इदगाह कोविड सेंटरची सेवा अखंडित सुरूच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 12, 2021 04:21 IST2021-07-12T04:21:10+5:302021-07-12T04:21:10+5:30
(फोटो : समीर सुतके ११) उमरगा : कोरोनाच्या पहिल्या लाटेपासून रुग्णसेवेत असलेल्या उमरगा शहरातील इदगाह कोविड सेंटरची सेवा आजही ...

इदगाह कोविड सेंटरची सेवा अखंडित सुरूच
(फोटो : समीर सुतके ११)
उमरगा : कोरोनाच्या पहिल्या लाटेपासून रुग्णसेवेत असलेल्या उमरगा शहरातील इदगाह कोविड सेंटरची सेवा आजही अखंडित सुरूच आहे. आतापर्यंत या सेंटरमधून सातशे रुग्ण कोरोनाला हरवून घरी परतले आहेत.
कोरोनाच्या पहिल्या लाटेपासून कोरोना या रोगाबद्दल प्रशासनाकडेही पुरेशी माहिती नसताना व जेव्हा रक्तातील नातेवाईकसुद्धा या रुग्णाकडे पाठ फिरवित होते, अशा भयंकर परिस्थितीत शहरातील खाजा मुजावर, बाबा जाफरी, कलीम पठाण, जाहेद मुल्ला, अजहर शेख, फैसल पटेल या युवकांनी पुढाकार घेत स्वत:च्या जीवाची पर्वा न करता शहरालगत असलेल्या इदगाह मैदानातील फंक्शन हॉलमध्ये लोकसहभागातून सर्व सुविधांयुक्त ३५ बेडचे कोविड सेंटर सुरू केले. युवकांची सेवाभाव वृत्ती पाहून उमर्गन्स ग्रुप, डिबेट ग्रुप या व्हाॅट्सॲप ग्रुप व समाजातील सर्वच घटकातून या सेंटरला मदतीचा ओघ सुरू झाला. इथे दाखल झालेल्या रुग्णांच्या नातेवाइकांना जास्त पळापळ करायची गरज भासत नव्हती. इथे मिळणारी आपुलकीची वागणूक, चांगल्या प्रतीचे मिळणारे जेवण व उपजिल्हा रुग्णालयाकडून २४ तास कार्यरत असलेला स्टाफ तसेच चांगला उपचार घेऊन रुग्ण आनंदात बरे होऊन घरी जाताना या सेंटरला सढळ हाताने मदत करीत असतात.
या ठिकाणी पूर्णवेळ स्वयंसेवक रुग्णांची सेवा करीत असतात. उपजिल्हा रुग्णालयाच्या वतीने सध्या डॉ. वैभव शाईवाले, डॉ. वर्षा चेंडके, डॉ. गजानन भोसले, महादेवी चव्हाण, राजू थोरात, मल्लिकार्जुन हुलमजगे ही टीम उपचारासाठी कार्यरत आहे. गेल्या वर्षी ७ ऑगस्टला हे सेंटर सुरू झाले होते. नोव्हेंबरमध्ये रुग्णसंख्या कमी झाल्यामुळे तात्पुरते बंद करण्यात आले. परंतु, पुन्हा कोरोनाची दुसरी लाट आल्याने १७ मार्चपासून हे सेंटर आजही रुग्णाच्या सेवेत अखंडित सुरू आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती एम. ए. सुलतान, माजी खासदार प्रा. रवींद्र गायकवाड, उद्योजक महेश देशमुख, भारत विद्यालयातील व जिल्हा परिषद शाळेतील माजी विद्यार्थ्यांनी या सेंटरला मोठी मदत केली.