कळंब मोहा येडशी राज्यमार्गाची दुरवस्था

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 23, 2021 04:34 IST2021-08-23T04:34:30+5:302021-08-23T04:34:30+5:30

कळंब : कळंब-मोहा-येडशी या जम्पिंग ट्रॅक बनलेल्या रस्त्यावरून ये-जा करताना नागरिक बेजार होत आहेत. असे असतानाच बांधकाम विभागाने ...

Poor condition of state highways with Kalamb Moha Yeds | कळंब मोहा येडशी राज्यमार्गाची दुरवस्था

कळंब मोहा येडशी राज्यमार्गाची दुरवस्था

कळंब : कळंब-मोहा-येडशी या जम्पिंग ट्रॅक बनलेल्या रस्त्यावरून ये-जा करताना नागरिक बेजार होत आहेत. असे असतानाच बांधकाम विभागाने चक्क या रस्त्यावरील एका चॅनेजच्या कामाची लाखो रूपयाची ई-निविदाच ‘लॉकडाऊन’ केल्याने संताप व्यक्त केला जात आहे.

शहरातील होळकर चौकातून मार्गस्थ होत पुढे येडशी गावाला जोडणाऱ्या रा. मा. २४१ या रस्त्याची मोठी दुरवस्था झाली आहे. जिल्ह्याशी जोडणारा सर्वात जवळचा मार्ग असलेल्या या रस्त्याशी मोहा, खामसवाडी, गौर, दहिफळ या मोठ्या गावांसह तादुंळवाडी, बोर्डा, खेर्डा, शिंगोली, बरमाचीवाडी, वाघोली, सातेफळ, हळदगाव अशी काही गावे थेट कनेक्ट आहेत. मोहा, तडवळा व चोराखळी येथील ‘शुगरकेन’ उद्योगांना हा रस्ता जोडला गेला आहे. अशा या महत्वपूर्ण रस्त्यावरील कळंब ते मोहा हा भाग सुस्थितीत असला तरी मोहा ते येडशी या भागाची मात्र मोठी दुरवस्था झाली आहे. जागोजागी पडलेले खड्डे व खचलेल्या डांबरी पृष्ठभागामुळे रस्ता ‘जम्पिंग ट्रॅक’ बनला आहे. यास्थितीतच मध्यंतरी रस्त्यावरील काही चॅनेजवर सुधारणा करण्यासाठी निधी मंजूर झाला होता. यापैकी एकाची निविदा प्रक्रिया पूर्ण होऊन ठेका देण्यात आला असला तरी काम मात्र कासवगतीनेच सुरू आहे. तर दुसऱ्या कामाची मात्र निविदाच खुली केली जात नसल्याने होणारे काम नागरिकांसाठी ‘मृगजळ’ ठरत चालले आहे.

चौकट...

मंजूर कामही मार्गी लागेना....

दरम्यान, कळंब मोहा येडशी या राज्यमार्गावरील दुरवस्था झालेल्या शिंगोली शिव ते सातेफळ शिव या दरम्यानच्या किमी २१ ते २६ या भागाची सुधारणा करण्यासाठी भरीव निधी मंजूर झाला होता. सार्वजनीक बांधकाम विभाग उस्मानाबाद यांनी ३० मार्च रोजी काढलेल्या १७ कामाच्या ई निविदेत उपरोक्त लांबीचा एका कामात समावेश होता. लाखो रूपयाच्या या कामाची निविदा सादर अंतिम तिथी २३ एप्रिल तर आलेल्या निविदेचा तांत्रिक लिफाफा उघडण्याची २६ एप्रिल ही तिथी होती. या कामाची मुदत १८ महिने होती. यासाठी मुदतीत काही ठेकेदारांनी निविदा सादर केली आहे. यास पाच महिने उलटले तरी अद्याप ‘लॉकडाऊन’ झालेली निविदा मात्र खुली झालेली नसल्याची माहिती समोर येत आहे.

Web Title: Poor condition of state highways with Kalamb Moha Yeds