CoronaVirus: इन्फोडेमिक... कोरोनाच्या साथीपेक्षा काळजीत टाकणारी साथ

By ऑनलाइन लोकमत | Published: March 27, 2020 08:08 PM2020-03-27T20:08:25+5:302020-03-27T20:17:27+5:30

जगभर पसरलेल्या यंत्रणेमुळे चांगल्या माहितीबरोबर चुकीची माहिती किंवा अफवाही त्वरित जगभर जातात. इतकेच नाही तर या अफवा जिवंत राहतील असे संदेश सोशल मीडियावरून वारंवार दिले जातात.

CoronaVirus: spreading of wrong information via social media is a bog challenge | CoronaVirus: इन्फोडेमिक... कोरोनाच्या साथीपेक्षा काळजीत टाकणारी साथ

CoronaVirus: इन्फोडेमिक... कोरोनाच्या साथीपेक्षा काळजीत टाकणारी साथ

Next
ठळक मुद्देएखादी साथ पसरली की त्यामागोमाग त्या रोगाबद्दल अफवा आणि चुकीच्या माहितीच्या अनेक लाटा उसळतात.२०१९-एनकोव्हीड या विषाणूबाबतही हाच अनुभव येत आहे. सोशल मीडिया या जगभर पसरलेल्या यंत्रणेमुळे चांगल्या माहितीबरोबर चुकीची माहिती किंवा अफवाही त्वरित जगभर जातात.

>> प्रशांत दीक्षित

कोरोना विषाणूने बाधित रोगी निरनिराळ्या देशात सापडल्यानंतर जागतिक आरोग्य संघटनेने त्याला पेन्डेमिक, म्हणजे जागतिक साथ म्हणून घोषित केले. या विषाणूच्या साथीच्या पाठोपाठ या विषाणूबाबत व त्यातून होणाऱ्या आजाराबाबत चुकीची माहिती पसविणारी साथ (इन्फोडेमिक) जगभर पसरत चालली आहे हे आता जागतिक आरोग्य संघटनेच्या लक्षात आले आहे.

एखादी साथ पसरली की त्यामागोमाग त्या रोगाबद्दल अफवा आणि चुकीच्या माहितीच्या अनेक लाटा उसळतात, असा आजपर्यंतचा अनुभव आहे. यातील बहुतेक अफवा या माणसाला घाबरविणाऱ्या असतात. उत्क्रांतीच्या प्रवाहात माणसाची घडण अशी झाली आहे की धोकादायक वाटणाऱ्या गोष्टींकडे तो चटकन आकृष्ट होतो, इतकेच नाही तर ती गोष्ट त्याच्या बराच काळ लक्षात राहते. जंगलात राहताना स्वतःच्या अस्तित्वाच्या रक्षणासाठी माणसाला जी यातायात करावी लागली, त्यामध्ये क्षुल्लक धोक्याकडे दुर्लक्ष न करण्याची मानसिकता माणसामध्ये तयार झाली. जीवरक्षणासाठी आवश्यक असणारी ही रचना चुकीची माहिती मिळाली की माणसाला गलीतगात्र करते किंवा त्याचे मनोधैर्य खचविते, अनेकदा हिंसकही बनविते. मनोधैर्य खचले की त्याचा परिणाम माणसाच्या प्रतिकारशक्तीवर होतो. चिंता हे अनेक शारीरिक रोगांचे मूळ आहे असे म्हटले जाते त्यामागचे कारण हेच आहे.

कोरोनाबाबत अफवांवर विश्वास नको

कोरोनाचा सामना करताना पूर्वीची पथ्यं जरा आठवून पाहा ना!

२०१९-एनकोव्हीड या विषाणूबाबतही हाच अनुभव येत आहे. हा विषाणू कसा काम करतो यापासून त्याचा प्रसार कसा होतो, तो नष्ट कसा होतो, कोणत्या उपाययोजनांनी तो पिटाळून लावता येतो अशा अनेक बाबींवर माहितीचा महापूर लोटला आहे. हा विषाणू हवेत तरंगत असतो अशी अफवा उठते, तर वृत्तपत्रावर तो बसलेला असतो अशीही माहिती पुरविली जाते. विषाणू गोमुत्र वा यज्ञ केल्याने नष्ट होतो असे सांगितले जाते. आणखीही अनेक अशास्त्रीय उपाय सुचविले जातात. यातील काही उपाय निरुपद्रवी असतात व काही माणसाचे आरोग्य चांगले राखण्यासाठी मदत करणारेही असतात. परंतु, कोव्हीड विषाणूच्या संदर्भात ते शास्त्रीय नसतात हे लक्षात घेतले पाहिजे.

एखाद्या साथीबाबत चुकीची माहिती व अफवा पसरण्याच्या घटना प्राचीन काळापासून घडत आहेत. विज्ञान युगाची सुरुवात झाल्यापासूनही त्या कमी झालेल्या नाहीत. मात्र पूर्वीच्या घटना व आत्ताच्या घटना यामध्ये एक महत्वाचा फरक आहे. पूर्वी अफवा वा चुकीची माहिती ही लहानशा परिघात, थोड्या व्यक्तींमध्ये आणि काही ठरावीक स्रोतातून (सोर्स) मिळत असे. नंतर ती सावकाश समाजात पसरत जात असे वा विरून जात असे. चुकीची माहिती पसरण्याचा वेग कमी असल्याने त्याचा मुकाबला करणे सोपे जात होते.

महामारीने स्वत:च्या फेरमूल्यांकनाची संधी

कोरोना विरोधातील लढाईचे हे परिणाम कसे दुर्लक्षित करावे?

आता स्थिती तशी नाही. सोशल मीडिया या जगभर पसरलेल्या यंत्रणेमुळे चांगल्या माहितीबरोबर चुकीची माहिती किंवा अफवाही त्वरित जगभर जातात. इतकेच नाही तर या अफवा जिवंत राहतील असे संदेश सोशल मीडियावरून वारंवार दिले जातात. यातील चांगली वा शास्त्रीय माहिती सामान्य लोकांना फारशी आकर्षित करीत नाही. चुकीची माहिती मात्र वर दिलेल्या कारणांमुळे त्वरीत लक्ष खेचून घेते. या माहितीची आकृष्टता अधिक असल्याने माणूस या चुकीच्या माहितीनुसार कृती करतो व शास्त्रीय माहितीकडे दुर्लक्ष करतो.

जागतिक आरोग्य संघटनेच्या हेल्थ इमर्जन्सीस प्रोग्रामच्या प्रमुख सिल्व्ही ब्रायन यांनी लैन्सेट या आरोग्यविषयक मान्यवर प्रकाशनाशी बोलताना यातील एका महत्वाच्या पैलूकडे लक्ष वेधले आहे. माणसाला योग्य कृती करण्यास प्रेरणा देईल अशी माहिती दिली गेली पाहिजे. म्हणजे शास्त्रीय माहितीही अशी द्यावी की ज्यायोगे माणसे योग्य कृती करण्यास लगेच तयार होतील.

योग्य माहिती अयोग्य प्रकारे दिल्यास काय होते याचा अनुभव आपण २४ मार्च २०२०ला घेतला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशभरच्या लॉकडाऊनची घोषणा करताना नागरिकांना घरात राहण्याचे आवाहन केले. सोशल डिस्टंसिंग किती महत्त्वाचे आहे तेही सांगितले. त्यांच्या आवाहनात कळकळ होती, देशातील नागरिकांबद्दलची आस्था होती. या आस्थेपोटी आलेला काहीसा कठोरपणाही होता. मात्र ही माहिती देताना निरोगी माणसाचे जगण्याचे अग्रक्रम काय असतात याकडे लक्ष देण्यास विसरले. परिणामी त्यांच्या भाषणातून सामान्य निरोगी माणसांनी आरोग्याचा संदेश घेण्याऐवजी उद्या वस्तू मिळणार नाहीत असा चुकीचा संदेश घेतला. धोका दिसला की त्वरित कृती करण्याच्या सवयीनुसार लोकांनी सोशल डिस्टंसिंग विसरून दुकानांसमोर रांगा लावल्या. कारण एकदा बंदी आली की आवश्यक वस्तू मिळणेही कठीण जाते असा नागरिकांचा अनुभव होता.

या उदाहरणातून लक्षात येईल की योग्य माहितीमध्येही चुकीची माहिती दडलेली असू शकते किंवा चुकीच्या माहितीची छाया असते. आणि माणसाचा कल या छायेकडे आकृष्ट होण्याचा असतो. सोशल मीडियावर सध्या अनेकांचा धुमाकूळ सुरू असतो. त्यात प्रत्येकजण स्वतःला तज्ज्ञ समजतो. यातील अनेकजण माहिती व चुकीची माहिती याची बेमालूम भेसळ करतात. लिहिण्याचे कौशल्य असेल तर हे काम सफाईने होते. माहितीमध्ये राजकारणही मिसळले जाते आणि नको त्या पैलूवर फोकस केला जातो. माध्यमेही याबाबत तारतम्य पाळीत नाहीत, धास्ती वाढविण्याकडे त्यांचा कल असतो अशी तक्रार युनिसेफचे कार्लोस यांनी लैन्सेटकडे केली आहे.

इन्फोडेमिकची गंभीर दखल आता जागतिक आरोग्य संघटनेने घेतली आहे. त्यासाठी सहा विशेष कक्ष स्थापन केले आहेत. फेसबुक, ट्विटर, टीकटॉक यांच्याशी बोलून जागतिक आरोग्य संघटना योग्य माहिती देण्याची धडपड करीत आहे. कोव्हीडबद्दल कोणी विचारणा केली तर विश्वासार्ह स्रोताकडे त्याने जावे व विश्वासार्ह मार्गदर्शन त्याला मिळावे यासाठी तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येत आहे. गुगलने याबाबत बरीच मदत केली आहे.

आपला मुकाबला फक्त कोरोना या साथीच्या रोगाशी नाही तर चुकीच्या माहितीच्या साथीशी (इन्फोडेमिक) याच्याशी आहे हे प्रत्येकाने लक्षात ठेवावे. आपल्याकडे येत असलेली माहिती कोणत्या सोर्सकडून आलेली आहे, तो सोर्स किती विश्वासार्ह आहे, ही माहिती देण्यामागे त्याचा काय हेतू आहे हे सर्व तपासून मगच ती माहिती स्वीकारावी वा अन्य लोकांमध्ये प्रसारित करावी. अफवांचा धोका व विस्तार रोगापेक्षा मोठा असतो हे आता जागतिक आरोग्य संघटनाही मान्य करीत आहे.

Web Title: CoronaVirus: spreading of wrong information via social media is a bog challenge

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.