तामलवाडी : तुळजापूर तालुक्यातील गोंधळवाडी गावाला वीज पुरवठा करणाऱ्या विद्युत ट्रान्सफाॅर्मरमध्ये झालेला तांत्रिक बिघाड सापडत नसल्याने अखेर महिनाभरानंतर नवीन ट्रान्सफाॅर्मर लावून गावाचा वीज पुरवठा सुरू करण्यात आला. यामुळे ग्रामस्थांना दिलासा मिळाला आहे.
गोंधळवाडी गावास एका ट्रान्सफाॅर्मरद्वारे वीजपुरवठा केला जातो. पूर्वी हा ट्रान्सफाॅर्मर गावाबाहेर असल्याने अज्ञात व्यक्ती ट्रान्सफाॅर्मरचा बिघाड घडवत असल्याचा जावईशोध वीज कर्मचाऱ्यांनी लावून गावचा वीज पुरवठा महिनाभरापासून बंद ठेवण्यात आला होता. यामुळे या कालावधीत ग्रामस्थांची मोठी गैरसोय झाली. दळण-कांडपासाठीही ग्रामस्थांना परगावी जावे लागले. अखेर आता गावातच हा ट्रान्सफाॅर्मर उभा करून वीज पुरवठा चालू करण्यात आला. शिवाय, या ठिकाणी एका खासगी मालकाची सीसीटीव्ही सामग्रीची सोय असल्याने या कॅमेऱ्याच्या निगरणीखाली हा ट्रान्सफाॅर्मर राहणार आहे.
चौकट......
डिमांड भरूनही वीज जोडणी नाही
गोंधळवाडी गावातील शंभर ग्राहकांनी घरगुती वीज वापरासाठी अनामत रक्कम महावितरण कार्यालयाकडे भरणा केली. परंतु, त्यांना अद्याप वीज जोडणी दिली गेली नाही. ही प्रक्रिया कुठे थांबली, याचे कारणही ग्राहकांना सांगितले जात नाही. त्यामुळे याची वरिष्ठ पातळीवरून चौकशी करावी. तसेच आकडे बहाद्दरांवर कारवाईची मागणी सरपंच राजाभाऊ मोटे यांनी केली आहे.