- चेतन धनुरे
धाराशिव : अवघ्या २१ वर्षांचा काटी येथील तरुण... नोकरीच्या मागे न धावता शेतीच विकसित करण्याचा ध्यास घेतलेला... नवतंत्रज्ञानाची जाण ठेवून असलेला... शेतीत त्याचा वापर करण्यासाठी धडपडणारा. त्याने जिल्ह्यातील तरुणांसमोर एक आदर्श वस्तुपाठ घालून दिला आहे. उसात एआयचा वापर केल्याने उत्पादन वाढते, हे ऐकल्यानंतर सातत्याने पाठपुरावा करून हे तंत्रज्ञान आपल्या शेतीत आणले आणि ज्या मातीतून वर्षानुवर्षे ३० ते ५० टनांपर्यंत उत्पादन निघायचे, त्याच मातीतून यंदा १०३ टन उत्पादन काढून सर्वांना चकित केले.
तुळजापूर तालुक्यातील काटी येथील हर्षवर्धन गुंड हा तंत्रस्नेही तरुण. मागच्या तीन वर्षांपासून तो शेतीतील एआय तंत्रज्ञानाच्या वापराविषयी ऐकत होता. आपणही हे तंत्रज्ञान आपल्या शेतीत आणायचे, असा चंग बांधून बारामती कृषी विज्ञान केंद्राशी संपर्क साधत त्याने पाठपुरावा सुरू केला. याच काळात या केंद्राने ५० शेतकऱ्यांचा पायलट प्रोजेक्ट हाती घेतला होता. त्यात हर्षवर्धनचाही समावेश झाला. २२ ऑगस्ट २०२४ रोजी त्याने एक एकरातील उसासाठी ९० हजार रुपये खर्च करून एआय तंत्रज्ञान ॲक्टिव्ह करून घेतले. याद्वारे खत, पाणी, कीड रोगाबाबतचे दैनंदिन अलर्ट मिळवून, त्यानुसार काटेकोर व्यवस्थापन केले अन् शेवट गोड झाला. ज्या मातीतून वर्षानुवर्षे किमान ३० व कमाल ५० टन ऊस उत्पादित होत होता, त्याच मातीने यंदाच्या हंगामात १०३ टन ऊस हर्षवर्धनच्या पदरी टाकला.
३० वर्षांपासून करतात ऊस लागवडहर्षवर्धनचे कुटुंबीय हे मागच्या जवळपास ३० वर्षांपासून उसाची लागवड करीत आहेत. मात्र, एकरी कधीही त्यांना ५० टनापेक्षा जास्त उत्पादन मिळाले नव्हते. या वर्षी एआयचा १ एकराच्या प्लॉटवर प्रयोग केल्यानंतर तब्बल १०३ टन ऊस हाती लागला.शिक्षणासोबतच शेतीशी गट्टीहर्षवर्धन शेती करतानाच शिक्षणही घेत आहे. तुळजापूरच्या टाटा सामाजिक विज्ञान संस्थेत तो शेतीशी संबंधितच बॅचलर इन ॲग्रिकल्चरचे धडे गिरवत आहे. या शिक्षणातून मिळणारे धडे तो आपल्या काळी मातीत गिरविण्याचा प्रयत्न करतोय.
असा केला वापर, झाला फायदा१ एकराच्या प्लॉटमध्ये हवामान आधारित एआय तंत्रज्ञान मृद सेन्सरसह बसविले. यातून हर्षवर्धनला दररोज तापमान, पर्जन्यमानाची माहिती मोबाइलवर मिळू लागली. सेन्सरद्वारे पिकाला किती पाण्याची आवश्यकता आहे, मातीला नत्र, स्फुरद, पोटॅशची किती गरज आहे, हे कळू लागल्याने खताची मात्रा ठरवता आली. कीड रोग व त्याच्या व्यवस्थापनासाठी आवश्यक माहिती मिळाल्याने पिकाची वाढ चांगली होण्यास मदत झाली.
पारंपरिक शेतीमध्ये बदल केलाघरात परंपरेने शेतीचा वारसा चालत आलेला. त्यामुळे लहानपणापासूनच शेतीची आवड होती. मात्र, आता बदलत्या हवामानानुसार पारंपरिक शेतीमध्ये आवश्यक असलेले बदल करावेच लागणार आहेत. तंत्रज्ञानाचीही आवड असल्याने कुतूहल निर्माण केलेल्या एआयचा वापराचा प्रयोग केला. एकाच एकरातून २ लाखांचे उत्पन्न वाढले.- हर्षवर्धन गुंड, शेतकरी, काटी.
Web Summary : Harsvardhan Gund, a 21-year-old farmer, achieved 103 tons of sugarcane using AI technology on one acre. He embraced technology to increase yield, inspired other farmers, and doubled the income.
Web Summary : 21 वर्षीय किसान हर्षवर्धन गुंड ने एक एकड़ में एआई तकनीक का उपयोग करके 103 टन गन्ना प्राप्त किया। उन्होंने उपज बढ़ाने के लिए प्रौद्योगिकी को अपनाया, अन्य किसानों को प्रेरित किया और आय को दोगुना किया।