रेमडेसिवीर इंजेक्शन साठा तपासणीसाठी पथक जिल्हाधिकारी : काळाबाजार केल्यास होणार कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2021 04:37 IST2021-04-07T04:37:20+5:302021-04-07T04:37:20+5:30

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हा प्रशासन आरोग्य विभागाच्या माध्यमातून सर्वंकष प्रयत्न करीत आहे. धुळे जिल्ह्यात कोरोना विषाणूबाधित अत्यवस्थ रुग्णांवर ...

Squad Collector for Remedesivir Injection Stocks | रेमडेसिवीर इंजेक्शन साठा तपासणीसाठी पथक जिल्हाधिकारी : काळाबाजार केल्यास होणार कारवाई

रेमडेसिवीर इंजेक्शन साठा तपासणीसाठी पथक जिल्हाधिकारी : काळाबाजार केल्यास होणार कारवाई

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हा प्रशासन आरोग्य विभागाच्या माध्यमातून सर्वंकष प्रयत्न करीत आहे. धुळे जिल्ह्यात कोरोना विषाणूबाधित अत्यवस्थ रुग्णांवर उपचारासाठी आवश्यक रेमडेसिवीर इंजेक्शनचा पुरेसा साठा शासकीय रुग्णालयांबरोबरच बाजारात देखील उपलब्ध झाला आहे. या इंजेक्शनचा काळजीपूर्वक वापर करावा. त्याचा गैरवापर होणार नाही याची दक्षता वैद्यकीय व्यावसायिकांनी घ्यावी. त्यासाठी वैद्यकीय व्यावसायिकांच्या संघटनांनी जनजागृतीसाठी पुढे यावे, असे आवाहन जिल्हाधिकारी संजय यादव, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. माणिक सांगळे यांनी केले आहे.

धुळे जिल्ह्यात कोरोना विषाणूबाधित रुग्णांची संख्या वाढत आहे. यापैकी काही रुग्ण खरोखरच अत्यवस्थ आहेत. त्यातील काहींना कोविडच्या औषधोपचाराच्या मार्गदर्शक सूचनांनुसार रेमडेसिवीर या इंजेक्शनची आवश्यकता भासू शकते. मात्र, धुळे जिल्ह्यात रेमडेसिवीर या इंजेक्शनचा सर्रास वापर सुरू झाल्याचे निदर्शनास आले आहे. त्यातून मागील काही दिवसांत कृत्रिम तुटवडा जाणवला होता. मात्र, आता तशी परिस्थिती नाही. शासकीय रुग्णालयांसह औषध विक्रेत्यांकडे या इंजेक्शनचा साठा उपलब्ध झाला आहे. मंगळवारी पुरेसा साठा उपलब्ध झाला असून बुधवारी आणखी इंजेक्शनचा साठा उपलब्ध होणार आहे.

या इंजेक्शनचा अतिवापरसुद्धा धोकादायक ठरू शकतो, असे वैद्यकीय क्षेत्रातील जाणकारांचे म्हणणे आहे. या इंजेक्शनचा साठा करून कोणी काळाबाजार करीत असेल, तर ते गैर आहे. कोविडमध्ये तरी मानवतेच्या भावनेतून कुणीही असा प्रकार करू नये. कोविडबाधित गरजू रुग्णाला इंजेक्शन मिळावे म्हणून जिल्हा प्रशासन प्रयत्नशील आहे. रुग्णाच्या नातेवाईकांनीही आवश्यक असेल, तरच रेमडेसिवीर या इंजेक्शनचा आग्रह धरावा. तसेच रेमडेसिवीर इंजेक्शनच्या साठा तपासणीला अन्न व औषध प्रशासनाने पोलिसांच्या सहकार्याने सुरुवात केली आहे. यात दोषी आढळणाऱ्यांविरुद्ध नियमाप्रमाणे कारवाईच्या सूचना देण्यात आल्या आहेत, असे जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.

Web Title: Squad Collector for Remedesivir Injection Stocks