Dharashiv: मोठी बातमी! तातडीने मदत द्या, मागणी करणाऱ्या आंदोलक शेतकऱ्यांवर गुन्हे!
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 7, 2025 19:48 IST2025-10-07T19:47:57+5:302025-10-07T19:48:28+5:30
शेतकरी आंदोलनात सहभागी प्रकरणी दोन माजी नगराध्यक्षांसह ७० ते ८० शेतकऱ्यांवर गुन्हे दाखल केल्याने एकच खळबळ उडाली आहे

Dharashiv: मोठी बातमी! तातडीने मदत द्या, मागणी करणाऱ्या आंदोलक शेतकऱ्यांवर गुन्हे!
- संतोष वीर
भूम (धाराशिव): शहरातील गोलाई चौकात तालुक्यातील शेतकऱ्यांनी ६ ऑक्टोबर २०२५ रोजी रस्तारोको आंदोलन करत सरकारकडे तातडीने मदतीची मागणी केली होती. दरम्यान, जमावबंदीच्या सरकारी आदेशांचे उल्लंघन केल्याचा ठपका ठेवत पोलिस निरीक्षक गणेश कानगुडे यांनी आंदोलक शेतकऱ्यांवर गुन्हे दाखल केल्याने खळबळ उडाली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मा. जिल्हाधिकारी व मा. पोलीस निरीक्षकांच्या आदेशानुसार २६ सप्टेंबर २०२५ ते ९ ऑक्टोबर २०२५ पर्यंत जमावबंदी आहे. मात्र, शेतकरी भास्कर महादेव वारे ( रा. चिंचोली) यांच्या नेतृत्वाखाली सोमवारी ( दि. ६) अतिवृष्टीच्या नुकसान भरपाईसाठी रस्तारोको आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात विठ्ठल राजाभाऊ बाराते, अरुण गाढवे, विलास पवार, संदीपन कोकाटे, अनिल भोरे, बिभीषण भैरट, भागवत साळुंकें, बप्पासाहेब गिलबिले, गणेश आंधरे, रंजीत पाटील, संजय गाढवे, विजयसिंह थोरात, अनिल शेडगे, रूपेश शेडगे, तानाजी पाटील, भगवान बांगर, शाहाजी शिंदे, विलास शाळू, दत्ता गाडवे, मनोज सुरवसे, प्रताप पाटील, अॅंड अरविंद हिवरे यांच्यासह इतर ८०-९० शेतकरी सहभागी झाले होते.
शेतकऱ्यांनी आंदोलनादरम्यान मोठमोठ्याने घोषणाबाजी केली, हलगी वाजवली प्रबोधनात्मक भाषणे केली. दरम्यान, या आंदोलकांवर जमावबंदी आदेशाचे उलंघन केल्याचा ठपका ठेवत भारतीय न्याय संहिता कलम १२६(२), २२३, १८९(२) तसेच महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम १३५ अंतर्गत गुन्हा नोंद केला आहे.
तर सरकारवर गुन्हे दाखल करा - खासदार ओमराजे निंबाळकर
दरम्यान, सर्वस्व गमावलेल्या शेतकऱ्यांना तातडीने मदत देण्याच्या न्याय मागणी बाबत आंदोलन करताना आम्ही सार्वजनिक मालमत्तेचे कोणतेही नुकसान केले नाही. तरीही गुन्हे दाखल होणे धक्कादायक असल्याची प्रतिक्रिया आंदोलक शेतकरी भास्कर वारे यांनी दिली आहे. तसेच खासदार ओमराजे निंबाळकर यांनी देखील शेकऱ्यांवर जर गुन्हे दाखल होत असतील तर शेतकरी आत्महत्या प्रकरणी तुम्ही सरकारवर गुन्हे दाखल करणार का? असा जाब पोलिस प्रशासनास विचारला असल्याची माहिती आहे.