मुरूम - आलूर रस्ता खड्ड्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2021 04:22 IST2021-07-21T04:22:19+5:302021-07-21T04:22:19+5:30
वाहनधारकांची गैरसोय : प्रशासन, लोकप्रतिनिधींचेही दुर्लक्ष उमरगा : उमरगा ते अक्कलकोट मार्गावरील मुरूम ते आलूर या दरम्यान रस्त्यावर जागोजागी ...

मुरूम - आलूर रस्ता खड्ड्यात
वाहनधारकांची गैरसोय : प्रशासन, लोकप्रतिनिधींचेही दुर्लक्ष
उमरगा : उमरगा ते अक्कलकोट मार्गावरील मुरूम ते आलूर या दरम्यान रस्त्यावर जागोजागी मोठमोठे खड्डे पडल्याने या रस्त्यावरून वाहनधारकांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे. यातून सातत्याने छोटे - मोठे अपघात घडत असून, रस्ता दुरुस्तीचे काम तत्काळ करावे, अशी मागणी या परिसरातील नागरिकातून करण्यात येत आहे.
उमरगा - अक्कलकोट रस्त्यावरील मुरूम ते आलूर मार्गावरून असंख्य वाहने ये-जा करतात. विशेषत: मुरूम परिसरातील बेळंब, आलूर, कोथळी, केसरजवळगा या भागातील नागरिक दुचाकी व इतर वाहनाने याच मार्गावरून मुरूमला ये-जा करत असल्याने या मार्गावर सतत वर्दळ असते. सध्या मुरूम ते आलूर हा रस्ता ठिकठिकाणी उखडला आहे. बऱ्याच ठिकाणी मोठमोठे खड्डे पडल्याने हे खड्डे चुकवण्याच्या नादात दुचाकीला अपघाती घटना घडून अनेकजण जखमी झाले आहेत. उमरगा येथील सार्वजनिक बांधकाम विभागाकडे या रस्त्याची दुरूस्ती झाल्याची कागदोपत्री नोंद असली तरी प्रत्यक्षात याची दुरूस्ती झाली की नाही, असा सवाल या भागातील ग्रामस्थांमधून विचारला जात आहे. त्यातच हा मार्ग गेल्या वर्षी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण विभागाकडे हस्तांतरित झाल्यामुळे याच्या दुरुस्तीची जबाबदारी प्राधिकरण विभागाकडे आहे. मात्र, या विभागातील अधिकारीदेखील सार्वजनिक बांधकाम विभागाप्रमाणेच कित्ता गिरवत आहेत. त्यामुळे लोकप्रतिनिधींनी याकडे गांभीर्याने लक्ष देऊन दुरुस्तीबाबत संबंधितांना सूचना द्याव्यात, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.