हिरे रुग्णालयातील प्रयोगशाळेत नवीन यंत्रसामुग्री

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2021 04:37 IST2021-04-09T04:37:59+5:302021-04-09T04:37:59+5:30

जिल्हाधिकारी : रेमडेसिव्हर इंजेक्शनचा गैरवापर टाळण्याचे आवाहन धुळे : कोरोना विषाणूच्या चाचण्या, कोविड रुग्णालयातील दरफलक, जम्बो कोविड ओपीडी, रेमडेसिव्हर ...

New machinery in the laboratory at Diamond Hospital | हिरे रुग्णालयातील प्रयोगशाळेत नवीन यंत्रसामुग्री

हिरे रुग्णालयातील प्रयोगशाळेत नवीन यंत्रसामुग्री

जिल्हाधिकारी : रेमडेसिव्हर इंजेक्शनचा गैरवापर टाळण्याचे आवाहन

धुळे : कोरोना विषाणूच्या चाचण्या, कोविड रुग्णालयातील दरफलक, जम्बो कोविड ओपीडी, रेमडेसिव्हर इंजेक्शनचे वितरण, बेड मॅनेजमेंट, लसीकरण, ऑक्सिजन, मनुष्यबळाचे नियोजन आदींसाठी उपजिल्हाधिकारी दर्जाचा अधिकारी नियुक्त करण्यात आला आहे. हे अधिकारी संबंधित यंत्रणांकडून माहिती घेवून एकत्रित अहवाल सादर करतील, अशी माहिती जिल्हाधिकारी संजय यादव यांनी दिली. तसेच हिरे रुग्णालयाच्या प्रयोगशाळेत नवीन यंत्रसामुग्री कार्यान्वित झाल्याने चाचण्यांची संख्या वाढविण्याचे आदेश त्यांनी दिले.

जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून कोरोना विषाणूच्या रुग्णांची संख्या वाढत आहे. ही गंभीर बाब आहे. या विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सर्वांनी सामूहिक प्रयत्न करणे आवश्यक आहेत. पायाभूत सोयीसुविधांचा विस्तार करीत औषधे आणि ऑक्सिजनचा पुरेसा साठा उपलब्ध करून ठेवावा. उपलब्ध मनुष्यबळाचा परिपूर्ण वापर करावा, असे निर्देश जिल्हाधिकारी संजय यादव यांनी दिले आहेत.

जिल्हाधिकारी कार्यालयातील सातपुडा सभागृहात गुरुवारी दुपारी कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.

जिल्हाधिकारी म्हणाले, चाचण्यांची संख्या वाढवावी. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील प्रयोगशाळेत नवीन यंत्रसामग्री कार्यान्वित करण्यात आली आहे. त्यामुळे धुळे शहराबरोबरच ग्रामीण भागातूनही मोठ्या संख्येने चाचण्या कराव्यात. फेरीवाल्यांच्या नियमितपणे चाचण्या करून घ्याव्यात. रेमडेसिव्हर या इंजेक्शनचा कोविड बाधित गरजू रुग्णांनाच लाभ व्हावा म्हणून या औषधाचा अनावश्यक आणि गैरवापर टाळला पाहिजे. त्यासाठी वैद्यकीय व्यावसायिकांच्या संघटनांनी पुढे यावे. रेमडेसिव्हर औषधाचे सुरळीत वितरणासाठी आवश्यकता भासल्यास पोलिस दलाची मदत घ्यावी. याशिवाय कोविड केअर सेंटर, डेडिकेटेड कोविड हेल्थ सेंटर येथेही पोलिस दलाची मदत घ्यावी, असेही निर्देश त्यांनी केले.

जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वान्मथी सी. म्हणाल्या, साक्री, पिंपळनेर, शिंदखेडा येथे ऑक्सिजन युक्त बेडची निर्मिती करण्यात येणार आहे. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी ग्रामीण भागात जनजागृती करण्यात येत आहे.

या बैठकीला पोलीस दलासह सर्व विभागांचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.

Web Title: New machinery in the laboratory at Diamond Hospital