लॉकडाऊनमध्ये गरजूंना मदत द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 12, 2021 04:30 IST2021-04-12T04:30:09+5:302021-04-12T04:30:09+5:30

उस्मानाबाद : मुंबईसह महाराष्ट्रात कोरोना साथीचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत असून, आता राज्य सरकार लॉकडाऊन जाहीर करणार असल्याचे स्पष्टपणे दिसत ...

Help the needy in lockdown | लॉकडाऊनमध्ये गरजूंना मदत द्या

लॉकडाऊनमध्ये गरजूंना मदत द्या

उस्मानाबाद : मुंबईसह महाराष्ट्रात कोरोना साथीचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत असून, आता राज्य सरकार लॉकडाऊन जाहीर करणार असल्याचे स्पष्टपणे दिसत आहे. त्यामुळे गोरगरीब, श्रमिक व हातावर पोट असणाऱ्या वर्गासाठी तातडीने आर्थिक मदत जाहीर करण्याची मागणी जनता दलाचे (सेक्युलर) प्रदेश कार्याध्यक्ष ॲड. रेवण भोसले यांनी केली आहे.

लॉकडाऊनसारख्या कठोर निर्बंधाची किंमत सामान्य माणसाला मोजावी लागते. त्यांची रोजीरोटी कमावण्याचे, उदरनिर्वाहाचे मार्ग बंद होतात आणि कुटुंबीयांवर उपासमारीची वेळ येते. त्यामुळे कठोर निर्बंध लागू करतानाच गरिबांनी जगायचे कसे, त्यासाठी त्यांना कशी मदत करता येईल, याचाही विचार होणे व नियोजनपूर्वक ती मदत त्यांच्यापर्यंत पोहोचविणे आवश्यक आहे. सरकार तीन आठवडे लॉकडाऊन लागू करण्याच्या विचारात असून त्यामुळे सामान्य जनतेच्या किमान एक महिन्याच्या निर्वाहाची सोय करणे योग्य ठरेल. राज्यातील गरीब दोन कोटी कुटुंबांना प्रत्येकी साधारणत दहा हजार रुपयांची थेट मदत एक वा दोन टप्प्यांत दिल्यास टाळेबंदीच्या काळात सर्वसामान्य जनतेला मोठा आधार मिळू शकेल. सद्यस्थितीत राज्य सरकारच्या आर्थिक मर्यादा आणि रुग्णसेवेवर होणारा खर्च विचारात घेता एवढा निधी उपलब्ध करण्याची राज्याची क्षमता नसल्यास मुंबई महापालिकेकडून राज्य सरकारने ही रक्कम कर्जाऊ घ्यावी. महापालिकेकडे जवळपास ८० हजार कोटी रुपयांच्या ठेवी असून, जनतेने दिलेल्या करातूनही गंगाजळी उभी राहिली आहे. त्यामुळे जनतेच्या अडचणीच्या वेळी ती वापरणे योग्य ठरेल, असेही ॲड. भोसले यांनी म्हटले आहे.

Web Title: Help the needy in lockdown