महिला आरक्षणाच्या सोडतीकडे लक्ष लागून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 22, 2021 04:32 IST2021-03-22T04:32:45+5:302021-03-22T04:32:45+5:30

रिक्त झालेल्या जागांसाठी लवकरच पोटनिवडणूक होण्याची शक्यता आहे. तत्पूर्वी या जागांचे आरक्षण काढणे गरजेचे आहे. राज्य निवडणूक आयोगाने बुधवारी ...

Focusing on the draw of women's reservation | महिला आरक्षणाच्या सोडतीकडे लक्ष लागून

महिला आरक्षणाच्या सोडतीकडे लक्ष लागून

रिक्त झालेल्या जागांसाठी लवकरच पोटनिवडणूक होण्याची शक्यता आहे. तत्पूर्वी या जागांचे आरक्षण काढणे गरजेचे आहे. राज्य निवडणूक आयोगाने बुधवारी सर्वसाधारण गटातील महिला आरक्षण सोडतीची तारीख जाहीर केलेली आहे. या निर्णयानुसार जिल्हा परिषदेच्या १५ पैकी ८ गट व पंचायत समितीच्या ३० पैकी १६ गण हे महिलांसाठी राखीव ठेवण्यात येणार आहे.

धुळे तालुक्यातील ११ गटांमधील ज्या सदस्यांचे सदस्यत्व रद्द झाले हाेते त्यात सहा पुरुष व पाच महिलांचा समावेश आहे. आता तालुक्यातील सहा जागा या महिलांसाठी राखीव होण्याची शक्यता आहे. शिंदखेडा तालुक्यातील चारपैकी दोन जागा या महिलांसाठी राखीव होण्याची शक्यता आहे. शिंदखेडा तालुक्यात चार पैकी तीन जागांवर महिला सदस्यांचा विजय झालेला होता.

दरम्यान खरी कसोटी पंचायत समितीच्या गणांमध्ये लागणार आहे. कारण धुळे तालुक्यातील ८ पैकी चार, साक्रीतील ९ पैकी ५, शिंदखेड्यातील ५ पैकी ३, व शिरपूरमधील ८ पैकी चार जागा या महिलांसाठी जागा राखीव असतील.

गट-गणांचे आरक्षण बदलले तरी त्याचा फटका सदस्यांना बसू शकतो अशी चिन्हे आहेत. कारण सदस्यत्व रद्द झाल्याबरोबर काही सदस्यांनी पोटनिवडणुकीच्यादृष्टीनेही तयारी सुरू केली होती. गट-गणातील अनेकजागा महिलांसाठी आरक्षित राहणार आहेत. त्यामुळे अनेकांची संधी हुकण्याची शक्यता वर्तविण्यात येऊ लागली आहे.

दरम्यान आपल्या गट-गणाचे आरक्षण महिलांसाठी राखीव निघाले तर काही सदस्य आपल्याऐवजी महिला सदस्याला पुढे करण्याची शक्यता नाकारता येत नाही. मात्र या आरक्षण सोडतीमुळे काहींच्या उमेदवारीवर गंडातर येऊ शकते. आता कोणकोणते गट-गण आरक्षित होतात, याकडे राजकीय क्षेत्राचे लक्ष लागून आहे.

Web Title: Focusing on the draw of women's reservation