IPL 2026, Punjab Kings won by 7 wkts Against Mumbai Indians : मुंबईतील वानखेडेच्या मैदानात पंजाब किंग्सच्या संघाने आपल्या विजयाचा सिलसिला कायम ठेवत मुंबई इंडियन्सला घरच्या मैदानात पराभवाचा धक्का दिला. या विजयासह 'सरपंच साब' श्रेयस अय्यरच्या संघाने ५ सामन्यातील ४ विजय आणि एका अनिर्णित सामन्यासह ९ गुणांची कमाई करत गुणतालिकेत अव्वलस्थानी झेप घेतली आहे. दुसरीकडे मुंबई इंडियन्सच्या संघावर सलग चौथ्या पराभवाची नामुष्की ओढावली. ते गुणातालिकेत नवव्या स्थानावर आहेत. धावांचा बचाव करताना मुंबई इंडियन्सचे गोलंदाज सपशेल अपयशी ठरल्यामुळे क्विंटन डी कॉकची शतकी खेळी व्यर्थ ठरली.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
श्रेयस अय्यरनं नाणेफेक जिंकून पहिल्यांदा फलंदाजीचा निर्णय घेतल्यावर अर्शदीप सिंगने पॉवर प्लेमध्येच रियान रिकल्टन आणि सूर्यकुमार यादव यांच्या रुपात एका पाठोपाठ एक धक्के देत मुंबई इंडियन्सची अवस्था २ बाद १२ अशी बिकट केली. संघ अडचणीत असताना क्विंटन डी कॉक आणि नमन धीर जोडी जमली. दोघांनी तिसऱ्या विकेटसाठी ६८ चेंडूत १२२ धावांची दमदार भागीदारी रचत मुंबई इंडियन्सचा डाव सावरला. नमन धीर ३१ चेंडूत ३ चौकार आणि ३ षटकाराच्या मदतीने ५० धावा करून परतल्यावर क्विंटन डी कॉक ६० चेंडूत ८ चौकार आणि ७ षटकारांच्या मदतीने नाबाद ११२ धावांची खेळी करत शेवटपर्यंत मैदानात थांबला. पण दुसऱ्या बाजूनं त्याला म्हणावी तशी कुणीही साथ दिली नाही. परिणामी मुंबई इंडियन्सचा संघ निर्धारित २० षटकांत ६ विकेट्सच्या मोबदल्यात १९५ धावांपर्यंतच मजल मारू शकला. गोलंदाजीत पंजाबकडून अर्शदीप सिंगने ४ षटकात २२ धावा खर्च करत सर्वाधिक तीन विकेट्स घेतल्या. त्यालाच सामनावीर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. याशिवाय मार्को यान्सेन आणि शशांक सिंह यांनी प्रत्येकी १-१ विकेट्स आपल्या खात्यात जमा केली.
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
मुंबई इंडियन्सने दिलेल्या धावांचा पाठलाग करताना प्रभसिमरन सिंग आणि प्रियांश आर्य या अनकॅप्ड भारतीय सलामवीरांनी पंजाबच्या डावाची सुरुवात केली. अल्लाह मोहम्मद गझनफर याने प्रियांश आर्यच्या रुपात मुंबईच्या संघाला पहिले यश मिळवून दिले. हार्दिक पांड्याने पंजाबच्या डावातील चौथ्या षटकातील पहिल्याच चेंडूवर प्रभसिमनला आपल्या जाळ्यात अडकवले होते. पण जसप्रीत बुमराहनं त्याचा सोपा झेल सोडला. त्यावेळी प्रभसिमनर सिंग ५ चेंडूत ११ धावांवर खेळत होता. जीवनदान मिळाल्यावर त्याने मागे वळून पाहिले नाही. तुफान फटकेबाजीचा नजराणा पेश करत त्याने मॅच विनिंग खेळी साकारली. श्रेयस अय्यरनं ३५ चेंडूत ५ चौकार आणि ४ षटकारांच्या मदतीने ६६ धावांची दमदार खेळी केली. प्रभसिमरन सिंग ३९ चेंडूत ११ चौकार आणि २ षटकारांच्या मदतीने ८० धावांची खेळी करून शेवटपर्यंत नाबाद राहिला. MI कडून अल्लाह मोहम्मद गझनफर याने सर्वाधिक दोन तर शार्दुल ठाकूरनं एक विकेट आपल्या खात्यात जमा केली. बुमराह सलग पाचव्या सामन्यात एकही विकेट मिळवता आली नाही.
Web Summary : Punjab Kings defeated Mumbai Indians, securing top spot with Iyer and Prabhsimran's stellar performances. De Kock's century went in vain as Mumbai suffered their fourth consecutive loss. Arshdeep Singh was named man of the match.
Web Summary : पंजाब किंग्स ने मुंबई इंडियंस को हराया, अय्यर और प्रभसिमरन के शानदार प्रदर्शन से शीर्ष स्थान हासिल किया। मुंबई को लगातार चौथी हार का सामना करना पड़ा, डी कॉक का शतक बेकार गया। अर्शदीप सिंह को मैन ऑफ द मैच चुना गया।