७ लाख ९७ हजार बालकांना मिळणार जंतनाशकाची गोळ्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 1, 2021 04:42 AM2021-03-01T04:42:07+5:302021-03-01T04:42:07+5:30

धुळे जिल्ह्यात १ मार्च रोजी राष्ट्रीय जंतनाशक दिनानिमित्त ७ लाख ९७ हजार ६७४ बालकांना जंतनाशक गोळी देण्यात येणार आहे. ...

7 lakh 97 thousand children will get deworming tablets | ७ लाख ९७ हजार बालकांना मिळणार जंतनाशकाची गोळ्या

७ लाख ९७ हजार बालकांना मिळणार जंतनाशकाची गोळ्या

Next

धुळे जिल्ह्यात १ मार्च रोजी राष्ट्रीय जंतनाशक दिनानिमित्त ७ लाख ९७ हजार ६७४ बालकांना जंतनाशक गोळी देण्यात येणार आहे. या मोहिमेची ग्रामीण व शहरी भागात ४१ प्राथमिक आरोग्य केंद्र, २३२ उपकेंद्र, २ उपजिल्हा रुग्णालय, १३ मनपाचे दवाखाने, २,२४६ अंगणवाडी, १,८४८ शासकीय व खासगी शाळांमार्फत गाेळ्यांचे वाटप केले जाणार आहे.

देशात ६८ टक्के बालकांमध्ये आढळणारा आतड्यांचा कृमी दोष हा मातीतून प्रसारित होणाऱ्या जंतांमुळे होतो. देशात २८ टक्के बालकांना कृमीदोष होण्याची शक्यता असते. त्याची प्रमुख कारणे म्हणजे वैयक्तिक व परिसर स्वच्छतेचा अभाव असणे आहे. या कृमी दोषांचा संसर्ग दूषित मातीच्या संपर्कात आल्यामुळे होतो. बालकांमध्ये होणारा दीर्घकालीन कृमी दोष हा व्यापक स्वरूपाचा असून, मुलांना कमकुवत करणारा आहे. कृमी दोष हा रक्ताक्षय आणि कुपोषणाचे कारण आहे, शिवाय बालकांची बौद्धिक व शारीरिक वाढ खुंटण्याचे कारण ठरते. देशात ६ ते ५९ महिने वयोगटांतील प्रत्येकी दहा बालकांमागे सात बालकांमध्ये रक्ताक्षय आढळतो. ग्रामीण भागात हे प्रमाण जास्तही असू शकते, तसेच १५ ते १९ वर्षे वयोगटांतील किशोरवयीन मुलींमध्ये व ३० टक्के किशोरवयीन मुलांमध्ये रक्ताक्षय आढळतो.

देशात पाच वर्षांखालील सुमारे ५० टक्के बालके वाढ खुंटलेली आहेत. साधारणतः ४३ टक्के बालके कमी वजनाची आहेत. राष्ट्रीय जंतनाशकाचा उद्देश १ ते १९ वर्षे वयोगटांतील सर्व पूर्व शालेय वयोगटांतील मुलांना शाळा व अंगणवाडी केंद्र स्तरावर जंतनाशक गोळी देऊन त्यांचे आरोग्य चांगले ठेवणे, पोषणस्थिती, शिक्षण व जीवनाचा दर्जा उंचावणे हा आहे. जंतनाशक मोहिमेची अंमलबजावणी १ मार्च, २०२१ व ८ मार्च, २०२१ रोजी करण्यात येणार आहे.

तालुकास्तरावर मोहिमेंतर्गत शाळेतील नोडल शिक्षकांना शिक्षणाधिकारी व तालुका आरोग्य अधिकारी यांच्यामार्फत प्रशिक्षण देण्यात आले आहे, तसेच प्राथमिक आरोग्य केंद्रात वैद्यकीय अधिकारी यांनी आशा, अंगणवाडी कार्यकर्ती, आरोग्यसेवक, आरोग्यसेविका, आरोग्य पर्यवेक्षक व इतर सर्व आरोग्य कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण दिलेले आहे. १ मार्च रोजी जिल्ह्यातील ७ लाख ९७ हजार ६७४ बालकांना सर्व शासकीय शाळा, शासकीय अनुदानित शाळा, खासगी शाळा, तसेच अंगणवाडी केंद्र, आश्रमशाळा येथे जेवणानंतर जंतनाशक गोळीचा लाभ देण्यात येणार आहे. गोळी ही जेवण करूनच घ्यावी. या कार्यक्रमामध्ये सार्वजनिक आरोग्य विभागाबरोबर शिक्षण विभाग, महिला व बालविकास विभागाचा सहभाग आहे. या दिवशी जंतनाशक गोळी दिली गेली नाही, तर अशा बालकांना ८ मार्च रोजी मॉप-अप दिनी जेवणानंतर ही गोळी देण्यात येणार आहे.

या मोहिमेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी संजय यादव, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वान्मथी सी., जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.नवले, जिल्हा माता बालसंगोपन अधिकारी डॉ. शिवचंद्र सांगळे यांनी केले आहे.

Web Title: 7 lakh 97 thousand children will get deworming tablets

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.