कोबी पिकात फिरविला रोटावेटर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 10, 2021 04:32 IST2021-04-10T04:32:04+5:302021-04-10T04:32:04+5:30
वाहतूक खर्चही निघेना : कोरोना संकटामुळे मागणी अन् भावातही झाली घसरण तुळजापूर : दोन एकरावर कोबीची लागवड केली. मशागत, ...

कोबी पिकात फिरविला रोटावेटर
वाहतूक खर्चही निघेना : कोरोना संकटामुळे मागणी अन् भावातही झाली घसरण
तुळजापूर : दोन एकरावर कोबीची लागवड केली. मशागत, लागवड, औषधे फवारणी आदींवर मोठ्या खर्च करून चांगले उत्पादन हाती पडेल, अशी अपेक्षा असतानाच कोरोनाचे संकट उभारले. यामुळे बाजारात मागणी घटली असून, दरही कमालीचे उतरले आहेत. यातून वाहतूक खर्चही पदरी पडत नसल्यामुळे तालुक्यातील आरळी (बु.) येथील शेतकरी प्रभाकर उकरंडे यांनी पिकात रोटावेटर फिरविण्याचा निर्णय घेतला.
पारंपरिक शेतीला पर्यायी शेती म्हणून ग्रामीण भागातील शेतकरी अन् तरुण आज फुलांची शेती, भाजीपाला व फळभाज्यांची लागवड करण्यासाठी पुढे येऊ लागले आहेत. परंतु, नैसर्गिक आपत्ती बरोबरच कृत्रिम समस्याही वारंवार त्यांचा पाठलाग करीत आहेत. कोरोनाच्या काळात कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी अन् वार्षिक खर्चाचा मेळ घालण्यासाठी प्रयोगशील शेती करण्याची धडपड सुरू असतानाच अनेक अडचणीचा सामना शेतकऱ्यांना करावा लागतो आहे.
तालुक्यातील आरळी (बु) येथील शेतकरी प्रभाकर उकरंडे यांनीही दोन एकर क्षेत्रात कोबीची लागवड केली होती. याची जोपासणा करण्यासाठी त्यांनी जवळपास चाळीस हजार रुपये खर्च केला. परंतु, ऐन काढणीच्या हंगामात कोरोनाचे संकट उभे ठाकले.
गर्दी टाळण्याच्या उद्देशाने सरकारने लग्न समारंभ व हॉटेल व्यवसायावर बंदी घातली आहे. परिणामी कोबीची मागणी घटली असून, बाजारात देखील भाव पडले आहेत. कवडीमोल दराने कोबी विकावा लागत असून, यातून बाजार पेठेत ने-आण करण्यासाठीचे गाडी भाडे सुद्धा हाती पडेनासे झाले आहे. यामुळेच उकरंडे यांनी अखेर दोन एकरातील कोबी पिकात रोटावेटर फिरविला.
कोट......
दिवसरात्र काबाडकष्ट करून शेतकरी पिकांची जोपासना करतो. परंतु, सरकारकडून त्याला हमीभाव मिळत नाही. बाजारभावात ही कायमस्वरूपी चढउतार असतो. त्यामुळेच शेतकऱ्यांना आर्थिक फटका सहन करावा लागतो आहे. कोरोना लॉकडाऊन परिस्थिती असल्याने बाजारात कोबीला केवळ एक रुपया किलोचा दर मिळत आहे. वाहतुकीसाठी मात्र एका पोत्याला ४० रुपये मोजावे लागतात. याशिवाय, बारदाना व मजुरीवरही खर्च करावा लागतो. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान सहन करावे लागत असल्याने वैतागून शेतातील कोबीवर रोटर फिरवण्याचा निर्णय घ्यावा लागला.
- प्रभाकर उकरंडे, शेतकरी, आरळी (बु.)