अस्वच्छतेमुळे आरोग्याचा प्रश्न बनला गंभीर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 12, 2021 04:21 IST2021-07-12T04:21:07+5:302021-07-12T04:21:07+5:30
(फोटो : अविनाश ईटकर ११) सोनारी : ‘स्वच्छ भारत.. स्वच्छ गाव’चा नारा देत आपले शहर व गाव स्वच्छ ठेवण्याबाबत ...

अस्वच्छतेमुळे आरोग्याचा प्रश्न बनला गंभीर
(फोटो : अविनाश ईटकर ११)
सोनारी : ‘स्वच्छ भारत.. स्वच्छ गाव’चा नारा देत आपले शहर व गाव स्वच्छ ठेवण्याबाबत शासन-प्रशासनाकडून आवाहन करण्यात येते. मात्र, परंडा तालुक्यातील सोनारी गावाची वाटचाल ही तेवढ्याच झपाट्याने अस्वच्छतेकडे होत असल्याने ग्रामस्थांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
एकीकडे कोरोनाची धास्ती अन् गावात ठिकठिकाणी अस्वच्छतेच्या साम्राज्यामुळे भविष्यात कोरोनाच्या प्रादुर्भावास थांबविताना इतर आजारांची लागण होण्याची शक्यता अधिक निर्माण झाली आहे. सोनारी ग्रामपंचायतीला स्वच्छतेसाठी निधी तर मिळतो; मात्र तो निधी खरोखरच स्वच्छतेच्या कामावर किती खर्च होतो का, असा प्रश्न सद्य:स्थिती पाहिल्यानंतर उपस्थित होत आहे. अनेक भागातील नाल्या घाणीने तुडुंब भरलेल्या असून, ते घाणपाणी रस्त्यावर वाहताना दिसते. कचरा अस्ताव्यस्त पसरून रोगाला आमंत्रण मिळत आहे. सध्या पावसाळ्याचे दिवस आहेत. पावसाच्या साचलेल्या दूषित पाण्यामुळे अनेक साथीचे रोग पसरण्याची शक्यता नाकारता येत नाही. शिवाय, नकळत दूषित पाणी प्यायले जाते. यातून जुलाब, उलटी, टायफाइड, गॅस्ट्रो, विषाणू, जीवाणूंचे आजार होण्याची शक्यता आहे.
ठिकठिकाणी खड्ड्यात साचणारे पाणी व नाल्या साफसफाई करून रोगराई पसरण्याच्या अगोदरच ग्रामपंचायतने काळजी घ्यावी, अशी अपेक्षा नागरिकांमधून व्यक्त केली जात आहे.