धाराशिव 'झेडपी'त सत्ता स्थापनेसाठी रस्सीखेच; काकांची खेळी उलटवण्यात पुतण्याचाही पुढाकार

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 18, 2026 13:15 IST2026-02-18T13:10:44+5:302026-02-18T13:15:01+5:30

धाराशिवमध्ये भाजप अन् सावंत गटात कलगीतुरा

In Dharashiv, there is a clash between BJP and Sawant factions; Nephew also took the initiative to reverse his uncle's move | धाराशिव 'झेडपी'त सत्ता स्थापनेसाठी रस्सीखेच; काकांची खेळी उलटवण्यात पुतण्याचाही पुढाकार

धाराशिव 'झेडपी'त सत्ता स्थापनेसाठी रस्सीखेच; काकांची खेळी उलटवण्यात पुतण्याचाही पुढाकार

धाराशिव : भाजपवगळून वेगळी आघाडी बनवत जिल्हा परिषदेत सत्ता स्थापनेचे संकेत आ. तानाजी सावंत यांनी दिले होते. मात्र, भाजपने निकालादिवशीच बहुमतासाठी आवश्यक संख्याबळ जमवून त्यांना सहलीवर पाठवले आहे. परिणामी, सावंतांच्या बेरजेची वजाबाकी होताना दिसून येत आहे. यातच आता निवडणुकीतच काका तानाजी सावंत यांच्याशी बंड पुकारत अपक्ष म्हणून निवडून आलेला पुतण्या माजी जि.प. उपाध्यक्ष धनंजय सावंत यांनीही भाजपच्या टूरमध्ये सहभागी होत काकांची राजकीय खेळी उलटवण्यासाठी पुढाकार घेतला आहे.

धाराशिव जिल्हा परिषदेत कोणत्याही एका पक्षाला स्पष्ट बहुमत मिळालेले नाही. ५५ जागांपैकी भाजपला १९, शिंदेसेनेला १५, उद्धवसेनेला ७, अजित पवारांच्या राष्ट्रवादीला ६, काँग्रेस ३, समाजवादी पार्टी १ व अपक्ष ४, असे संख्याबळ आहे. बहुमतासाठी २८ सदस्यांची आवश्यकता असून, त्यासाठी भाजप व भाजपविरोधी आघाडीत रस्सीखेच रंगली आहे. दरम्यान, भाजपने निकाल जाहीर झाल्यादिवशीच खबरदारी म्हणून आपल्यासह राष्ट्रवादी, अपक्ष व शिंदेसेनेचेही काही सदस्य सुरक्षित स्थळी हलवले आहेत. यामध्ये आता आणखी भर पडताना दिसत आहे. भाजपने आपल्यासोबत ३६ सदस्य असल्याचा दावा करून अध्यक्ष हा महायुतीचा होईल, असे स्पष्ट केले आहे. दरम्यान, निवडणुकीच्या वेळी आपले काका आ. तानाजी सावंत यांच्या विरोधात दंड थोपटत भाजपचा पाठिंबा मिळवून पुतण्या धनंजय सावंत यांनी अपक्ष उमेदवारी दाखल केली होती. नंतर ते २ हजारांवर मताधिक्य घेऊन विजयी झालेही. मात्र, सत्ता स्थापनेवेळी ते कोणाच्या पाठीशी राहणार, याविषयी जाहीर भूमिका मांडलेली नव्हती. यातच मंगळवारी त्यांचा भाजप सदस्यांच्या सहलीत सहभागी झाल्याचा फोटाे व्हायरल झाला. त्यामुळे ते भाजपला साथ देणार, हे आता स्पष्ट झाले आहे.

भाजप व सावंत गटात कलगीतुरा
निवडणुकीच्या काळात आ. तानाजी सावंत यांनी भाजपतील घराणेशाहीवर हल्लाबोल करीत भाजप वगळून वेगळ्या आघाड्यांद्वारे सत्तेची समीकरणे जुळवण्याचे संकेत दिले होते. मात्र, सत्ता स्थापनेच्या रेसमध्ये त्यांच्या शिंदेसेनेतीलच काही सदस्य भाजपसोबत गेल्याने त्यांची कोंडी झाली आहे. भाजपनेही आता सावंत गट वगळून सत्ता स्थापन करण्याचा दावा केला आहे. यावरून सावंत समर्थकांनी आमचे सदस्य पळवून नेत विश्वासघातकी कृत्य केल्याचा हल्लाबोल भाजपवर केला आहे. एकूणच धाराशिवमध्ये सत्ता स्थापनेवरून मोठा राजकीय कोलाहल सुरू आहे.

Web Title : उस्मानाबाद जिला परिषद में सत्ता संघर्ष: भतीजे ने चाचा की योजना विफल की।

Web Summary : उस्मानाबाद जिला परिषद में सत्ता के लिए संघर्ष जारी है। तानाजी सावंत के भाजपा को छोड़कर गठबंधन बनाने के प्रयासों को चुनौती मिली है क्योंकि उनके भतीजे भाजपा खेमे में शामिल हो गए हैं, जिससे संभावित रूप से उनका बहुमत सुरक्षित हो गया है। भाजपा ने 36 सदस्यों के समर्थन का दावा किया है।

Web Title : Osmanabad Zilla Parishad power struggle: Nephew foils uncle's plan.

Web Summary : Osmanabad Zilla Parishad faces a power struggle. Tanaji Sawant's efforts to form an alliance excluding BJP are challenged as his nephew joins the BJP camp, potentially securing their majority. The BJP claims support from 36 members.