दृष्टिकोन : लोकमत पर्यावरणोत्सव, पक्षी संवर्धनाच्या दिशेने पहिले पाऊल!

By ऑनलाइन लोकमत | Published: February 20, 2020 03:12 AM2020-02-20T03:12:25+5:302020-02-20T10:45:02+5:30

संपूर्ण देशभरात पक्ष्यांची व्यवस्थित व पद्धतशीर नोंद करण्याचे फ्लॅटफॉर्म

Approach: Lokmat environmental festival, first step towards bird conservation! | दृष्टिकोन : लोकमत पर्यावरणोत्सव, पक्षी संवर्धनाच्या दिशेने पहिले पाऊल!

दृष्टिकोन : लोकमत पर्यावरणोत्सव, पक्षी संवर्धनाच्या दिशेने पहिले पाऊल!

Next

संजय करकरे 

भारतातील पक्ष्यांच्या स्थितीचा नुकताच प्रसिद्ध झालेला अहवाल देशातील एकूण पक्ष्यांच्या संरक्षण आणि संवर्धनाच्या दिशेने पहिले पाऊल टाकणारा आहे, असे म्हणणे योग्य होईल. आज भारतात साधरणपणे १,३०० जातींच्या पक्ष्यांची नोंद झाली आहे. त्यातील निम्म्या प्रजाती आपल्या राज्यात आहेत. विविध परिसंस्थेत या पक्ष्यांच्या जाती विखुरल्या आहेत. एखाद्या परिसंस्थेचे द्योतक म्हणूनही या पक्ष्यांकडे बघितले जाते. माळढोक, तणमोर ही अत्यंत समर्पक अशी उदाहरणे आहे. गेल्या तीन दशकांत माळरानावर ज्या गतीने आक्रमण झाले, त्या गतीने या पक्ष्यांवर संक्रांत आली. आज हे पक्षी काही शेकड्यात आले अन् संकटग्रस्त म्हणून नोंदले गेले. सर्व पक्ष्यांची स्थिती थोडी-फार अशाच प्रमाणात असल्याची नोंद या अहवालातून अधिक ठळक झाली. देशातील ८६७ जातींच्या पक्ष्यांचा सुमारे १५ हजारांहून अधिक पक्षी निरीक्षकांनी केलेल्या नोंदी आणि यासाठी देशातील व परदेशातील नामांकित संस्था एकत्रित येतात, तेव्हा या अहवालाचे गांभीर्य तेवढेच वाढलेले असते.

Image result for maaldhok

संपूर्ण देशभरात पक्ष्यांची व्यवस्थित व पद्धतशीर नोंद करण्याचे फ्लॅटफॉर्म असलेल्या ‘ई-बर्ड’चा येथे पुरेपूर वापर केला आहे. पक्ष्यांच्या संवर्धनाच्या दृष्टीने विचार करायचा झाल्यास १०१ प्रजातींकडे अधिक लक्ष देण्याची गरज आहे, ३१९ पक्ष्यांच्या प्रजातींना मध्यम, तर ४४२ पक्ष्यांच्या प्रजातींना कमी संवर्धनाची गरज आहे. पक्ष्यांच्या संख्येचा कल, त्याचे आढळ क्षेत्र याचाही या अहवालात बारकाईने समावेश केल्याने त्याची स्थिती काय, हेही लक्षात येते. उदाहरण चिमणी, मोराचे घेता येईल. चिमण्यांची संख्या खूप कमी झाली आहे. मोबाइल टॉवरचा परिणाम या जातीवर झाला आहे, अथवा कीटकांची संख्या घसरल्याने ही प्रजाती नष्ट होऊ लागल्याचे सांगितले जात होते, परंतु या अहवालात २५ वर्षांच्या नोंदींचा आकडा घेऊन देशातील या पक्ष्याची स्थिती, स्थिर अथवा वाढत असल्याचे म्हटले आहे. बंगळुरू, चेन्नई, दिल्ली, हैदराबाद, कोलकाता व मुंबई या महानगरांत या चिमण्यांची संख्या कमी झाली असली, तरी हा पक्षी ग्रामीण, अर्धशहरी भागात विपुल संख्येने दिसत असल्याचा हा अहवाल सांगतो. या अहवालात मोरांची संख्या, त्याचे आढळ क्षेत्र मोठ्या प्रमाणावर वाढल्याचे पुढे आले आहे. योग्य संरक्षण, तसेच काही राज्यांत त्याच्याकडे संस्कृतीचे प्रतीक म्हणून बघितल्यामुळे या राष्टÑीय पक्ष्याची संख्या वाढल्याचे दिसून आले आहे. या अहवालात देशातील राज्यानुसारही पक्ष्यांच्या प्रजातींकडे लक्ष देण्याची गरज अधोरेखित केली आहे. महाराष्टÑाचा विचार केला, तर ब्रॉड टेल ग्रासबर्ड, फॉरेस्ट आलुलेट, ग्रेट नॉट, निलगिरी वूड पिजन, ग्रीन मुनिया, यलो फ्रंटेड पाइड वूड पेकर, कॉमन पोचार्ड, वुली नेक स्टॉर्क, शॉर्ट होड स्नेक इगल, क्रिस्टेड ट्री स्विफ्ट, स्मॉल मिनिव्हेट, सफस-फ्रंटेड प्रिनिया, कॉमन वूडश्राईक या पक्ष्यांची नोंद झाली आहे. ज्यांच्या संवर्धनाचा विचार करण्याची गरज आहे.

Image result for maaldhok
पक्ष्यांच्या वैशिष्ट्यपूर्ण प्रजातींनुसार विचार केला, तर शिकारी पक्ष्यांचा वर्ग बिकट परिस्थितीतून जात असल्याचा हा अहवाल सांगतो. खासकरून गिधाडांच्या बहुसंख्य प्रजातींची १९९० नंतर झालेली पडझड येथे प्रतिबिंबित झाली आहे. पाणपक्ष्यांचा दीर्घकालीन विचार केला, तर येथेही पक्ष्यांची संख्या घटल्याचे दिसून येते. वर्षभर आपल्याकडे दिसणारी जांभळी पाणकोंबडी, करकोचे, कूट, तर समुद्र किनारी दिसणारे स्थलांतरित गल्स व टर्न, तसेच स्थलांतरित बदकांच्या जातीही घसरल्याचे दिसते. खास करून गेल्या ५ वर्षांत स्थानिक पाणपक्ष्यांच्या संख्येतील घट, संवर्धनासाठी गरजेचे असल्याचे म्हटले आहे. या अहवालात पक्ष्यांच्या विविध खाद्यांच्या प्रकारावरून त्यांचे वर्गीकरण केले आहे. पाने-बिया, मिश्र आहारी, फळ, मध खाणारे, कीटकभक्षी, तर मांसभक्षी असे हे वर्गीकरण आहे. यातील पक्ष्यांची स्थिती सर्वसाधारणपणे घसरणीकडे आहे. आकाराने मोठे असलेले अनेक पक्षी सतत नजरेसमोर असतात, पण लहान आकाराच्या फिन्स व्हिवर, ग्रीन मुनिया, नागा व्रिन बॅब्लर, इंडियन आॅलिव्ह बुलबुलसारख्या पक्ष्यांकडे अतिशय दुर्लक्ष होते. या पक्ष्यांची स्थिती बिकट आहे. या अहवालातील शिफारसींना अत्यंत महत्त्व आहे. पक्ष्यांची स्थिती काय, हे पुढे आले, आता त्यांच्या संवर्धनाच्या दृष्टीने उपाययोजना करण्यासाठी शासनकर्ते, धोरण ठरविणारे संशोधक, सर्वसामान्य लोक यांची भूमिका महत्त्वाची ठरते. एक टप्पा झाला. आता या देखण्या, अद्भुत घटकाबद्दल पुढील महत्त्वपूर्ण वाटचाल झाली, तरच तो दीर्घकाळ या सृष्टीत आपल्याला बघायला मिळेल. अगदी तसेच होईल, अशी आशा करू या.

Image result for maaldhok

(लेखक बीएनएचएस, नागपूर येथे सहा.संचालक आहेत )

Web Title: Approach: Lokmat environmental festival, first step towards bird conservation!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.