ज्वारीची श्रीमंती वाढली, गव्हापेक्षा जास्त भाव...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 12, 2021 04:21 IST2021-07-12T04:21:08+5:302021-07-12T04:21:08+5:30

अलीकडील काळात ऊस, भाजीपाला अशी पिके घेण्याकडे शेतकऱ्यांचा अधिक कल दिसून येत असल्याने ज्वारी पिकाच्या क्षेत्रात घट दिसत आहे. ...

Rich in sorghum, higher than wheat ... | ज्वारीची श्रीमंती वाढली, गव्हापेक्षा जास्त भाव...

ज्वारीची श्रीमंती वाढली, गव्हापेक्षा जास्त भाव...

अलीकडील काळात ऊस, भाजीपाला अशी पिके घेण्याकडे शेतकऱ्यांचा अधिक कल दिसून येत असल्याने ज्वारी पिकाच्या क्षेत्रात घट दिसत आहे. परंतु, मोठ्या प्रमाणात दुग्ध व्यवसाय केला जात असलेल्या उस्मानाबाद जिल्ह्यातील भूम, परंडा, वाशी तालुक्यात पशुधनाच्या वर्षभराच्या चाऱ्याची गरज लक्षात घेता, या भागात रब्बी हंगामात ज्वारीची पेरणी मोठ्या प्रमाणावर आजही केली जाते. त्यामुळे पशुधनाच्या चाऱ्याबरोबर ज्वारीचेही भरघोस उत्पादन या भागातील शेतकऱ्यांना मिळू लागले आहे. राज्यातील ज्वारीचे घटत असलेले क्षेत्र व रोजच्या आहारातील ज्वारीच्या भाकरीचे वाढत असलेले महत्त्व, यामुळेच की काय सध्या ज्वारीने गव्हाला मागे टाकले आहे. गव्हापेक्षाही ज्वारीला अधिक भाव सध्या मिळू लागला आहे. पूर्वी गरिबांचे धान्य ज्वारी समजले जायचे. कारण ज्वारी ही गव्हापेक्षा कमी भावात उपलब्ध असायची, तर दुसरीकडे गव्हाला अधिक भाव होता. एखादा मोठा सण समारंभ असला तरच गरिबांच्या घरी चपाती, पोळ्यांचा स्वयंपाक हाेत असे. परंतु, आता ज्वारीचा भाव गव्हापेक्षाही जास्त असल्याने ज्वारीची श्रीमंती वाढली आहे.

पूर्वी ज्वारीला काही जास्त भाव नसायचा. परंतु, त्याकाळी गव्हाला ज्वारीपेक्षा जास्त भाव होता. त्यामुळे सण समारंभापुरतेच थोडेफार गव्हाचे धान्य घरात असायचे. त्यामुळे त्याकाळी ज्वारीचे धान्यच परवडायचे.

- यादव खामकर, पाथरूड.

पूर्वीपासून ज्वारीच्या भाकरीला प्राधान्य देत असून, आज जरी गव्हाला ज्वारीपेक्षा कमी भाव असला, तरीही मी ज्वारीच्याच भाकरीचा आहारात उपयोग करीत आहे. - शिवाजी खामकर, पाथरूड.

आता रोजच्या आहारात आवडती गव्हाची पोळी खाणे ज्वारीच्या भाकरीऐवजी सोपे झाले आहे. कारण ज्वारीपेक्षा गहू स्वस्त आहे. शिवाय रेशनलाही स्वस्तात गहू मिळत आहे.

-रोहन खामकर, पाथरूड.

दररोजच्या आहारात गव्हाच्या धान्याचा वापर करण्यात येत आहे. ज्वारीपेक्षा गव्हाचा भाव कमी असल्याने सध्या गहू ज्वारीपेक्षा रास्त वाटत आहे.

- बाजीराव कानडे, पाथरूड.

@ ज्वारी गहू भाव आलेख

१ ) वर्षे - २००५, ज्वारी -१००० क्विंटल. | गहू - १३०० क्विंटल.

२) वर्ष २०१५, ज्वारी- १५०० क्विंटल. | गहू - १८०० क्विंटल.

३ ) वर्षे २०१५, ज्वारी- २५०० क्विंटल,| गहू - २३०० क्विंटल

४ ) वर्षे २०२०, ज्वारी- ३५०० क्विंटल. | गहू- २४०० क्विंटल.

५ ) वर्षे २०२१, ज्वारी ३८०० क्विंटल. | गहू- २४०० क्विंटल.

का खावी ज्वारीची भाकरी ?

१) कोवळ्या ज्वारीचा भाजून हुरडा केला जातो. ज्वारी पूर्ण पिकल्यावर ज्वारीचे धान्य म्हणून वापरतात. तसेच भाजून लाह्या, कण्या व पिठाच्या भाकरी करून खाण्यासाठी वापरले जाते. याचे बी लघवीच्या आजारांवर उपयुक्त असते. हे पीक जनावरांचे खाद्य म्हणूनही वापरले जाते.

ज्वारीपासून पापड्याही बनविल्या जातात

२) ज्वारीमध्ये कार्बोहायड्रेट्सचे प्रमाण जास्त असल्याने शरीरास पटकन ऊर्जा मिळते. कमी खाऊनही पोट भरल्याची जाणीव होते.

३) ज्वारीमध्ये असणाऱ्या अमायनो ॲसिड्समधून शरीरास मुबलक प्रोटिन्स मिळतात.

तसेच फायबर्स असल्याने अन्नाचे सहज पचन होते.

बद्धकोष्ठतेचा त्रास असणाऱ्या व्यक्तींनी ज्वारीची भाकरी खाण्याची सवय लावून घ्यावी. त्यामुळे मूळव्याधीचा त्रास होत नाही. यासह इतरही अनेक फायदे ज्वारीचे आहेत .

डाॅ. महेश गिरी, वैद्यकीय आरोग्य अधिकारी, प्राथमिक आरोग्य केंद्र, पाथरुड.

Web Title: Rich in sorghum, higher than wheat ...