बाजारपेठेत पुन्हा उसळली गर्दी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 14, 2021 11:06 PM2021-04-14T23:06:12+5:302021-04-14T23:06:19+5:30

संचारबंदीची पूर्वसंध्या, जीवनावश्यक वस्तूंची मोठ्या प्रमाणावर खरेदी

Crowds re-emerged in the market | बाजारपेठेत पुन्हा उसळली गर्दी

बाजारपेठेत पुन्हा उसळली गर्दी

Next

धुळे : कोरोनाचा वाढणारा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लॉकडाऊन घोषित करण्यात आलेला आहे. बुधवारी रात्री आठ वाजल्यापासून पुढील १५ दिवस संपूर्ण राज्यात संचारबंदी लागू करण्यात आलेली आहे. त्या पार्श्वभूमीवर शहरातील बाजारपेठ गजबजली होती. जीवनावश्यक वस्तूंची खरेदी मोठ्या प्रमाणावर करण्यात आल्याने एका दिवसात हजारोंची उलाढाल झाली. बाजारपेठेसह आग्रा रोडवर पुन्हा गर्दी उसळली होती. बसस्थानकात देखील परतीच्या प्रवास करणाऱ्यांनी गर्दी केली होती.

कोरोनाचा दिवसेंदिवस प्रादुर्भाव वाढत आहे. राज्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्यामुळेही चिंताजनक बाब आहे. या पार्श्वभूमीवर राज्य शासनाकडून विविध प्रकारचे निर्बंध लावले जात आहेत. त्याची अंमलबजावणी स्थानिक पातळीवरून करण्याच्या सूचना देण्यात आल्या. त्यानुसार जिल्ह्यात ५ एप्रिल ते ३० एप्रिलपर्यंत रात्रीची संचारबंदी लागू करण्यात आली. त्यात वीकेंड लॉकडाऊन सुरू करण्यात आल्याने शुक्रवारी रात्री ८ ते सोमवारी सकाळी ७ वाजेपर्यंत जीवनावश्यक वस्तू वगळता संपूर्ण लॉकडाऊनचे आदेश देण्यात आले होते. आता त्यात बदल करण्यात आला आहे. त्यात आता बुधवारी रात्री ८ वाजेपासून पुढील १५ दिवसांसाठी संचारबंदी लागू करण्यात आली आहे. त्यामुळे बाजारात वस्तू घेण्यासाठी गर्दी उसळली होती.

आग्रा रोड गजबजला

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी वीकेंड लॉकडाऊन प्रशासनाने घोषित केल्यामुळे शनिवार आणि रविवार असे दोन दिवस शहरात पूर्णपणे लॉकडाऊन होता. सर्वच प्रकारची व्यापारी प्रतिष्ठाने बंदच होती. परिणामी रस्ते निर्मनुष्य दिसून आले. त्यानंतर आग्रा रोडवर दोन दिवस गर्दी कमी-अधिक असल्याचे दिसून आले होते. बुधवारी मात्र या गर्दीत प्रचंड वाढ झाली होती. १५ दिवस संचारबंदी असल्यामुळे दैनंदिन गरजेच्या वस्तू मिळतील का नाही अशी शंका मनात घेऊन अनेकांनी बाजारपेठ गाठली होती.

किराणा दुकानांमध्ये रेलचेल

संचारबंदी लागल्यानंतर आपले हाल होऊ नये म्हणून शहरातील लहान-मोठ्या किराणा दुकानांमध्ये नेहमीपेक्षा जास्तच गर्दी दिसून आली. यात दैनंदिन गरजेच्या किराणाच्या वस्तूंची खरेदी झाली. त्यात हजारो रुपयांचा किराणा मालाची विक्री झाली.

लाखोंची उलाढाल

कोरोना असला तरी त्याचे कोणत्याही प्रकारचे सोयरसुतक न मानता बिनधास्तपणे नागरिकांनी गावात गर्दी केली होती. दैनंदिन गरजेच्या वस्तूंसह चैनीच्या वस्तूंची खरेदी नागरिकांनी केल्यामुळे लाखो रुपयांची उलाढाल बाजारपेठेत झाली. बुधवारी सायंकाळी उशिरापर्यंत रस्त्यांवर आणि दुकानांवर गर्दी कायम होती. दोन दिवस शांत असलेला आग्रा रोड बुधवारी सकाळपासून पूर्ण क्षमतेने गजबजलेला दिसून आला. त्यात पायी जाणाऱ्या नागरिकांसह दुचाकी व रिक्षांनी देखील आपली एंट्री घेतल्याने वाहतुकीच्या कोंडीत अधिकच भर पडलेली दिसून आली. परिणामी पायी चालणेही मुश्कील झाले होते.

परतीच्या प्रवाशांचीही गर्दी

लॉकडाऊन आणि त्यात पुन्हा १५ दिवसांची संचारबंदी शासनाने लागू केलेली आहे. यात वाहतूक व्यवस्था सुरळीत असली तरी ती बंद झाली तर आपण आपल्या गावी जाणार कसे? असा प्रश्न मनात घेऊन धुळ्यातील बसस्थानकात गर्दी झाली होती. बसमध्ये जाण्यासाठी अक्षरश: रांगाच लागल्या होत्या. काही मार्गावर जादा बसेस सोडण्याची वेळ स्थानिक प्रशासनावर आली होती, तर नेहमीच्या मार्गावर जाणाऱ्या बसेससुद्धा प्रवाशांनी भरलेल्या असल्याचे दिसून आले.

Web Title: Crowds re-emerged in the market

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.