Coronavirus : कोरोनाबाबत अफवांवर विश्वास नको

By ऑनलाइन लोकमत | Published: March 25, 2020 12:17 AM2020-03-25T00:17:56+5:302020-03-25T00:21:09+5:30

साध्या सर्दी-खोकल्यापासून ते सार्स किंवा मर्स यांसारख्या गंभीर आजारांसाठी कोरोना विषाणू कारणीभूत असतात. आजाराची लक्षणे ही मुख्यत: श्वसनसंस्थेशी निगडित म्हणजेच इन्फ्लुएन्झा आजारासारखीच असतात.

Coronavirus: Don't believe the rumors about Corona | Coronavirus : कोरोनाबाबत अफवांवर विश्वास नको

Coronavirus : कोरोनाबाबत अफवांवर विश्वास नको

Next

- डॉ. अर्चना पाटील (संचालक, सार्वजनिक आरोग्य)

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने आवश्यक त्या प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात येत आहेत. कोरोना विषाणू आजाराबाबत सामाजिक माध्यमांद्वारे पसरणाऱ्या अफवांवर नागरिकांनी विश्वास ठेवू नये. गर्दीत जाणे टाळावे, तसेच सामाजिक शिष्टाचार पाळून दक्षता बाळगावी. परंतु भीती बाळगू नका.
साध्या सर्दी-खोकल्यापासून ते सार्स किंवा मर्स यांसारख्या गंभीर आजारांसाठी कोरोना विषाणू कारणीभूत असतात. आजाराची लक्षणे ही मुख्यत: श्वसनसंस्थेशी निगडित म्हणजेच इन्फ्लुएन्झा आजारासारखीच असतात. सर्दी, खोकला, श्वास घ्यायला त्रास होणे, न्युमोनिया, काहीवेळा मूत्रपिंड निकामी होणे अशी लक्षणे साधारणपणे आढळतात. सर्वसाधारणपणे हा आजार हवेवाटे शिंकण्यातून व खोकल्यातून जे थेंब बाहेर पडतात, त्यातून पसरतो. त्यामुळे रुग्णास त्याच्या लक्षणानुसार उपचार केले जात आहेत. आरोग्याच्या हितासाठी नागरिकांनी पुढील खबरदारी घ्यावी. श्वसनसंस्थेचे विकार असणाºया व्यक्तीशी संपर्क ठेवताना संसर्ग न होण्याची काळजी घ्यावी. हात वारंवार धुवावेत. शिंकताना, खोकताना नाका-तोंडावर रुमाल अथवा टिश्यूपेपर धरावा. अर्धवट शिजलेले खाऊ नये. फळे, भाज्या धुऊनच खाव्यात.
श्वसनास त्रास होणाºया व्यक्तींनी हा त्रास कोणत्या आजारामुळे होतो आहे हे स्पष्ट होत नाही. रुग्णाने बाधित देशात प्रवास केला असल्यास; तसेच प्रतिकारशक्ती कमी असलेल्या व्यक्ती आणि ज्यांनी नुकताच बाधित देशात प्रवास केला आहे, अशा व्यक्तींनी ताबडतोब वैद्यकीय सल्ला घ्यावा. कोरोना विषाणू आजाराच्या प्रतिबंध व नियंत्रणासाठी केंद्र सरकारच्या मदतीने महाराष्ट्रात विविध उपाययोजना राबविण्यात येत आहेत. बाधित देशांतून आलेल्या प्रवाशांचा पाठपुरावा करण्यात येत आहे. जे प्रवासी कोरोनाबाधित देशातून भारतात येत आहेत, त्यांना बाधित देशातून आलेल्या तारखेपासून पुढील १४ दिवस विलगीकरण करून ठेवावे. त्यांच्यामध्ये कोरोना आजारसदश लक्षणे निर्माण झाली आहेत किंवा कसे, याबाबत दैनंदिन विचारणा करण्यात येते. याशिवाय अशी लक्षणे आढळल्यास त्यांनी स्वत:हून आरोग्य विभागात कळवण्याबाबतदेखील प्रत्येक प्रवाशास सूचित करण्यात येत आहे. दैनंदिन पाठपुराव्यात एखाद्या प्रवाशामध्ये संशयित कोरोना आजाराची लक्षणे आढळल्यास त्याला विलगीकरण कक्षात भरती करण्यात येत आहे.
नवीन कोरोना विषाणू आजाराच्या रुग्ण निदानाची व्यवस्था राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्था (एनआयव्ही) पुणे येथे करण्यात आली आहे. संशयित रुग्ण कोणास म्हणावे, याबाबत जागतिक आरोग्य संघटनेने सुस्पष्ट सूचना दिलेल्या असून, त्यांचे पालन करण्यात येत आहे. यासाठी अनेक ठिकाणी नव्याने प्रयोगशाळा सुरू करण्यात आल्या आहेत.
कोरोनासंदर्भात अर्धवट माहिती असणारे, चुकीचे, भीती उत्पन्न करणारे संदेश कोणीही सोशल मीडियावर पाठवू नयेत. आवश्यक असल्यास हेल्पलाईनला फोन करून शंका निरसन करून घ्यावे. सर्दी, ताप, खोकला या लक्षणांनुसार रुग्णांवर उपचार केले जात असून सर्वांनी रोगप्रतिकारशक्ती वाढण्यासाठी प्रयत्न करावेत. गर्दीत जाणे टाळावे. वारंवार हात धुवावा. शिंकणे, खोकल्यातून बाहेर पडणाºया थुंकीच्या वाटे या विषाणूचा प्रसार होत असल्यामुळे खोकताना, शिंकताना नाका- तोंडावर रुमाल ठेवावा व सामाजिक शिष्टाचार पाळावेत. सर्वसामान्य नागरिकांच्या कोरोनाविषयक शंका- समाधानासाठी टोल फ्री क्रमांक-१०४ उपलब्ध करून देण्यात आला आहे. याशिवाय संचालक, आरोग्य सेवा पुणे कार्यालयात कोरोना नियंत्रण कक्ष स्थापन (०२० -२६१२७३९४) करण्यात आहे.
(शब्दांकन - वृषाली पाटील)

Web Title: Coronavirus: Don't believe the rumors about Corona

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.