अनलॉकमध्येही शाळा राहणार तूर्त ‘लॉक’च

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 11, 2021 04:24 AM2021-06-11T04:24:55+5:302021-06-11T04:24:55+5:30

कोरोनाचा फटका इतर क्षेत्रासोबतच शिक्षण क्षेत्रालाही मोठ्या प्रमाणात बसलेला आहे. वेळोवेळी झालेले लॉकडाऊन व जनता कर्फ्यू यामुळे ठराविक दिवस ...

Even in Unlock, the school will be locked immediately | अनलॉकमध्येही शाळा राहणार तूर्त ‘लॉक’च

अनलॉकमध्येही शाळा राहणार तूर्त ‘लॉक’च

Next

कोरोनाचा फटका इतर क्षेत्रासोबतच शिक्षण क्षेत्रालाही मोठ्या प्रमाणात बसलेला आहे. वेळोवेळी झालेले लॉकडाऊन व जनता कर्फ्यू यामुळे ठराविक दिवस बाजारपेठ, दुकाने बंद राहिली. मात्र, प्राथमिक शाळांचे ‘कुलूप’ सव्वा वर्षापासून काही उघडण्यात आले नाही.

गेल्या वर्षी शाळा सुरू झाल्या नसल्या तरी ऑनलाईन शिक्षण प्रक्रिया राबविण्यात आली. मात्र, त्याचा फायदा विद्यार्थ्यांना फारसा झालेला नाही. दिवाळीनंतर पहिल्या टप्प्यात ९वी ते १२पर्यंतच्या माध्यमिक शाळा ५० टक्के उपस्थितीने सुरू झाल्या. मात्र, विद्यार्थ्यांची उपस्थिती खूपच कमी होती. त्यानंतर पाचवी ते आठवीचे वर्ग सुरू झाले. त्यांचीही अवस्था तीच होती, तर पहिली ते चौथीपर्यंतचे वर्ग वर्षभर भरलेच नाहीत.

दरम्यान, यावर्षी मार्च महिन्यापासूनच कोरोनाची दुसरी लाट आली. ही लाट पहिल्या लाटेपेक्षा जास्त भयानक असल्याने, राज्य शिक्षण मंडळाने प्राथमिक, माध्यमिकच्याच नव्हे तर दहावी, बारावीच्या बोर्डाच्या परीक्षाही रद्द केल्या. त्यामुळे गेल्या वर्षीप्रमाणे यावर्षीही प्राथमिक व माध्यमिकच्या विद्यार्थ्यांना सरसकट पुढील वर्गात प्रवेश देण्यात आला. १ मेपासून शाळांना सुटी लागली. ही सुटी १३ जूनपर्यंत आहे.

दरम्यान, कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे राज्य शासनाने १४ एप्रिल रोजी रात्री ८ वाजल्यापासून राज्यात लॉकडाऊन जाहीर केले. टप्प्या-टप्प्याने हे लॉकडाऊन १५ जूनपर्यंत वाढविण्यात आल्याने, शाळा सुरू होणार नाहीत, असा समज होता. मात्र, कोरोना बाधितांचा पॅाझिटिव्हिटी रेट कमी झाल्याने, राज्य शासनाने काही जिल्ह्यांमध्ये अनलॉक करण्यास परवानगी दिली. त्यानुसार धुळे जिल्ह्यातही ७ जूनपासून अटी-शर्थींवर सर्व व्यवहार सुरू करण्यास परवानगी दिली आहे.

आठ दिवस अगोदरच ‘अनलॉक’ झाल्याने, विद्यार्थ्यांच्याही आशा पल्लवित झालेल्या होत्या. १४ जूनपासून शाळेची ‘घंटा’ वाजेल, अशी अपेक्षा होती. मात्र, या अपेक्षेवर आता पाणी फेरले आहे. शाळा सुरू करण्यासंदर्भात शिक्षण विभागाला अद्याप कुठल्याही सूचना प्राप्त झालेल्या नाहीत. त्यामुळे विद्यार्थ्यांना अजून काही दिवस शाळा सुरू होण्याची प्रतीक्षा करावी लागणार हे मात्र निश्चित.

शाळा सुरू करण्यासंदर्भात अद्याप कुठलेही आदेश नाहीत. शासनाकडून स्पष्ट आदेश आल्यानंतरच पुढील कार्यवाही केली जाईल.

- मनीष पवार,

शिक्षणाधिकारी, प्राथमिक

Web Title: Even in Unlock, the school will be locked immediately

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.