सीमावर्ती भागात थरार, गांजा तस्करांचा कर्नाटकच्या पोलिस अधिकाऱ्यावर प्राणघातक हल्ला

By चेतनकुमार धनुरे | Published: September 24, 2022 10:30 PM2022-09-24T22:30:46+5:302022-09-24T22:31:28+5:30

कर्नाटकच्या पोलीस अधिकाऱ्यावर सीमाभागात प्राणघातक हल्ला, गांजा तस्करी प्रकरणातील घटना

Thriller in Maharashtra - Karnataka border areas, ganja smugglers attack Karnataka police officer | सीमावर्ती भागात थरार, गांजा तस्करांचा कर्नाटकच्या पोलिस अधिकाऱ्यावर प्राणघातक हल्ला

सीमावर्ती भागात थरार, गांजा तस्करांचा कर्नाटकच्या पोलिस अधिकाऱ्यावर प्राणघातक हल्ला

googlenewsNext

उमरगा (जि. उस्मानाबाद) : महाराष्ट्र व कर्नाटक सीमेवरील कलबुर्गी जिल्ह्यातील एका पोलीस अधिकाऱ्यावर शुक्रवारी रात्री उशिरा प्राणघातक हल्ला झाला आहे. या घटनेत हा अधिकारी गंभीर जखमी असून, गांजा तस्करीतील तपास करताना ही घटना घडल्याची माहिती आहे.

कर्नाटकातील कलबुर्गी ग्रामीण पोलीस ठाण्याचे सीपीआय श्रीमंत एल्लाळ हे एका गांजा तस्करीच्या प्रकरणात शुक्रवारी रात्री तपास करीत सीमेवरील बसवकल्याण तालुक्यातील व्हन्नाळी शिवारात आले होते. मात्र विचारपुस सुरु असतानाच तेथील स्थानिक लोकात आणि पोलिसात वाद सुरू झाला.  जमावाकडे हत्यारे असल्याने सोबत असलेले  पोलिस पळून गेले. मात्र पोलिस अधिकारी एल्लाळ जमावात अडकले. जमावाने त्यांच्यावर प्राणघातक हल्ला केल्याने ते एका शेतात जखमी अवस्थेत पडले. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर बसवकल्याण व उमरगा पोलिस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी रात्रीच्या सुमारास शोध सुरू केला.

उमरग्याचे पोलिस निरीक्षक मनोजकुमार राठोड, सहाय्यक पोलिस निरीक्षक महेश क्षिरसागर, कर्मचारी सुनीता राठोड, वाल्मिक कोळी, कांतू राठोड, सूर्यवंशी, चंद्रकांत गायकवाड या कर्मचाऱ्यांनी या भागात शोध घेतला. अत्यंत दुर्गम डोंगराळ भागात गंभीर जखमी अवस्थेतील पोलिस अधिकारी श्रीमंत एल्लाळ हे आढळून आले. त्यांना उमरगा पोलिसांनी उपचारासाठी वाहनात घेतले असतानाच कर्नाटक पोलिस तेथे आले आणि त्यांनी त्यांच्या रुग्णवाहिकेतून उपचारासाठी बस्वकल्याण येथे नेले. प्रकृती चिंताजनक असल्याने सध्या कलबुर्गी येथील एका नामांकित रुग्णालयात श्रीमंत एल्लाळ यांच्यावर उपचार सुरू असून, तेथून त्यांना बेंगलोर येथे एअर लिफ्ट करण्यात येणार असल्याची माहिती खात्रीलायक सूत्रांनी दिली.

Web Title: Thriller in Maharashtra - Karnataka border areas, ganja smugglers attack Karnataka police officer

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.