शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
2
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
3
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
4
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
5
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
6
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
7
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
8
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
9
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
10
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
11
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
12
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
13
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
14
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
15
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
16
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
17
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
18
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
19
टी-२० इंटरनॅशनलमध्ये या विक्रमाची केवळ बरोबरीच होऊ शकते; मोडणं अशक्य! केवळ २ गोलंदाजांनाच जमलाय हा अद्भुत चमत्कार
20
हवाई प्रवास स्वस्त होणार? विमानाच्या इंधनात इथेनॉल मिश्रणास केंद्राची मंजुरी...
Daily Top 2Weekly Top 5

पुन्हा २३ नोव्हेंबर! आताही असेच काही घडले तर?

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 23, 2024 07:50 IST

राजभवनाकडे सगळी सूत्रे जातील का, अपक्ष ‘किंगमेकर’ ठरतील का, नवे सरकार कोणाचेही आले तरी अजित पवार त्यात असतील का, एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले नाहीत तर काही वेगळा निर्णय  घेतील का, असे प्रश्नोपनिषद सध्या सुरू आहे.

२३ नोव्हेंबर म्हटले की मराठी माणसाला लगेच आठवण येते ती २३ नोव्हेंबर २०१९ ची. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होणार आणि सरकार महाविकास आघाडीचे येणार, असे जवळजवळ स्पष्ट झाले होते. २३ नोव्हेंबरच्या सगळ्या दैनिकांची हेडलाइनच ती होती. पण, वर्तमानपत्रासोबतच एक ताजी बातमी भल्या सकाळी येऊन धडकली. देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी पहाटे शपथ घेतली. शरद पवारांना सोडून अजित पवार भाजपसोबत गेले. तोवर भूकंपाची सवय झालेला महाराष्ट्र या बातमीने पार हादरला. 

ते सरकार औटघटकेचे ठरले आणि महाविकास आघाडी सरकार लगेच स्थापन झाले. ‘सुबह का भुला’ परत आल्याने अजित पवार त्या सरकारमध्ये पुन्हा उपमुख्यमंत्री झाले. यथावकाश तेही सरकार कोसळले! पहाटेच्या त्या आठवणी आजही उगाळल्या जात असताना, नेमक्या या २३ नोव्हेंबरलाच महाराष्ट्र विधानसभेचा निकाल लागतो आहे. युती वा आघाडीला स्पष्ट बहुमत मिळून लगोलग सरकार स्थापन होईल की मागच्या निवडणुकीनंतर घडले तसेच नाट्य पुन्हा घडेल? 

राजभवनाकडे सगळी सूत्रे जातील का, अपक्ष ‘किंगमेकर’ ठरतील का, नवे सरकार कोणाचेही आले तरी अजित पवार त्यात असतील का, एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले नाहीत तर काही वेगळा निर्णय  घेतील का, असे प्रश्नोपनिषद सध्या सुरू आहे. मागच्या निवडणुकीत भाजप आणि शिवसेना यांची निवडणूकपूर्व आघाडी होती, मात्र निकालानंतर ठाकरेंनी भाजपला ‘जय महाराष्ट्र’ केले. आताही असेच काही घडले तर?  एक नक्की, की निकालाचा अंदाज येत नाही. लोक भांबावलेले आहेत.  ‘एक्झिट पोल’ आल्यावर तर गोंधळ जास्तच वाढला! 

लोकसभा निवडणुकीत संविधान आणि गद्दारी हे दोन मुद्दे प्रमुख होते. विधानसभा निवडणुकीत संविधानाचा मुद्दा फार चालणार नव्हताच, पण गद्दारी हा  अगदी राज्याचा मुद्दाही या निवडणुकीत फारसा दिसला नाही. पक्षांची तोडफोड लोकांना न आवडल्यामुळे शरद पवार - उद्धव ठाकरे यांच्याविषयी सहानुभूती तयार झाली हे  खरे असले तरी ते काही या निवडणुकीचे ‘नॅरेटिव्ह’ होऊ शकले नाही. 

लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडी आक्रमक होती, तर महायुती बचावाच्या स्थितीत. या निवडणुकीत ‘लाडकी बहीण’च्या मुद्द्याने बराच अवकाश व्यापला. तरीही तीन ‘सी’वर या निवडणुकीत चर्चा झाली. कास्ट, क्रॉप आणि कॅश! जातीवर ही निवडणूक लढवली गेली. सोयाबीनसह इतर शेतमालाच्या भावाचा मुद्दा पुढे आला. 

‘कॅश’ अर्थात बहिणींच्या खात्यात जमा झालेले पैसे आणि निवडणुकीत वाटले गेलेले पैसे यावर बरीच चर्चा झाली. प्रत्यक्षात मतदारांच्या मनात काय आहे, याचा अंदाज मात्र आलेला नाही.  जिथे हरियाणासारख्या छोट्या राज्यातले अंदाज चुकतात, तिथे महाराष्ट्रासारख्या एवढ्या मोठ्या आणि वैविध्य असलेल्या राज्याबाबत आडाखे बांधणे आणखी कठीण. 

या निवडणुकीत मतांची टक्केवारी वाढल्याने हा अधिकचा टक्का कोणाच्या फायद्याचा याविषयीची उत्कंठा कायम आहे. मुळात ही निवडणूकच अभूतपूर्व. मुख्यमंत्रिपदाचा दावा करू शकतील, असे सहा प्रमुख पक्ष आजवर निवडणुकीच्या रिंगणात कधीच नव्हते. त्यात पुन्हा तिसरी आघाडी. शिवाय, वंचित बहुजन आघाडी, मनसे, एमआयएम असे महत्त्वाचे पक्ष. कोण कोणाच्या विरोधात आहे आणि कोण कोणत्या पक्षात आहे, हे समजू नये, एवढा कोलाहल या निवडणुकीत होतं.  त्यामुळे राज्यस्तरावर असे कोणतेही ‘नॅरेटिव्ह’ तयार होऊ शकले नाही. 

मराठवाड्यातील जरांगे आंदोलनाचा परिणाम, ओबीसी राजकारणाला मिळालेला आकार आणि प्रामुख्याने विदर्भ-मराठवाड्यातील सोयाबीनचा मुद्दा वगळता निवडणूक स्थानिक संदर्भातच लढवली गेली. सगळीकडे ‘लाडकी बहीण’ तर दिसलीच आणि महिलांच्या मतांचा टक्काही वाढला. 

एकूण काय, ही महाराष्ट्राची निवडणूक नव्हती, तर २८८ स्वतंत्र लढती पाहायला मिळाल्या. सगळीकडे होणारे मतांचे विभाजन एवढे जाणवत होते की अनेक ठिकाणी अगदी काट्याची टक्कर असणार, हे स्पष्ट आहे. बऱ्याच नेत्यांच्या अस्तित्वाची ही लढाई आहे. 

देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे, अजित पवार असोत की, शरद पवार वा उद्धव ठाकरे! या निवडणुकीने या नेत्यांचे राजकारण वेगळे वळण घेणार आहे. उमेदवारांचे भवितव्य मतदान यंत्रात बंद झाले, असे म्हणण्याची प्रथा आहे. खरे सांगायचे तर, महाराष्ट्राचे भवितव्य आज ठरणार आहे. ‘महाराष्ट्राविना राष्ट्रगाडा न चाले’ अशा महाराष्ट्राच्या या निकालावर देशाच्या राजकारणाची फेरमांडणी अवलंबून आहे!

टॅग्स :maharashtra assembly election 2024 resultमहाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४MahayutiमहायुतीMahavikas Aghadiमहाविकास आघाडीBJPभाजपा