कळंब : कळंब तालुक्यातील श्रावणबाळ व संजय गांधी निराधार योजनेच्या अनेक लाभधारकांचे अनुदान वेळेत मिळत नसल्याने त्यांची ससेहोलपट होत आहे. त्या लाभार्थ्यांचे अनुदान त्वरित देण्याची मागणी मानवहित लोकशाही पक्षाच्या वतीने येथील तहसीलदार मंजूषा लटपटे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे
श्रावणबाळ, संजय गांधी निराधार, तसेच दिव्यांग, विधवा, परितक्त्या, मूकबधिर व अन्य योजनेच्या माध्यमातून येथील तहसील कार्यालयातून अनुदान वितरित केले जाते. परंतु, अनेकवेळा अनुदानाची रक्कम संबंधित बॅंकेत वेळेत पाठविली जात नाही. त्यामुळे निराधार लाभार्थ्यांना आर्थिक संकटाचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे सदरील लाभधारकांचे अनुदान त्यांच्या बँक खात्यावर नियमित जमा करून वृद्ध, विधवा, परितक्त्या, दिव्यांग, मूकबधिर, निराधार व अन्य लाभधारकांची उपासमार व गैरसोय थांबवावी, अशी मागणी जिल्हाध्यक्ष हनुमंत भाऊ पाटुळे व कळंब तालुकाध्यक्ष धनंजय ताटे यांनी केली आहे.