ठेकेदाराला काळ्या यादीत टाकण्याचा ठराव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2021 04:33 IST2021-03-24T04:33:58+5:302021-03-24T04:33:58+5:30

धुळे : शालेय पोषण आहारात निकृष्ट डाळीचा पुरवठा केल्याप्रकरणी संबंधित ठेकेदाराला काळ्या यादीत टाकण्याचा ठराव जिल्हा परिषदेच्या शिक्षण समितीने ...

Resolution to blacklist the contractor | ठेकेदाराला काळ्या यादीत टाकण्याचा ठराव

ठेकेदाराला काळ्या यादीत टाकण्याचा ठराव

धुळे : शालेय पोषण आहारात निकृष्ट डाळीचा पुरवठा केल्याप्रकरणी संबंधित ठेकेदाराला काळ्या यादीत टाकण्याचा ठराव जिल्हा परिषदेच्या शिक्षण समितीने केला आहे. तसेच पोषण आहाराच्या मालवाटप गाडीत वजन काटा असावा, असे आदेशही या बैठकीत देण्यात आले. वनावल गटाच्या जिल्हा परिषद सदस्या तथा जिल्हा परिषदेच्या क्रीडा व शिक्षण समिती सदस्या अभिलाषा भरत पाटील यांनी सोमवारी झालेल्या बैठकीत शालेय पोषण आहाराचा प्रश्न उपस्थित केला. तत्पूर्वी त्यांनी शिक्षण समिती सभापती आणि शिक्षणाधिकाऱ्यांना निवेदन दिले. निवेदनात म्हटले आहे की, दोन आठवड्यांपूर्वी झालेल्या जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत तसेच शिक्षण समितीच्या सभेत अभिलाषा पाटील यांनी तक्रार केली होती. धुळे जिल्ह्यात आणि विशेषकरून शिरपूर तालुक्यात किती शाळांमध्ये निकृष्ट डाळ आढळली आणि त्या डाळीचे पुढे काय केले, संबंधित ठेकेदारावर काय कारवाई केली, याबाबत लेखी माहिती मागितली. तसेच चांगल्या प्रतीची दुसरी डाळ येईपावेतो पुरवठा बंद करावा, संपूर्ण चाैकशी अहवाल मिळावा, अशी मागणी त्यांनी केली.

शालेय पोषण आहाराचे धान्य गोण्यांमध्ये येते. त्याच्यावर कोणतीही तारीख नसते. एक्सपायरी डेट नसते. वजनाचा उल्लेख नसतो. त्यामुळे फसवणूक होण्याची शक्यता नाकारता येत नाही. अंगणवाडीचा पोषण आहार ज्याप्रमाणे प्रत्येकाला स्वतंत्र पाकिटात मिळतो त्याप्रमाणे शालेय पोषण आहारदेखील बंद पाकिटात मिळावा, शाळकरी मुलामुलींना चांगल्या प्रतीचा शालेय पोषण आहार मिळावा, अशी मागणी अभिलाषा पाटील यांनी केली आहे.

Web Title: Resolution to blacklist the contractor