Bank Employee Salary Hike: देशातील सरकारीबँकांच्या कर्मचाऱ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. अर्थ मंत्रालयाने सर्व सार्वजनिक क्षेत्रातील बँकांना, वेतन सुधारणेची (Wage Revision) प्रक्रिया वेळेत सुरू करावी आणि पुढील १२ महिन्यांच्या आत ती पूर्ण करावी, असे निर्देश दिले आहेत. बँक कर्मचाऱ्यांचं वेतन आणि सुविधा वेळेवर अपडेट करण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आलंय. यामुळे लवकरच सरकारी बँक कर्मचाऱ्यांच्या पगारात वाढ होऊन त्यांना मोठी खुशखबर मिळू शकते.
नोव्हेंबर २०२७ पासून नवीन वेतन श्रेणी लागू होणार
सरकारी बँकांमधील कर्मचारी आणि अधिकाऱ्यांसाठी पुढील वेतन सुधारणा १ नोव्हेंबर २०२७ पासून लागू होणं निश्चित आहे. भारतात सामान्यतः बँका आणि विमा कंपन्यांमध्ये दर ५ वर्षांनी वेतन सुधारणा केली जाते. या प्रक्रियेला 'बाय-पार्टाइट सेटलमेंट' असं म्हटलं जातं, ज्यामध्ये बँक व्यवस्थापन आणि कर्मचारी संघटना यांच्यात वाटाघाटी होतात.
वाटाघाटींची प्रक्रिया
या प्रक्रियेत 'इंडियन बँक्स असोसिएशन' (IBA) कर्मचारी संघटना आणि असोसिएशनसोबत चर्चा करते. दोन्ही पक्ष मिळून सर्वांना मान्य असेल असा करार तयार करतात. अर्थ मंत्रालयानं यावेळी स्पष्ट केलंयकी, चर्चा वेळेवर सुरू व्हावी आणि ती ठरवून दिलेल्या मुदतीत पूर्ण व्हावी, जेणेकरून कोणताही विलंब होणार नाही. वेतन कराराला उशीर झाल्यामुळे कर्मचाऱ्यांच्या मनोबलावर परिणाम होऊ शकतो आणि कामाच्या ठिकाणी असंतुलन निर्माण होऊ शकतं, असं सरकारचं मत आहे.
भारतीय बँकिंग क्षेत्राची मजबूत स्थिती
सध्या सार्वजनिक क्षेत्रातील बँकांची कामगिरी अत्यंत उत्कृष्ट आहे. गेल्या काही वर्षांत या बँकांनी विक्रमी नफा कमावला आहे. आर्थिक वर्ष २०२३ मध्ये जिथे एकूण नफा १.०५ लाख कोटी रुपये होता, तो २०२४ मध्ये वाढून १.४१ लाख कोटी रुपये आणि २०२५ मध्ये १.७८ लाख कोटी रुपयांपर्यंत पोहोचला आहे. कर्जाची उत्तम गुणवत्ता, कर्जाच्या वितरणात झालेली वाढ, मजबूत भांडवली स्थिती आणि मालमत्तेवर मिळणारा चांगला परतावा ही या सुधारणेमागील प्रमुख कारणं आहेत.
बँकांच्या बॅलन्स शीट पूर्वीपेक्षा अधिक मजबूत झाल्या आहेत. सप्टेंबर २०२५ च्या अखेरीस 'ग्रॉस एनपीए' कमी होऊन २.३०% या विक्रमी नीचांकी पातळीवर आलाय.
