा उमेदवार विरोधी पक्ष देऊ शकले नाहीत ही खरेतर मोठी दुर्दैवाची गोष्ट आहे. शरद पवार, फारुख अब्दुल्ला आणि गोपालकृष्ण गांधी यांनीही नकार दिला. यशवंत सिन्हा माझे चांगले मित्र आहेत. त्यांचे प्रेम मला नेहमी लाभले आहे. पण येथे एका व्यक्तीचा मुद्दा नाही. ते भारतीय समाजातल्या कुलीन, उच्चभ्रू वर्गाचे प्रतिनिधित्व करतात. उलट मुर्मू या देशातील शेवटच्या टोकाला उभ्या असलेल्या वर्गाचे प्रतिनिधित्व करत आहेत. निवडणुकीत सिन्हा यांना मते चांगली मिळाली असली तरी विरोधी पक्षाचे लोक फुटले. क्रॉस व्होटिंगही झाले, ही विरोधी गटासाठी चिंतेची बाब होय. प्रादेशिक पक्ष एकवेळ बाजूला ठेवू, पण काँग्रेसचे लोक फुटणे अधिक चिंताजनक आहे.

पहिल्यांदा महाराष्ट्रामध्ये हे घडले; आतातर राष्ट्रपतिपदाच्या  निवडणुकीतही क्रॉस व्होटिंग झाले. मोदींनी धोबीपछाड दिल्याने विरोधी पक्ष चारीमुंड्या चीत झाला. राजकारणातल्या बुद्धिबळाच्या खेळात विरोधी पक्षांकडे कोणतीही राजकीय चाल मुळात नव्हतीच. गोष्ट केवळ एवढीच नाही.  द्रौपदी मुर्मू यांना राष्ट्रपती भवनात नेऊन नरेंद्र मोदी मोठी चाल खेळले आहेत. मुर्मू राष्ट्रपती झाल्याने आदिवासी समाज तर खुश आहेच, शिवाय सामान्य लोकांनाही अतिशय आनंद झाला आहे. देशात ८.९ टक्के मतदार अनुसूचित जातीतील आहेत. पुढच्या दोन वर्षांत १८ राज्यात निवडणुका होत आहेत. त्यात ओडिशा, कर्नाटक, आंध्र प्रदेश, तेलंगणा, झारखंड, छत्तीसगड, गुजरात, राजस्थान आणि महाराष्ट्र या राज्यांचा समावेश आहे. या सर्व राज्यांत मिळून ३५०हून अधिक मतदार संघात अनुसूचित जातींचा चांगलाच प्रभाव आहे. २०२४ मध्ये लोकसभेच्या निवडणुका होतील. लोकसभेसाठी ४७ जागा अनुसूचित जातींसाठी आरक्षित आहेत. २०१९च्या निवडणुकीत त्यापैकी ३१ जागा भाजपला मिळाल्या होत्या. या जागा पुन्हा मिळवण्यासाठी तसेच आणखी जागा पदरात पाडून घेण्यासाठी द्रौपदी मुर्मू यांची निवड उपयोगी पडू शकते. याबरोबरच मुर्मू यांना राष्ट्रपती करून मोदींनी देशाची अर्धी लोकसंख्या असलेल्या महिलांचे मन जिंकले आहे. महिलांमध्ये मोदी पुष्कळच लोकप्रिय आहेत, याला आजवर अनेक पाहण्यांनी दुजोरा दिलेला आहे.. मुर्मू यांच्यामुळे ही पसंती आणखी वाढू शकते. अर्थातच द्रौपदी मुर्मू यांचे राष्ट्रपती होणे भारतीय लोकशाहीमध्ये समानता पाळली जाते याची पुष्टी करणारे आहे. जगात त्यामुळे भारताची प्रतिमा उंचावेल. नरेंद्र मोदी आणि अमित शाह या जोडीने कनिष्ठ स्तरातील राजकारणाला कायम अग्रभागी ठेवले आहे. पूर्वी भाजप हा पुढारलेल्यांचा पक्ष मानला जात होता. हे मिथक मोदी-शाह जोडीने तोडले आहे. मागच्या वेळी दलित समाजातून आलेले रामनाथ कोविंद आणि यावेळी द्रौपदी मुर्मू यांना सर्वोच्च स्थानी नेऊन बसवणे हा या ‘आयडेंटीटी पॉलिटिक्स’चाच भाग आहे. पक्षाला “शहरी” परिघाबाहेर काढून गाव आणि जंगलापर्यंत पोहोचवण्यात दोघांच्या या राजकीय शैलीने खूपच मदत केली आहे.

राजकारणात प्रत्येक जण आपापल्या रणनीतीने काम करील हे स्वाभाविकच होय. परंतु अखेर महत्त्व असते, ते देश पुढे जात राहण्याला! लोकशाही जिवंत राहिली पाहिजे. मला आपल्या लोकशाहीचा अभिमान आहे.

आदरणीय द्रौपदी मुर्मुजी यांचे स्वागत आणि खूप खूप शुभेच्छा !

(लेखक लोकमत एडिटोरियल बोर्ड आणि लोकमत समुहाचे चेअरमन आहेत)
 

Web Title: Draupadi murmu: Modi's washing; Opponents all over the place in president election, won drupadi murmu

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.