उस्मानाबाद जिल्हा परिषदेने तयार केलेला ‘सीएससी’चा प्लॅन राज्यासाठी लागू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 12, 2021 04:30 IST2021-04-12T04:30:05+5:302021-04-12T04:30:05+5:30
उस्मानाबाद : राष्ट्रीय ग्राम स्वराज अभियानांतर्गत ग्रामपंचायतीकरिता नागरी सुविधा केंद्रासाठी (सीएससी) स्वतंत्र खाेली बांधकाम करण्यात येणार आहे. ते कसे ...

उस्मानाबाद जिल्हा परिषदेने तयार केलेला ‘सीएससी’चा प्लॅन राज्यासाठी लागू
उस्मानाबाद : राष्ट्रीय ग्राम स्वराज अभियानांतर्गत ग्रामपंचायतीकरिता नागरी सुविधा केंद्रासाठी (सीएससी) स्वतंत्र खाेली बांधकाम करण्यात येणार आहे. ते कसे असावे, त्यात काेणकाेणत्या साेयी-सुविधा असाव्यात, या अनुषंगाने जिल्हा परिषदांकडून प्लॅन मागविण्यात आले हाेते. प्राप्त प्लॅनपैकी गडचिराेली, ठाणे व उस्मानाबाद, अशा तीन जिल्हा परिषदांचे प्लॅन ग्रामविकास विभागाकडे पाठविण्यात येत हाेते. यामध्ये गडचिराेलीसह ठाण्यासारख्या जिल्ह्यांना मागे टाकत उस्मानाबादच्या प्लॅनने बाजी मारली आहे. सरकारने हा प्लॅन संपूर्ण राज्यासाठी लागू केला आहे.
राज्यातील प्रत्येक ग्रामपंचायतीच्या ठिकाणी नागरी सुविधा केंद्रासाठी (सीएससी) स्वतंत्र खाेलीचे बांधकाम करण्याचा निर्णय सरकारने घेतला हाेता; परंतु संबंधित केंद्राची इमारत कशी असावी, इमारतीत काेणकाेणत्या सुविधा असाव्यात, या अनुषंगाने प्रत्येक जिल्हा परिषदेने बांधकामाबाबतचा टाइप प्लॅन सादर करण्याचे निर्देश दिले हाेते. त्यानुसार बहुतांश जिल्हा परिषदांनी आपले प्लॅन राष्ट्रीय ग्राम स्वराज अभियानच्या राज्य प्रकल्प संचालकांकडे दाखल केले हाेते. सर्व प्लॅनची पाहणी केली असता, संचालकांनी उस्मानाबाद, गडचिराेली व ठाणे या तीन जिल्हा परिषदांनी सादर केलेल्या प्लॅनची निवड केली. यापैकी एक प्लॅन फायनल करण्यासाठी राज्याच्या ग्रामविकास विभागाकडे सादर करण्यात आला. ग्रामविकासमंत्र्यांनी गडचिराेली, ठाणे या जिल्हा परिषदांचा प्रस्ताव नाकारत उस्मानाबादचा प्लॅन स्वीकारला आहे. हा प्लॅन संपूर्ण राज्यासाठी लागू करण्यात आला आहे. त्यामुळे राज्यभरातील ‘सीएससी’ सेंटरच्या इमारतींची कामे उस्मानाबादच्या प्लॅननुसारच हाेणार आहेत. ही बाब जिल्हा परिषद ग्रामपंचायत विभाग, तसेच बांधकाम विभागातील अधिकारी, अभियंत्यांचे मनाेबल उंचावणारी ठरणार आहे.
चाैकट....
सीईओंकडून काैतुकाची थाप
नागरी सुविधा केंद्राच्या इमारत बांधकामासाठीचा उस्मानाबाद जिल्हा परिषदेने सादर केलेला प्लॅन संपूर्ण राज्यासाठी लागू करण्यात आला आहे. तसा आदेश निघाल्यानंतर मुख्य कार्यकारी अधिकारी डाॅ. विजयकुमार फड यांनी बांधकाम व ग्रामपंचायत विभागातील अधिकारी, अभियंत्यांचा सत्कार करून पाठीवर काैतुकाची थाप मारली. यावेळी बांधकामचे कार्यकारी अभियंता नितीन भोसले, पंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी दाताळ, अभियंता शेगर, ओ.के. सय्यद, आर.एन. शिंदे, डाेईफाेडे, एम.बी. शिंदे आदींची उपस्थिती हाेती.
चाैकट...
कमी खर्चात अन् कमी जागेत बसणारे ‘स्ट्रक्चर’
उस्मानाबाद जिल्हा परिषदेने नागरी सुविधा केंद्राच्या इमारतीचे स्ट्रक्चर तयार करताना ते कमीत कमी जागेत व कमीत कमी खर्चात कसे बसेल, याचा विचार केला आहे. जे काम केवळ सव्वादाेनशे स्क्वेअर फूट जागा व चार लाखांमध्ये पूर्ण केले जाऊ शकते, तसेच या केंद्रात येणाऱ्या दिव्यांग व्यक्तींचा विचार करून रॅम्प, उन्ह, तसेच पावसापासून संरक्षण व्हावे यासाठी सज्जाची सुविधाही समाविष्ट केली आहे. या बाबी इतर जिल्हा परिषदांच्या बिल्डिंग स्ट्रक्चर प्लॅनमध्ये नव्हत्या. त्यामुळेच उस्मानाबादचा प्लॅन राज्यासाठी लागू केल्याचे प्रशासनाने सांगितले.