अतिवृष्टी नुकसानीबाबत बाजू मांडण्यासाठी कार्यालयात ठिय्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2021 04:34 IST2021-07-27T04:34:27+5:302021-07-27T04:34:27+5:30

कळंब : गत हंगामात अतिवृष्टीमुळे आमचं पीक वाया गेलेले असताना मदतीपासून वंचित ठेवले. तलाठी, मंडळ अधिकारी, कृषी सहायक यांच्या ...

Stay in the office to argue for over-rain damage | अतिवृष्टी नुकसानीबाबत बाजू मांडण्यासाठी कार्यालयात ठिय्या

अतिवृष्टी नुकसानीबाबत बाजू मांडण्यासाठी कार्यालयात ठिय्या

कळंब : गत हंगामात अतिवृष्टीमुळे आमचं पीक वाया गेलेले असताना मदतीपासून वंचित ठेवले. तलाठी, मंडळ अधिकारी, कृषी सहायक यांच्या अहवालातील विसंगतीची नोंद आहे. त्यामुळे आमची व्यक्तिशः बाजू जाणून घ्यावी, असे म्हणत खामसवाडी व नागझरवाडी येथील असंख्य शेतकऱ्यांनी सोमवारी उपविभागीय अधिकारी कार्यालयात ठाण मांडले.

गतवर्षी तालुक्यातील विविध गावातील खरीप पिकांची पावसाने नुकसान झाले होते. अतिवृष्टीमुळे बाधित क्षेत्रासाठी शेतकऱ्यांना अनुदानही देण्यात आले होते. यासाठी तलाठी, ग्रामसेवक व कृषी सहायक या ग्रामस्तरीय कर्मचाऱ्यांचे अहवाल प्रमाण मानण्यात आले होते. यानुसार खामसवाडी येथील ३०० तर नागझरवाडी येथील १३० शेतकरी अनुदानापासून वंचित राहिल्याची तक्रार माजी पं. स. सदस्य तथा शिवसेनेचे उपतालुका प्रमुख अमोल पाटील यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली होती. यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयाने उपविभागीय अधिकारी यांना चौकशी करण्याचे तसेच यासंबंधी संबंधितांची सुनावणी घेऊन अहवाल पाठवण्याचे सूचित केले होते.

दरम्यान, या संदर्भात तहसीलदार कळंब यांनीही अहवाल सादर केले होते. शिवाय तलाठी, कृषी सहायक यांनी तक्रारदार व वरिष्ठांना लेखी अवगत केले होते. तसेच १९ जुलै रोजी तहसीलदार, गटविकास अधिकारी, तालुका कृषी अधिकारी, दोन्ही गावचे तलाठी, ग्रामसेवक, कृषी सहायक यांची उपविभागीय अधिकारी कार्यालयात सुनावणी ठेवली होती. यावेळी पाटील यांनी आठ दिवसांची मुदत मागवून घेतली होती. याच अनुषंगाने सोमवारी परत सुनावणी झाली. यावेळी तक्रारदार पाटील यांच्यासह पन्नासेक शेतकरी उपविभागीय कार्यालयात दाखल झाले. यावेळी त्यांनी सर्व अहवालात विसंगती आहे, शिवाय आम्हा नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची व्यक्तिशः बाजू नोंदवून घ्या, अशी मागणी केली.

चौकट...

मग ते हस्ताक्षर कोणाचे?

दरम्यान, खामसवाडी, नागझरवाडी येथील शेतकऱ्यांनी भल्या सकाळीच उपविभागीय कार्यालयाकडे कूच केली. यानंतर तासभर कार्यालय परिसारात ठाण मांडले. उपविभागीय अधिकारी अहिल्या गाठाळ यांनी सुनावणी सुरू झाल्यानंतर अमोल पाटील यांच्यासह काही शेतकऱ्यांशी संवाद साधला. त्यांची बाजू ऐकून घेतली. यावेळी तलाठी, मंडळ अधिकारी यांच्या अहवालातील हस्ताक्षर एकच आहे. ते पण अन्य कोणाचे तरी आहे. यामुळे हा अहवाल बनवून घेतला असल्याचे नमूद करत हा अहवाल नेमका कोणी केला, याची चौकशी करावी, हा मुद्दा नोंद करून घ्यावा, अशी आग्रही मागणी केली.

प्रतिक्रिया...

खामसवाडीच्या ३०० तर नागझरवाडीच्या १३० शेतकऱ्यांचे ३३ टक्केपेक्षा कमी नुकसान झाल्याचे नमूद केले आहे. अहवाल, लेखी उत्तरे यात तफावत असल्याने सोयीचे अहवाल दिसतात. शेजारच्या शेतकऱ्याला अनुदान मिळते अन् यांना नाही, याचा अन्वयार्थ एका तुकड्यात अतिवृष्टी अन् शेजारच्या दुसऱ्या तुकड्यात ढग पुढे जातात, असाच निघतो. यामुळे सर्व विसंगत बाबी उपविभागीय अधिकारी यांनी आपल्या अहवालात नमूद कराव्यात, अशी आम्ही मागणी केली आहे.

- अमोल पाटील, माजी सदस्य, पंचायत समिती

Web Title: Stay in the office to argue for over-rain damage