जिल्हा पुन्हा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला होईल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2021 04:34 IST2021-07-27T04:34:29+5:302021-07-27T04:34:29+5:30
ढोकी : जिल्ह्यातील प्रमुख नेते पक्ष सोडून गेले तरी येथील जनता अजूनही शरद पवार यांना मानते. याचे उदाहरण म्हणजेच ...

जिल्हा पुन्हा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला होईल
ढोकी : जिल्ह्यातील प्रमुख नेते पक्ष सोडून गेले तरी येथील जनता अजूनही शरद पवार यांना मानते. याचे उदाहरण म्हणजेच हा राष्ट्रवादीचा मेळावा. सुरेश पाटील यांनी अवघ्या दोन दिवसात मेळावा घेण्याचा निर्धार केला अन् एवढ्या मोठ्या प्रमाणात कार्यकर्त्यांची हजेरी लागली. त्यामुळे हा जिल्हा पुन्हा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला झाल्याशिवाय राहणार नाही, असा विश्वास राज्यमंत्री संजय बनसोडे यांनी व्यक्त केला.
उस्मानाबाद तालुक्यातील कसबे तडवळे येथे एस. पी. शुगर कारखान्यावर आयोजित राष्ट्रवादी पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी राष्ट्रवादी प्रदेश सरचिटणिस बसवराज पाटील नागराळकर तर व्यासपीठावर शिक्षक आमदार विक्रम काळे, माजी आमदार राहुल मोटे, एस. टी. महामंडळचे माजी अध्यक्ष जीवन गोरे, ज़िल्हा बँकेचे अध्यक्ष सुरेश बिराजदार, राष्ट्रवादी युवती प्रदेश अध्यक्ष साक्षणा सलगर, युवक ज़िल्हा अध्यक्ष आदित्य गोरे, माजी नगराध्यक्ष अमित शिंदे आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी राज्यमंत्री बनसोडे म्हणाले की, बुथ कमिटीची रचना करून आपण कामाला सुरुवात केली पाहिजे. सुरेश पाटील यांची जबाबदारी अजित पवारांनी आता माझ्यावर सोपवली आहे. त्यामुळे ते आता नव्याने जोमाने कामाला लागून जिल्ह्यात आपल्या पक्षाचे वर्चस्व वाढवतील. यावेळी विक्रम काळे, राहुल मोटे, जीवनराव गोरे, सुरेश बिराजदार यांनीही मनोगते व्यक्त केली.
सुरेश पाटील आले ॲक्टिव्ह मोडमध्ये...
तडवळे येथील एस. पी. शुगरचे चेअरमन सुरेश पाटील हे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ''पुन्हा सक्रिय'' झाल्याने उस्मानाबाद-कळंब तालुक्यातील कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. सुरेश पाटील हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून विधानसभेची उमेदवारी न मिळाल्याने मागील दोन वर्षांपासून पक्षापासून ते अलिप्त होते. आता ते पुन्हा सक्रिय झाल्याने पक्षाला बळ मिळाले आहे. मेळाव्यास झालेली गर्दी याची साक्ष देणारी ठरली.