लेख: ‘चित्रकार व्हायचं तर असंच जगायला हवं’, हे ठसत गेलं!..
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 25, 2026 11:01 IST2026-04-25T11:00:42+5:302026-04-25T11:01:56+5:30
ख्यातकीर्त चित्रकार प्रभाकर बरवे यांच्या कार्याचा मागोवा घेणारा ‘बरवे संचित’ हा ग्रंथ चिन्ह प्रकाशनाने नुकताच प्रकाशित केला आहे. या निमित्ताने या ग्रंथाचे संपादक, चित्रकार सतीश नाईक यांच्याशी खास संवाद.

लेख: ‘चित्रकार व्हायचं तर असंच जगायला हवं’, हे ठसत गेलं!..
ख्यातकीर्त चित्रकार प्रभाकर बरवे यांच्या कार्याचा मागोवा घेणारा ‘बरवे संचित’ हा ग्रंथ चिन्ह प्रकाशनाने नुकताच प्रकाशित केला आहे. या निमित्ताने या ग्रंथाचे संपादक, चित्रकार सतीश नाईक यांच्याशी खास संवाद.
‘बरवे संचित’ हा ग्रंथ नेमका कोणत्या जाणिवेतून जन्माला आला?
- प्रभाकर बरवे यांच्याशी माझा परिचय १९८१ मध्ये झाला. त्याच सुमारास मला राज्य पुरस्कार मिळाला. त्यावेळी बरवे परीक्षक होते. त्यांनी विचारलं, ‘तुम्ही कुठे राहता?’ मी म्हटलं, चुनाभट्टीला. ते म्हणाले, ‘अरे, मी तुमच्या मागेच शिवसृष्टीत राहतो. या कधीतरी.’ तिथून आमचा परिचय वाढत गेला. मी त्यांच्या घरी गेलो की त्या डायऱ्या वाचत असे. त्यातील चित्रं आणि मांडणी पाहून अक्षरशः थक्क व्हायचो. मीही डायरी लिहायचो; पण अशा प्रकारे दृश्य आणि शब्द यांचा संगम करता येतो, याची कल्पना नव्हती. हळूहळू त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा प्रभाव गडद होत गेला. बरवे सातत्याने वाचत, लिहीत आणि चित्रं काढत. ते खरे विचारवंत होते. त्यांच्या जगण्याची, वागण्याची, बोलण्याची शैली इतकी प्रभावी होती की ‘चित्रकार व्हायचं तर असंच जगायला हवं’, असं मनात ठसत गेलं. त्या जाणिवेतूनच पुढे ‘बरवे संचित’ साकारलं.
प्रभाकर बरवे यांच्या चित्रशैलीत एक विशिष्ट ‘मौन’ जाणवते. ते का?
- ते बोलकेही होते आणि तितकेच अबोलही. सतत चिंतनात मग्न असत. सकाळी उठले की थेट त्यांच्या स्टुडिओत जात. स्टुडिओ म्हणजे त्यांचं बेडरूम. दार बंद करत. मग बाहेरच्या जगाशी संपर्क तुटलेला. जेवणाच्या वेळीच बाहेर येत. तोपर्यंत ते चित्रकलेत किंवा विचारांत गढलेले असत. त्यांच्या पत्नीचं एक सुंदर वाक्य आहे- ‘ते पेंटिंग करत असत, आणि पेंटिंग करत नसतानाही ते पेंटिंगच करत असत.’ हेच त्यांच्या ‘मौन’ भाषेचं सार आहे. ते अत्यंत एकाग्रतेने कॅनव्हासकडे पाहत बसत- जणू एखादा योगी ध्यानधारणेत. त्यांची रेषा, रंगसंगती हे सगळं या अंतर्मुख प्रक्रियेतून जन्माला येत असे. रात्री झोप येत नसे, दम्याचा त्रास होता. त्यामुळे ते गॅलरीत बसून डायरी लिहीत. दिवसातील आठ-दहा तास जणू मौनातच असत. आणि जेव्हा चित्र काढत, तेव्हा फक्त कॅनव्हासशी संवाद साधत. ‘आकार’ आणि ‘अवकाश’ ही त्यांच्या चित्रांची मुख्य थीम. त्या अवकाशातच हे मौन प्रतिबिंबित होतं.
बरवे यांच्या कलाकृतींमध्ये परंपरा आणि आधुनिकतावाद यांचा संगम कसा आकार घेतो?
- बनारसमधील वास्तव्याचा त्यांच्यावर मोठा प्रभाव होता. त्या प्राचीन शहरातील भिंती, आकृत्या, दृश्यं हे सगळं त्यांच्या चित्रात उतरलं. १९७१-७२ नंतर त्यांच्या चित्रभाषेत बदल दिसतो तो अत्यंत विचारपूर्वक. त्यांच्या डायऱ्यांमध्ये आजूबाजूच्या जीवनाच्या नोंदी आहेत. घरासमोरून जाणारी रेल्वे, दुधी भोपळा, घरातील वस्तू, लोकरीचे गोंडे, पाइपलाइन, बकऱ्या हे सगळं त्यांच्या चित्रात येतं. त्यांची निरीक्षणशक्ती विलक्षण होती. खड्ड्यातील चंद्राचं प्रतिबिंब, बसमधील फुलपाखरू, दवबिंदू, दुर्वा हेही त्यांनी चित्रात आणलं. पाश्चात्त्य स्टुडिओ पेंटिंग आणि भारतीय रागमाला परंपरेचा त्यांनी सुंदर संगम साधला. व्हिव्हर्स सर्व्हिस सेंटरमध्ये काम करताना त्यांना विपुल वाचनसामग्री मिळाली. त्या अभ्यासातूनच त्यांच्या चित्रांमध्ये भारतीयत्व सहज उमटलं. एखाद्या कलावंतांचा शोध घ्यायचा असेल, तर त्याची शब्दं आणि चित्रं दोन्ही महत्त्वाची असतात. दुर्दैवाने या डायऱ्यांकडे दुर्लक्ष झालं. ‘कोरा कॅनव्हास’ प्रकाशित झालं, ही मोठी गोष्ट; पण त्यानंतर फारसं काही झालं नाही.
बरवे यांच्या चित्रांतून कविता डोकावते...
- ते विपुल वाचन करत. पाश्चात्त्य साहित्य वाचत आणि मित्रांशी चर्चा करत. स्वतःही कविता लिहीत. ‘सत्यकथा’मध्ये त्यांची ‘किमया’ ही सात पानी दीर्घ कविता प्रसिद्ध झाली होती. मुळात कवी असो वा चित्रकार- तो कलावंतच. माध्यम वेगळं असतं. जे चित्रात व्यक्त होत नाही, ते शब्दांत येतं. बरवे यांच्या बाबतीत हे स्पष्ट दिसतं.
आजच्या डिजिटल युगात त्यांची ध्यानमग्न कला कितपत सुसंगत वाटते?
- ती अभिजात आहे, चिरंतन आहे. काळ बदलला तरी माणसाची मूलभूत प्रवृत्ती बदलत नाही. मोठे कलावंत शतकातून एक-दोनच जन्माला येतात. या कलेसाठी त्याग, एकाग्रता आणि संघर्ष आवश्यक आहे. डिजिटल युगाने हे बदलणार नाही. ‘कोरा कॅनव्हास’सारखी पुस्तकं अभ्यासक्रमात यायला हवी होती. पण तसं झालं नाही. या पुस्तकातून कुणीतरी प्रेरित होईल, काहीतरी करेल हीच अपेक्षा. मी निराशावादी नाही, संवाद सुरू राहणं महत्त्वाचं.