डोक्यावर कर्जाचा बोजा त्यात अतिवृष्टीने हातचं पीक गेल्याने दोन शेतकऱ्यांनी संपवलं जीवन
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 3, 2025 18:33 IST2025-10-03T18:32:42+5:302025-10-03T18:33:35+5:30
धाराशिव आणि मानवत तालुक्यांतील घटना, कर्जाचाही दोघांवर बोजा

डोक्यावर कर्जाचा बोजा त्यात अतिवृष्टीने हातचं पीक गेल्याने दोन शेतकऱ्यांनी संपवलं जीवन
धाराशिव/परभणी : अतिवृष्टीमुळे पिकांचे झालेले नुकसान आणि कर्जबाजारीपणामुळे मराठवाड्यात दोन शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याच्या घटना घडल्या. तीन एकर शेतातील साेयाबीनचा चिखल झाला. त्यामुळे डाेक्यावरील कर्ज फेडू कसे, असे म्हणत धाराशिव तालुक्यातील वाखरवाडी येथील एका ५५ वर्षीय शेतकऱ्याने विष घेतले. त्यांना तातडीने येथील रुग्णालयात दाखल केले परंतु, उपचार सुरू असतानाच गुरुवारी (दि. २) सकाळी त्यांचा मृत्यू झाला. दुसऱ्या घटनेत परभणी जिल्ह्यातील मानवत तालुक्यातील मानोली गावातील ३७ वर्षीय शेतकऱ्यानेही विष घेऊन आपले जीवन संपवले.
वाखरवाडी येथील मयत शेतकऱ्याचे नाव पाेपट पवार असे आहे. त्यांना अवघी तीन एकर शेतजमीन हाेती. याच जमिनीतून मिळणाऱ्या उत्पन्नातून ते आपल्या पाचजणांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवत. खरीप हंगामात त्यांनी संपूर्ण शेतात साेयाबीन केले हाेते. पीकही जाेमदार आले हाेते. त्यामुळे यंदा कर्जाची परतफेड करून चार पैसे हाती उरतील, असे ते कुटुंबीयांना नेहमी सांगत हाेते. असे असताना मागील आठ दिवसांत झालेल्या अतिवृष्टीमुळे काढणीला आलेल्या साेयाबीनचा चिखल झाला. त्यामुळे कर्जाची परतफेड करण्यासाेबतच कुटुंबाच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न त्यांच्यासमाेर उभा ठाकला. याच विवंचनेतून त्यांनी विषारी द्रव प्राषण केले. कुटुंबीयांनी तातडीने त्यांना येथील रुग्णालयात दाखल केले. मात्र, प्रकृती गंभीर बनल्याने गुरुवारी सकाळी त्यांची प्राणज्याेत मालवली. ही घटना कळताच रुग्णालय परिसरात थांबलेल्या मुलांसह कुटुंबीयांनी अक्षरशः हंबरडा फाेडला. त्यांच्या पश्चात पत्नी, दाेन मुलं, मुलगी असा परिवार आहे. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच आमदार कैलास पाटील यांनी रुग्णालयात दाखल हाेत कुटुंबीयांना धीर देत सांत्वन केले. शेतकरी आत्महत्येची आठवडाभरातील जिल्ह्यातील ही दुसरी घटना आहे.
मानोलीत शेतकऱ्याची आत्महत्या
मानोली (जि. परभणी) : सततचा पाऊस, नापिकी, कर्जबाजारीपणाला कंटाळून ३७ वर्षीय शेतकऱ्याने विषारी द्रव प्राशन करून आत्महत्या केल्याची घटना बुधवारी रात्री मानवत तालुक्यातील मानोली गावात घडली. कृष्णा प्रकाश सुरवसे (३७, रा. मानोली, ता. मानवत) असे मयताचे नाव आहे.
कृष्णा सुरवसे यांच्याकडे दोन एकर शेती होती. या शेतीवर पाथरी स्टेट बँकेचे दीड लाख रुपये कर्ज घेतले होते. मात्र, यंदा सततच्या पावसामुळे पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे आता बँकेचे कर्ज कसे फेडायचे व वर्षभराचा खर्च कसा करायचा या विवंचनेत कृष्णा सुरवसे यांनी बुधवारी राहत्या घरी विषारी द्रव प्राशन केले. या प्रकाराची माहिती कुटुंबीयांना कळताच कृष्णा यांचे भाऊ दत्ता सुरवसे यांनी त्यांना तत्काळ मानवत येथील खासगी दवाखान्यात दाखल केले असता, डॉक्टरांनी तपासून मयत घोषित केले. दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच सेलू पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक दीपक बोरसे यांनी आपल्या सहकाऱ्यांसह घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठविण्यात आला आहे.