विशेष मुलाखत - पैसा आणि बळ वापरून लोकशाहीची हत्या सुरू आहे!

By ऑनलाइन लोकमत | Published: July 27, 2022 11:58 AM2022-07-27T11:58:29+5:302022-07-27T11:59:05+5:30

उपराष्ट्रपतिपदासाठी विरोधी पक्षांच्या उमेदवार मार्गारेट अल्वा यांची लोकमत समूहाचे वरिष्ठ संपादक शरद गुप्ता यांनी घेतलेली मुलाखत.

Democracy is being killed using money and force! Says margaret alva | विशेष मुलाखत - पैसा आणि बळ वापरून लोकशाहीची हत्या सुरू आहे!

विशेष मुलाखत - पैसा आणि बळ वापरून लोकशाहीची हत्या सुरू आहे!

Next

उपराष्ट्रपतिपदासाठी विरोधी पक्षांच्या उमेदवार मार्गारेट अल्वा यांची लोकमत समूहाचे वरिष्ठ संपादक शरद गुप्ता यांनी घेतलेली मुलाखत.

नेमक्या कोणत्या मुद्द्यांवर  आपण निवडणूक लढवत आहात?
घटनात्मक लोकशाही प्रक्रिया आणि संस्था वाचवणे, हा माझा सगळ्यात मोठा मुद्दा आहे. आज लोकशाही संकटात आहे.

मोदी सरकारला तर सतत लोकांचे समर्थन मिळते आहे, मग लोकशाही संकटात कशी? 
त्यांना कर्नाटकात बहुमत मिळाले होते का? मध्य प्रदेशात किंवा महाराष्ट्रात मिळाले होते का? लोकांनी निवडून दिलेली सरकारे भाजपा एकामागून एक पाडत आहे; आणि तेथे आपले सरकार स्थापन करत आहे. त्यांचे म्हणणे असे की, निवडणुकीत निवडून कोणीही येऊ द्या, सरकार आमचेच होईल. पैसा आणि बळ वापरून सरकारे स्थापन केली जात आहेत. राजकीय हितासाठी सीबीआय आणि ईडीचा दुरुपयोग केला जात आहे. लोकशाहीची हत्या होत असल्याने ती वाचवणे जरुरीचे आहे.

राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीच्या निकालाचा परिणाम उपराष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीवर होईल का? 
या निवडणुकीत मतदारांची संख्या पुष्कळच कमी असते. देशातले खासदार अधिक परिपक्व आणि समजदार आहेत. सर्वच पक्षातले खासदार सध्याची राजकीय परिस्थिती पाहून चिंतित आहेत. या निवडणुकीत आपल्याला धक्का देणारा निकाल पाहायला मिळेल, असा मला विश्वास वाटतो.

यशवंत सिन्हा यांना केवळ २०८ खासदारांचा पाठिंबा मिळाला. आपल्याला काय अपेक्षा आहेत? 
द्रौपदी मुर्मू या राष्ट्रपती होणाऱ्या पहिल्या आदिवासी महिला आहेत. अनेक पक्षातले आदिवासी आमदार आणि खासदार यांनी खुलेपणाने मत दिले. त्यामुळे सिन्हा यांना जितकी मते मिळायला पाहिजे होती तेवढी मिळाली नाहीत.

मग काँग्रेस पक्षाने इतक्या वर्षात एखाद्या आदिवासीला एवढ्या महत्त्वाच्या पदाची उमेदवारी न देऊन चूक केली का? 
तो एक स्वतंत्र प्रश्न आहे. काँग्रेसने के. आर. नारायणन यांच्या रूपात पहिला दलित राष्ट्रपती देशाला दिला. प्रतिभा पाटील यांच्या रूपाने पहिली महिला राष्ट्रपती, डॉक्टर झाकीर हुसेन यांच्या रूपात पहिला अल्पसंख्याक राष्ट्रपती दिला.

अल्पसंख्याक वर्गातील दक्षिण भारतीय महिला असल्याने आपल्याला यशवंत सिन्हा यांच्यापेक्षा जास्त मते मिळतील, असे वाटते का? 
सर्व पक्षात माझे मित्र आणि पाठीराखे आहेत. पक्षीय बंधने बाजूला ठेवून ते मला मत देतील, असा विश्वास वाटतो. गेली ५० वर्षे मी अत्यंत स्वच्छ असे सामाजिक जीवन जगले.

पण आता तर तृणमूल काँग्रेसने आपला पाठिंबा काढून घेतला आहे?
हे अत्यंत दुर्दैवी आहे, एवढेच मी म्हणू शकते.

मग आपली कामगिरी चांगली राहील, असे आपण कसे म्हणता? 
पूर्व आणि उत्तरेतल्या राज्यांपासून महाराष्ट्रापर्यंत मी काम केले आहे. माझी सासुरवाडी महाराष्ट्रातली आहे. माझे सासरे आणि सासूबाई स्वातंत्र्य सैनिक होते. दोघांनाही साडेतीन वर्षाचा कारावास झाला होता. एक आर्थर रोड तुरुंगात होते, तर दुसरे येरवड्याला. सासरे मुंबईचे शरीफ होते. मी स्वतः पाच वर्ष महाराष्ट्र काँग्रेसची प्रभारी महासचिव होते.

गेली सहा वर्षे आपण राजकारणात सक्रिय नव्हता. काँग्रेस पक्षातच होतात का? 
२००९ ते १४ राज्यपाल होते, तेव्हा मी काँग्रेसची सदस्य नव्हते. पण त्यानंतर पक्षाची सदस्य आहे. आता उपराष्ट्रपतिपदाची निवडणूक लढवण्यासाठी मी पक्ष सोडला आहे.

आपल्या आत्मचरित्रात काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांच्याबद्दल आपण पुष्कळ गोष्टी लिहिल्या आहेत, आपल्याला आजही तसेच म्हणायचे आहे? 
हे पहा, निवडणूक माझ्या पुस्तकाविषयी नाही. मी माझ्या पुस्तकाचा प्रचार करत नाही. त्याविषयी स्वतंत्रपणे पाहिजे तितका वेळ आपण बोलू शकतो. मी मागे हटणारी नाही. मी जे काही लिहिले आहे, त्याच्याशी आजही बांधील आहे. परंतु त्यातला काही भाग संदर्भ सोडून उद्घृत करणे योग्य नाही.

सोनिया गांधी यांच्याशी आपले नाते कसे आहे? 
सोनियाजींशी माझे आजही जवळचे नाते आहे. २००४ नंतर पक्षाच्या अध्यक्ष या नात्याने त्यांनी मला पाच वर्षे  पक्षाचे महासचिवपद दिले होते. आठ राज्यांची प्रभारी म्हणून मी काम पाहिले. आपल्याला यापेक्षा आणखी काय पुरावा पाहिजे?

Web Title: Democracy is being killed using money and force! Says margaret alva

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.