येळकोट येळकोट जय मल्हार....
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 7, 2021 04:30 IST2021-02-07T04:30:05+5:302021-02-07T04:30:05+5:30
अणदूर नगरी दुमदुमली : श्री खंडोबाचे उत्साहात स्वागत, सव्वादहा महिने राहणार अणदुरात वास्तव्य अणदूर : मैलारपुरातील पावने दोन महिन्यांचे ...

येळकोट येळकोट जय मल्हार....
अणदूर नगरी दुमदुमली : श्री खंडोबाचे उत्साहात स्वागत, सव्वादहा महिने राहणार अणदुरात वास्तव्य
अणदूर : मैलारपुरातील पावने दोन महिन्यांचे वास्तव्य संपल्यानंतर रूढी - परंपरेनुसार श्री खंडोबाचे शनिवारी पहाटे चार वाजता अणदूर येथे आगमन झाले. यावेळी अणदूरकरांनी फटाक्यांची आतषबाजी करीत येळकोट, येळकोट जय मल्हार असा जयघोष केला. तसेच हलगीच्या तालावर आणि वारूंच्या भक्तिरसावर वाजत - गाजत पालखी मंदिरात नेण्यात आली. यावेळी महिला भक्तांनी श्री खंडोबास पंचारती ओवाळून औक्षण केले. आता पुढील सव्वादहा महिने श्री खंडोबाचे अणदूरमध्ये वास्तव्य राहणार आहे.
तुळजापूर तालुक्यातील अणदूर आणि नळदुर्ग ही दोन वेगवेगळी गावे. रुढी परंपरेनुसार मैलारपूर (नळदुर्ग) मधील पावणेदोन महिन्यांचे वास्तव्य शुक्रवारी संपले आणि श्री खंडोबाचे अणदूरकडे जाण्याचे वेध लागले. शुक्रवारी रात्री १२ वाजण्याच्या सुमारास दोन्ही गावच्या मानकऱ्यांचे तसेच पालखीसोबत जाणाऱ्या भाविकांचे मैलारपुरात आगमन झाले. यावेळी मंदिराच्या गाभाऱ्यात दोन्ही गावच्या प्रमुख मानकऱ्यांना मानपान देण्यात आला. यानंतर देवाच्या मूर्तीच्या अदान-प्रदानाबाबत लेखी करार होऊन तो करार सर्वांसमक्ष मोठ्याने वाचून दाखविण्यात आला. रात्री दीडच्या सुमारास श्री खंडोबा देव अणदूरकडे मार्गस्थ झाले.
यानंतर दोन वाजता श्री खंडोबाची मुख्य मूर्ती पालखीत ठेवून दोन घोड्यांसह वाजत-गाजत अणदूरकडे मार्गस्थ झाली.
पहाटे चार वाजता मूर्तीचे अणदूरमध्ये आगमन झाले. पालखी मंदिराच्या पश्चिम प्रवेशद्वाराजवळ येताच पुजारी समाजातील महिलांनी श्रींचे औक्षण केले आणि नंतर पालखी मंदिरात आली. त्यानंतर मूर्तीची अणदूरच्या मंदिरात विधिवत प्रतिष्ठापना करण्यात आली. मंत्रोच्चारात पंचारती झाल्यानंतर काकडाआरती होऊन देवाची मूर्ती दर्शनासाठी खुली करण्यात आली. येथून पुढील सव्वादहा महिने श्री खंडोबाचे वास्तव्य अणदूरमध्ये राहणार आहे.
चौकट........
दर्शनासाठी भाविकांची गर्दी
देव येणार म्हणून अणदूरकरांनी भल्या पहाटे उठून घरासमोर सडा सारवण करून रांगोळी घातली होती. पालखी वेशीत येताच फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली. महिलांनी ठिकठिकाणी औक्षण सुरू केले. हलगीच्या तालावर वारू बेधुंद होऊन नाचत होते. हा सोहळा पाहण्यासाठी आणि पालखीचे दर्शन घेण्यासाठी मोठी गर्दी झाली होती. अनेकांनी हातात पेटत्या दिवट्या घेऊन येळकोट, येळकोट असा जयघोष केल्याने अणदूर नगरी दुमदुमून गेली होती.